Sunday, December 22, 2024
Homeलेखऔद्योगीक सुरक्षेचे महत्व

औद्योगीक सुरक्षेचे महत्व

आज ४ मार्च, राष्ट्रीय सुरक्षा दिन. यानिमित्ताने जाणून घेऊ या औद्योगीक सुरक्षेचे महत्व
– संपादक

औद्योगीकरण हा देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात औद्योगीकरणाची सुरुवात प्रामुख्याने कलकत्ता आणि मुंबईला झालेली असली तरी आज प्रत्येक राज्यात औद्योगीकरण हे सातत्याने नवनवीन उद्योगांना प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून येते.

उद्योगांच्या विकासामध्ये सुरक्षा हा महत्त्वाचा घटक आहे. अपघात टाळण्यासाठी सुरक्षेचा विचार हा प्रामुख्याने उद्योगाची प्राथमिक आखणी आणि मांडणी या स्तरावरच होणे गरजेचे आहे.

कारखाना अधिनियमन तसेच पर्यावरण आणि इतर औद्योगिक धोरणांची अंमलबजावणीची हमी तसेच त्यासाठी असलेल्या यंत्रणेचा समावेश हा परवाना मिळण्यापूर्वीच संबंधित शासकीय खात्याकडून परीक्षणानंतरच दिला जातो.

सुरक्षा आणि पर्यावरण विषयक जागरूकतेचा विचार सर्व स्तरावर सध्यपरिस्थितीत केला जात आहे ही समाधानाची बाब आहे. 4 मार्च सुरक्षा तसेच 5 जून पर्यावरण दिन, रस्ता सुरक्षा, अग्नी सुरक्षा सप्ताह अश्या विविध कार्य्रमांद्वारे भारतामध्ये सुरक्षेविषयक जागरूकता निर्माण करण्याचा सतत प्रयत्न होत असतो. मोठ्या प्रमाणात चर्चासत्रे, परिसंवाद, विविध प्रात्यक्षिके, कामगार स्पर्धा इत्यादि कार्यक्रम विविध पातळीवर होत असल्याने अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी झालेले दिसते आहे परंतु त्यावर अजून अधिक नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

अपघातांच्या कारणमीमांसा बघितल्यास, पुढील गोष्टी निदर्शनास येतात. केलेल्या उपाययोजनांच्या नियमित देखभालीमधील निष्क्रियता, प्रक्रिया हाताळण्यासाठी वापरावयाच्या कार्यप्रणालीतील हलगर्जीपणा, प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा बिघडणे किंवा बंद ठेवणे, योग्य त्या प्रशिक्षणाचा अभाव, प्रक्रियेतील साधनं दुरूस्तीतील दिरंगाई, अपघात घडल्यास वापरावयाच्या आपत्कालीन उपाय योजना कार्यरत नसणे. अशी एक ना अनेक कारणं अपघात घडण्यास नुसत्याच कारणीभूत नसतात तर त्या यंत्रणा वेळीच नियंत्रणात न आणल्यामुळे, अपघातांचे स्वरूप वाढते व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी होत असते.

सुरक्षा कायद्यांचा विचार केल्यास त्यामध्ये सरकारी पातळीवर वेळोवेळी चांगले बदल होत असतात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येकाने मग तो कारखानदार असो वा कामगार असो, सामान्य नागरिक असो अथवा शासकीय यंत्रणा असो प्रत्येकाने आपआपली जबाबदारी व कर्तव्य ओळखून या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अपघात नियंत्रित करणे गरजेचे आहे.

सुरक्षा हा विषय फक्त चार मार्च या दिवसापुरता मर्यादित नसून संपूर्ण वर्षभर ह्याचा विचार व्हावयास हवा. ज्यामुळे अपघात अधिक नियंत्रणात येऊन, अपघातांमुळे होणारी मोठ्या प्रमाणातील जीवित व वित्तहानी टाळता येईल.

सुधीर थोरवे.

— लेखन : सुधीर थोरवे. औद्योगिक सुरक्षा व पर्यावरण तज्ञ. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments