महाराष्ट्रात विविध शहरे तेथील खाद्यपदार्थांसाठी
प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, नागपूर संत्र्यासाठी, कोल्हापूर मिसळीसाठी, नाशिक द्राक्षांसाठी,
जळगाव शेवभाजीसाठी, सोलापूर शेंगा चटणीसाठी आणि मुंबई वडापावसाठी प्रसिद्ध आहे. पण कढी – खिचडी ही एखाद्या शहराची खासियत असू शकते का ? तर मराठवाड्यातील परभणी हा भाग कढी खिचडी आणि भजेसाठी प्रसिद्ध आहे.
परभणीमध्ये अनेक स्टॉल्स आणि ढाबे आहेत जे कढी खिचडीसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी रेस्टॉरंट्सही कढी खिचडी हा त्यांचा प्रमुख मेन्यू म्हणून विकतात.
मात्र तरीही राजाभाऊ देशमुख यांचा ‘खिचडी आणि भजें’ चा स्टॉल परभणीतील नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हा स्टॉल परभणी रेल्वे स्थानकापासून 1.5 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला आहे.
फक्त एक वर्षापूर्वी, राजाभाऊंनी स्वतःचा खिचडी स्टॉल सुरू केला कारण कोरोनामुळे पसरलेल्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली. राजाभाऊ २५ वर्षे हॉटेलमध्ये काम करायचे. एका हॉटेलमध्ये, व्यवस्थापकाने प्रत्येकाला मेन्यू यादीमध्ये काहीतरी जोडण्यास सांगितले आणि चाचणीसाठी डिश देखील सादर करण्यास सांगितले. राजाभाऊंनी आपली थाळी मांडली; कढी खिचडी आणि भजे. त्या दिवसापासून राजाभाऊंना हॉटेलच्या आवारात स्वतःचा स्टॉल मिळाला.
पण कोविड-19 लॉकडाऊनमुळे राजाभाऊंची नोकरी गेली आणि त्यांचा स्टॉलही गेला. त्यानंतर त्यांनी आपला स्टॉल उघडण्याचा निर्णय घेतला. राजाभाऊंनी चहा, समोसा, आलू वडा इत्यादी कढी खिचडीला पूरक असणार्या मेन्यूसह पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला त्यांचा स्टॉल उघडला.
राजाभाऊ आपल्या खिचडीसाठी प्रभाकर तांदूळ वापरतात. ते म्हणाले की, तांदळाच्या प्रकारात त्यांच्या मासिक उत्पन्नानुसार चढ-उतार होऊ शकतात. या सोबतच राजाभाऊंनी एका दूधविक्रेत्याशी करार केला आहे. दूधवाले दादा आपले उरलेले सर्व दूध संध्याकाळी राजाभाऊंना देऊन जातात आणि नंतर राजाभाऊ त्याची कढी बनवतात. “आमचा अजूनही मानवतेवर विश्वास आहे, ताई”, राजाभाऊ म्हणाले.
हॉटेलमध्ये काम करत असताना राजाभाऊंना महिना अखेरीस पंधरा हजार रुपये मिळत. आता दररोज ४००-५०० ग्राहक त्याच्या स्टॉलला भेट देतात आणि ते दररोज ३ ते ४ हजार रुपये कमावतात.
राजाभाऊ म्हणाले, “हे कोणीही कधीच म्हणणार नाही, पण मी कोविड-19 चा आभारी आहे. कोरोनाने मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचे कारण दिले आणि मी दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा माझा स्वतःचा स्टॉल उघडला. आता माझे कुटुंब आणि मी खुप सुखी आहोत. पूर्वीपेक्षा खूप जास्त आनंदी आहोत.”
खरंच, राजाभाऊंच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. हो ना ?
– लेखन व छायाचित्रे : सिद्धी धर्माधिकारी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
जो करतो तो मिळवतो..
राजाभाउंची कल्पकता, जिद्द ,चिकाटी ,आत्मविश्वास ंंं
आदर्शवत..
कढी खिचडी परभणीची खासीयत हा लेख मनापासून आवडला उमेद न हरता खूप काही करता येऊ शकते हे ह्या लेख मालेतून नक्कीच कळलय मनापासून राजाभाऊ दादाना त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा 👍👌💐💐