थोर संगीतकार ओ.पी. नय्यर यांची उद्या १६ जानेवारी रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्दांजली….
संगीताचा कुठलाही वारसा नसताना, औपचारिक संगीत प्रशिक्षणही झालेलं नसताना, चित्रपट संगीत रसिकांना चार दशकं आपल्या तालावर नाचवणारा जादू नगरीचा जादूगार म्हणजे संगीतकार ओ. पी.
चाकोरीबद्ध, साचेबद्ध एकसुरी संगीतापासून कोसो दूर, श्रवणप्रिय, तालप्रधान गीत रचनांचा बेताज बादशहा म्हणजे ओ. पी. आपल्या अजोड, अवीट ठेकेदार संगीत रचानांनी ओ. पीं. नी हिंदी चित्रपट संगीताचा आसमंत असा काही दरवळून टाकला की चहाते, बहोत शुक्रिया, बडी मेहेरबानी म्हणते झाले.
ओ. पी. जसे आपल्या भरजरी झगमगीत सांगीतिक कर्तृत्वामुळे लक्षात राहतात तसेच ते आणखी एका गोष्टीमुळे लक्ष वेधून घेतात. हिंदी चित्रपट संगीताच्या अवकाशात सर्वात लयबद्ध आणि सुमधुर संगीत दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओंकार प्रसाद नय्यर (ओ. पी. नय्यर) सारख्या उत्कृष्ट संगीतकाराने हिंदी चित्रपट सृष्टीच्या अनभिषिक्त स्वरसम्राज्ञी कडून एकही गीत गाऊन घेतलेले नाही आणि म्हणूनच ओ. पी. त्यांच्या उत्तमोत्तम रचनांमुळे जसे नावाजले जातात, तितकेच प्रामुख्यानं लक्षात राहतात ते त्यांच्या लता विरहित यशस्वी कारकिर्दीमुळे!
लता मंगेशकर ह्या उत्कृष्ट गायिका आहेत मात्र त्यांचा आवाज पातळ (like a thin thread) आहे. आपल्या रचनांसाठी मला थोडा रुमानी आवाज हवा असल्यामुळे त्यांना गीतं दिली नाही असं त्यांनी सांगितलं होतं. लता मंगेशकर यांच्या कडून गाणी न गाऊन घेण्याच्या गोष्टीचे, सनसनाटी पसरवण्या साठी भांडवल केले गेले’ असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. पण या गोष्टीला वादाची खरंच कुठलीही किनार नसावी. ओ. पीं. च्या संगीत रचनांचा बाज बघता त्यांची ही भूमिका चुकीची ही वाटत नाही.
आओ हूजुर तुमको, कभी आर कभी पार, मेरा नाम चिन चिन चु, कैसा जादू बलम तूने डारा या सारख्या गाण्यांच्या अभिव्यक्ती साठी, ‘होश थोडा, थोडा नशा भी, दर्द थोडा, थोडा मजा भी’ असा काहीसा खट्टा-मिठा, अवखळ आवाज ओ. पीं. ना अपेक्षित असावा. शमशाद बेगम, गीता दत्त, आशा भोसले यांच्या आवाजात ही खुबी होती आणि म्हणून त्यांना गाणी दिली गेली, असं ओ.पीं. च म्हणणं होतं.
मी व ते ही ठाण्यात रहात असूनही ओ.पीं. ना प्रत्यक्ष भेटण्याची किंवा बोलण्याची संधी कधी मिळाली नाही. पण लता दीदी यांच्या बरोबर आलेल्या एका अनुभवामुळे, या दोन्ही दिग्गज कलाकारांमध्ये कुठलाही वाद किंवा कटुता नसावी असं म्हणता येईल.
२८ जानेवारी २००७ ला ओ. पीं. च ठाण्यात निधन झालं. त्यावेळी मी दूरदर्शनच्या वृत्त विभागात संपादक म्हणून कार्यरत होतो. वृत्त विभागात पोहोचता क्षणी ही बातमी मिळताच, पार्श्वभूमी माहीत असल्याने, मी शोक प्रतिक्रिया घेण्यासाठी लता मंगेशकर यांना, त्यांच्या प्रभुकुंज या पेडर रोड इथल्या निवासस्थानी दुपारी फोन लावला. कुणी सहायकानी त्या आजारी असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे तेव्हा त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. पण मी निरोप ठेवला.
संध्याकाळी पाचच्या सुमारास प्रभूकुंज वरून स्वतः दिदींचा फोन आला. त्यांना ओ. पीं. च्या निधनाची बातमी सांगितली आणि बाईट देण्याविषयी विनंती केली. प्रकृती आणि अन्य काही कारणामुळे बाईट होऊ शकली नाही तरी दीदींचा मनमोकळा अतिशय भावपूर्ण सविस्तर शोक संदेश, फोन वर रेकॉर्ड करून बातमीपत्रात प्रसारित केला होता. विशेष म्हणजे त्या आजारी असतानाही, निरोप मिळाल्यावर स्वतः फोन करून, शोक प्रतिक्रिया देण्यामुळे या दोन्ही महान कलाकारांनी कुठलीही कटुता न ठेवता परस्परांचे मोठेपण स्वीकारल्याचे स्पष्ट होते.
ओ. पीं. ना अभिनेता व्हायचं होतं पण ते स्वप्नं स्क्रीन टेस्टनं धुळीस मिळवलं. मग संगीताचा ध्यास घेतला, तर प्रारंभी तिथेही तार जुळली नाही. “कनीज”(१९४९) चित्रपटाचे पार्श्वसंगीत त्यांनी केले. “आसमान”(१९५२) चित्रपटाद्वारे चित्रनगरीच्या आसमंतात संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केले पण ‘आसमान’ बॉक्स ऑफिस वर धाराशायी झाला. नंतर “छम छमा छम”, गुरुदत्त चा “बाझ” या चित्रपटांसाठी त्यांनी केलेली गाणी ही यशस्वीतेच्या बाबतीत वांझ ठरली. मग निराशे पोटी चंबुगबाळे आवरून स्वग्रामी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. परतीच्या प्रवासापूर्वी गुरुदत्त कडे उधारी वसूल करायला गेलेल्या ओ. पीं. ना गुरुदत्तनी त्यांच्या कडे ही पैसे नसल्याने त्यांच्या आगामी दोन चित्रपटांचं काम देऊ करून, ओ. पीं. ना परतण्यापासून कसंबसं परावृत्त केलं. हाच तो सुवर्ण क्षण होता. कारण गुरुदत्त नी त्यांच्या देऊ केलेल्या दोन फिल्म्स होत्या
“Mr & Mrs 55” आणि “आरपार”.
ह्या दोन्ही चित्रपटांतील गाण्यांचे तीर रसिक हृदयाला असे काही घायाळ करून गेले की, निराशा ओ. पीं. पुढे, ‘ये लो मै हारी पिया हुई तेरी जीत रे’ अशी कबुली देत दत्त म्हणून हजर झाली. ही नवी नवी प्रीत चांगलीच बहरली आणि हिंदी पार्श्वसंगीताच्या दुनियेत ओंकाररुपी नाद निनादला. यानंतर मोहम्मद रफी आणि पुढे आशा भोंसले यांच्या बरोबर बेबनाव होई पर्यंत, ओ. पी. यशोशिखरावर पाय रोवून होते. यशस्वी चित्रपटांसाठी ते हुकमी एक्का ठरत होते. ज्या शशधर मुखर्जींनी उमेदवारीच्या काळात ओपीं च्या रचना ऐकून त्यांना घर वापसीचा सल्ला दिला होता त्यांच्याच फिल्मालयने ‘युं तो हमने लाख हंसी देखे हैं, तुमसा नाही देखा, ‘बहोत शुक्रीया बडी मेहेरबानी’ म्हणत ‘एक मुसाफिर एक हसीना’, ‘तुमसा नहीं देखा’ सह अनेक चित्रपटांना संगीत साज चढविण्यासाठी ओ पीं ना च साद घातली.
अव्वल, अस्सल गीतांनी लोभवून टाकणाऱ्या ओ पीं नी रूढार्थाने कुठलेही संगीत प्रशिक्षण घेतलेले नव्हते. त्यामुळे त्यांना काही वेळा उपहासाला ही सामोरे जावे लागले. एका स्थापित संगीतकाराने ओ पीं बद्दल “इद्रक-ए-मौसिक़ी नही, चले हैं धुन बनाने (संगीताची मूलभूत माहिती नाही परंतु धून तयार करण्याचा उद्योग करतो आहे) असे उपहासपूर्ण उद्गार काढले होते. कदाचित ते एकमेव असे संगीतकार असावेत. परंतु अनेक अलौकिक आणि अजरामर संगीत रचना त्यांनी केल्या आणि उपहास मूलतः मोडून काढला. संगीताशी त्यांची मामुली तोंड ओळख होती मात्र तरीही त्यांच्या अनेक रचना शास्त्रीय संगीतात बेतलेल्या आहेत.
पिलू रागाचं ओ. पीं.ना सुप्त आकर्षण असावं. त्यांच्या फागुन(१९५८) चित्रपटातील, छम छम घुंगरू बोले हे मधुवंती वर आधारित गीत सोडलं तर बाकी बहुतेक गीतं ही पिलू रागावर आधारित आहेत. असं सांगतात की ओ पीं ना ही गोष्ट खुद्द अमिर खां साहेबांनी लक्षात आणून दिली तेव्हाच समजली. पूर्वी गीतं बव्हंशी नायक – नायिके वर चित्रित होत असत. ओ.पीं नी प्रथमच सी.आय.डी. चित्रपटात, “ऐ दिल हैं मुश्किल हैं जिना यहाँ” हे गाणं विनोदी नट जॉनी वॉकर वर चित्रित करून एक नवा पायंडा घालून दिला.
मराठी साहित्य विश्वात आधुनिक वाल्मिकी म्हणून ख्याती पावलेले ग. दि. माडगूळकर यांनी आकाशवाणी साठी लिहिलेल्या गीतरामायण मध्ये एका ओळीत ऐहिक जीवनातलं निर्विवाद सत्य खूप छान मांडलं आहे. ते लिहितात “वर्धमान ते ते चाले, मार्ग रे क्षयाचा” ओ. पीं. च्या कारकिर्दीला, आयुष्याला ही हे वर्णन चपखल बसतं.
१६ जानेवारी १९२६ रोजी लाहोर मध्ये ओ. पीं. चा जन्म झाला. तिथेच सुरवातीला काही काळ लाहोर कॉलेज मध्ये संगीत शिक्षकाची आणि एच.एम. व्ही. कंपनीत संगीत दिग्दर्शकाची नोकरी केली. नंतर वयाच्या २३ व्या वर्षी “कनीज” चित्रपटांचं पार्श्वसंगीत त्यांनी केले. “आस्मान” (१९५२) मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं “आरपार” (१९५४), “Mr.& Mrs 55″(१९५५), “CID”(१९५६) या चित्रपटांनी त्यांना यशोशिखरावर पोहोचवलं.
५०-६० च्या दशकात ओ. पीं. नी अनेक उत्तमोत्तम गाणी केली. १९७३-७४ मध्ये आलेलं ‘चैन से हमको कभी’ हे निरतिशय भावनिक गीत, दुर्दैवाने नय्यर – भोंसले जोडीचं अखेरचं गीतं ठरलं. आशा भोसलेंना या गीतासाठी १९७५ सालचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिके साठीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला मात्र ओ.पी. – आशा जोडी तुटली ती तुटलीच आणि इथूनच जादू नगरी च्या जादूगाराची जादू लयास जाऊ लागली. त्या आधी महमद रफी यांच्याशीही ओ. पीं. चे संबंध दुरावले होते. घरच्यांशी तर आधीच संबंध तोडले होते. आपल्या अंत्यसंस्काराला ही घरच्यांना बोलावू नये असं त्यांनी सांगीतल्याचं वाचण्यात आलं.
नेसत्या वस्त्रानिशी मुंबईतली सगळी शानशौक सोडून पश्चिम उपनगरातल्या विरारला आणि शेवटी ठाणे मुक्कामी हा बिनीचा संगीत दिग्दर्शक होमियोपॅथीची प्रॅक्टिस करून गुजारा करू लागला. एक तपाहून अधिक काळ त्यांनी ठाण्यात काढला. या मनस्वी, कलंदर, कडक शिस्तीच्या कलाकारावर त्यानेच रचलेल्या गाण्याचे शब्द “चल अकेला चल अकेला चल अकेला, तेरा मेला पीछे छुटा राही, चल अकेला” यथार्थ व्हावेत हा केव्हढा दैवदुर्विलास !

– लेखन : नितीन सप्रे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
ओ. पी नय्यर निर्विवाद संगीतक्षेत्रातलं एक जबरदस्त व्यक्तीमत्व!!
घोड्यांच्या टापांचं म्युझीक असलेली त्यांची गाणी प्रचंड गाजली, आजही ती मनात ओठांवर आहेत..
नितीन सप्रेंचा हा लेख खूप आवडला..अनेक गीतांच्या आठवणी सहजउजळल्या…
ऊत्तम लिखाण, अशाच अनेक आठवणी ंंची नितीन कडून अपेक्षा
ओ.पी. नय्यर माझे आवडते संगीतकार. या अजरामर संगीतकाराला भावपूर्ण आदरांजली!
अप्रतिम…
ओ. पी. नय्यर… जबरदस्त संगीतकार…!
… प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007