Friday, December 26, 2025
Homeसाहित्यकथालेख

कथालेख

अशी ही जोडी !

आपले चुकते आहे, आपण स्वतःच निर्माण केलेल्या चिखलात खोल रुतत चाललो आहोत हे रोहिणी ला कळत होते,पण वळत नव्हते. अहंकार आड येत होता. आपण सर्वच बाबतीत खोटे पडू ही भीती देखील होतीच .तिच्या मनातच नव्हे तर तिच्या अवती भवती देखील गोंधळाचे अनिश्चित वातावरण होते.लग्न होऊन एक तप झाले.पण ते टिकेल की नाही ही शंका अक्षता पडल्या पासून होती मनात. त्यावेळी जवळच्या नातेवाईकांचा,आई वडिलांचा दबाव देखील कारणीभूत होताच.मुख्य म्हणजे नकार देण्यासाठी त्यावेळी तिच्याकडे कुठलेही सबळ कारण नव्हते.काय कमी आहे या स्थळात? या प्रश्नाला तिच्याकडे उत्तर नव्हते! बरे, ती दुसरीकडे कुठे गुंतली आहे असेही काही नव्हते.पण आपल्याला नेमके काय हवे आहे,हे देखील तिला कळत नव्हते,स्पष्ट नव्हते.म्हणजे हे ठीक नाही असे कुठेतरी मनात पाल चूकचुकल्या सारखे वाटत असेल तरी,हे नको तर मग काय हवे,या प्रश्नाचे ही उत्तर तिला देता येत नव्हते. सगळाच गोंधळ असे एकूण वातावरण होते.

लग्न झाले.ती त्याच्या बरोबर अमेरिकेत गेली.त्याला छान भरपूर पगाराची मोठ्या आय टी कंपनीत नोकरी होती.तो जितका बिझी तितकीच ती मोकळी.त्याने आधीच सांगून टाकले,”तुला पुढे शिकायचे, हवी ती नोकरी शोधायचे,हवे तिथे फिरायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.मी मदत करेन..पण तुझा मार्ग तुलाच शोधावा लागेल. आई वडिलांची एकुलती एक लाडकी लेक या नात्याने तुझे निर्णय आतापर्यंत त्यांनी घेतले.आता ते इथे अमेरिकेत तुलाच घ्यावे लागतील.तसे आपल्या कडच्या तुलनेत इथे आपली वाट आपणच शोधणे सोपे आहे.इथे तुमच्या योग्यतेला मान आहे.भ्रष्टाचार नाही या पातळीवर. सगळा कारभार पारदर्शी असतो.पण आपल्याला आपली योग्यता सिध्द करावी लागते.आधी आपण स्वतःला मदत करावी लागते.मग बाकीचे सहज मदत करायला पुढे सरसावतात.”

त्याने तिला सुरवातीला हे सारे शांतपणे,प्रेमाने पण तितक्याच स्पष्टपणे समजावले.तिला ते तिथल्या वातावरणात रुळायला लागल्यावर जाणवले देखील.पण आईवडिलांच्या अती लाडाच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचे अमेरिकेत गेल्यावरही तिला जमले नाही.तिचे परावलंबित्व संपले नाही.

इथेच रोहिणी चे चुकले.आपले चुकले,चुकते आहे हे तिला कळले नाही.कधीच मान्य झाले नाही.इथूनच दोघात विसंवाद निर्माण झाला.त्याने एकदा दोनदा सांगून पाहिले. पण तेच ते पुन्हा सांगणे, समजावत बसणे,मिंनतवारी करणे त्याच्या स्वभावात नव्हते.तो लहानपणापासून शिक्षणाच्या निमित्ताने आईवडीलापासून दूर एकटा वाढलेला.मोजके, कमी बोलणे. निवडक मित्र..आपण बरे,आपले काम बरे ही काहीशी कोरडी व्यावहारिक वृत्ती..उगाच कुणाच्या फंदात पडायचे नाही,फारसे कुठे गुंतायचे नाही, अघळपघळ बोलायचे नाही.आपण बरे आपले काम बरे असे धोरण.

तिला हे कुठेतरी खटकत होते.काही वर्षानंतर आपण त्याला अमेरिका सोडून स्वदेशी चालण्यास भाग पाडू अशी तिची समजूत होती.आईवडिलांनी करून दिलेली!पण त्याने लग्नाआधीच स्पष्ट केले होते. मी कुठल्याही परिस्थितीत भारतात परतणार नाही.पुढे चांगली संधी मिळाली मनासारखी,आवडीची..तर जॉब बदलेन,दुसऱ्या देशात जाऊ..पण भारतात परतणार नाही..अर्थात यामागे स्वदेश प्रेम नव्हते,काही रिझर्व्हेशन होते असे नाही.पण जे प्रोफेशनल फ्रीडम बाहेर मिळते,जो स्वच्छ,पारदर्शी कारभार,वर्तन बाहेर अनुभवायला मिळते ते आपल्याकडे नाही याबाबतीत त्याचे मत ठाम होते.तिथे तडजोड करायला तो तयार नव्हता.तसे त्याने,त्याच्या घरच्यांनी तिला,तिच्या आई वडिलांना लग्न आधीच स्पष्ट सांगितले होते.तेव्हा त्यांनी माना डोलावल्या होत्या.

लग्न हा असा प्रवास आहे जिथे रिव्हर्स गियर नाही. तुम्हाला मागे जाता येत नाही. चूक झाली असे वाटले तरी ती सुधारता येत नाही.मागची पाने पुसून टाकता येत नाहीत. तडजोड करावी लागते. दोघांनीही एकमेकांना स्वतःचा इगो बाजूला ठेऊन समजून घ्यावे लागते.दुसऱ्या व्यक्तीला, परिस्थितीला आहे तसे स्विकारावे लागते.दुसरा बदलणार नाही हे गृहीत धरून बदल करायचा तो स्वतः पासून,असे धोरण स्वीकारावे लागते.आपण बदललो तर दुसराही बदलेल,परिस्थिती बदलेल या विश्वासाने समस्या सोडविण्या साठी पुढाकार घेण्यातच शहाणपण असते.
पण प्रत्येकाला आपल्या जखमा कुर्वाळण्यात रस असतो.दुसऱ्याच्या चुका काढत आपण किती गरीब बिचारे हे रडगाणे गाण्यात इंटरेस्ट असतो.

रोहिणीला हे नैराश्य आधी पासून जाणवते आहे.तसे पाहिले तर कुठेही कसचीही कमी नाही संसारात.चांगला कमावता नवरा,परदेशात ऐश आरामाचे वास्तव्य,हवे ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य.सासू सासऱ्याची ना जबाबदारी, ना संसारात कसली दखल..उलट हवे ते करण्यासाठी,पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन! तरी रोहिणी ला वाटायचे कुठेतरी काहीतरी कमी आहे.जे आपल्याला हवे होते ते हे नाही.जो आपल्याला हवा होता तो हा नवरा नाही. आपल्याला हवे असणारे हे घर नाही.तिला सवय होती कुणी तरी सारखी तिची विचारपूस करावी.तिला हवे नको ते विचारावे.तिची दखल घ्यावी.तिला महत्व द्यावे.तिची प्रशंसा करावी. पण हे रोहनच्या स्वभावातच नव्हते.तो इंत्रोवर्त, आत्ममग्न..दिवसाचे पाच दिवस अत्यंत बिझी..सारखे नवे नवे प्रोजेक्ट्स, डेडलाइन्स,कॉन्फरन्स, मीटिंगज..त्याचे शिक्षण तिकडेच झालेले..त्याला त्या वातावरणाची सवय.

रोहिणी ला सुरवातीला हे सारे जड गेलेच.हळू हळू ओळखी झाल्या.मैत्रिणी झाल्या..वीकेंड पार्ट्या व्हायला लागल्या. तिलाही हे सगळे मोकळे वातावरण हवे हवेसे होते.पण त्यात विरघळता येत नव्हते. झोकून द्यावेसे वाटत नव्हते. एक पडदा होता त्या दोघांमध्ये.दोघेही आपापल्या परीने प्रयत्न करीत होते.तो पडदा दूर करायचा.पण एकमेकांविषयी असलेली अढी त्यांना जवळ येऊ देत नव्हती.तिचे आई वडील तिला समजावण्याऐवजी तिच्या एकटेपणाला गोंजारत होते. तेही तिच्या बरोबर रोहनलाच दोष देत होते.अर्थात वडील धाऱ्या मंडळींनी दोघानाही आपापल्या परीने समजावून पाहिले.प्रॉब्लेम प्रत्येक संसारात असतातच.तुम्ही त्याकडे कसे बघता यावर पुढचे सारे अवलंबून असते.

पहिली गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम आहे हे आधी मान्य करायचे असते.अनेकांचे इथेच चुकते. आमच्यात तसे फारसे काही नाही,सगळे आलवेल आहे असे दाखवायचे,नाटक करायचे असते! लोक काय म्हणतील,त्यांना काय वाटेल,ते काय समजूत करून घेतील अशी समाजाची, त्यातही आपल्या नातेवाईकाचीच भीती असते!अशा वेळी सल्ले दिले जातात..हे असे सगळ्यांच्याच आयुष्यात घडत असते.काळाबरोबर सगळे काही नीट होत जाते.

मुलं झाली की गाडी आपोआप रुळावर येते. एक नवे नाते जन्माला येते. नवरा बायको आई वडील झालेत की आपोआप जवळ येतात. मुलं त्यांना गुंतवून ठेवतात.जवळ आणतात.. हे असे सल्ले रोहन,रोहिणी दोघानाही ,दोन्ही कडून मिळायला लागले.त्यांनी हेही करून पहायचे ठरवले.या गरजा एकतर्फी नसतात. काळजी घ्यायची म्हंटले तरी अपघात घडतात.काही मुलं अशा अपघातातून जन्माला येतात.आपल्याला मुलं होऊ द्यायची आहेत की नाही,या संभ्रमात रोहिणी ने एक नव्हे दोन मुलांना जन्म दिला. स्वखुशीनेच म्हंटले पाहिजे. अशा गोष्टी एकतर्फी घडत नाहीत.यात दोघांचाही सारखा सहभाग असतो.

लग्नानंतर चार वर्षांनी राहुल अन् पाठोपाठ दोन वर्षांनी रागिणी चा जन्म झाला. या छोट्या जीवाच्या आगमनाने तेव्हढ्या पुरते का होईना घरच्या आकाशाचे रंग बदलले.त्या काळात तेव्हढ्या पुरते का होईना रोहिणी रोहन जवळ आले.संवाद साधण्याचे गोड निमित्त मिळाले.मुलांच्या लाड कौतुकात, त्यांचे हवे नको बघण्यात भांडायचे, वाद घालायचे विसरून गेले!
मुलात बापाचे बीज असते. आईचे रक्त असते.नऊ महिने गर्भात पोषण..सर्वस्व देते ती आपल्या मुलांना..त्या निरागस वयात त्यांना समजून घेणे, त्यांच्यात रमणे हे वेगळेच विश्व असते आई वडिलांसाठी. रोहन,रोहिणी या विश्वात रमले काही काळ..म्हणजे काही काळच..पहिल्या वर्षातले लाड, पहिले वाढदिवस,मग नर्सरितले प्रवेश..मग नियमित शाळा..नवी नवलाई आटोपली अन् पुन्हा यांचे ये रे माझ्या मागल्या सुरू झाले!

आता तर मुलांमुळे रोहिणी अडकून पडली घरात.रोहनची व्यस्तता वाढतच होती.तो एकेक पायरी चढत नव्हे धावत होता.त्याच्या जबाबदाऱ्या वाढत होत्या. स्पर्धेत टिकून राहणे गरजेचे होते.स्वतःचे मोठे आलिशान घर झाले. रोहिणी ची स्वतंत्र गाडी आली.तीही जॉब करायला लागली.कामाच्या, जबाबदाऱ्या च्या वाटण्या झाल्या.पण तरीही दोघांना एकमेकात समरस होता आले नाही.जुने काहीतरी उकरून काढायचे,एकमेकाच्या चुका काढत एक दुसऱ्याला दोष देत बसायचे,सारखे तू तू मैं मैं करायचे! यातच आनंद!कुणीही आपली चूक मान्य करायला तयार नाही. दुसऱ्याला दोष दिला की आपण मोकळे,आपले काम संपले ही दोघांचीही टोकाची भुमिका!

शेवटी आपले प्रश्न आपल्यालाच सोडवायचे असतात,आपले आयुष्य आपल्यालाच नेविगेट करायचे असते हे शिकल्या संवरल्या जोडप्याला कळत नाही.मुलं मोठी झाली आहेत.मोठा मुलगा राहुल दहा वर्षाचा झालाय.रागिणी देखील लहान नाही.तिलाही कळायला लागलंय. आपले आई वडील सारखे का भांडतात..तेही आमच्या समोर ? त्यांना एवढेही कळत नाही ?
एकदा राहुलने सुनावले दोघानाही..” तुम्हाला नवरा बायको चे नाते नसेल जपायचे तर द्या सोडून..पण मित्र म्हणून तुम्ही काही काळ एकत्र राहू शकता! निदान आमच्यासाठी ?”
जे त्या लहान मुलाला कळत होते ते या शिकल्या सवरल्या मोठ्यांना कळत नव्हते!
नाही जमत काही नवरा बायकोचे एकमेकाशी.
असतात स्वभाव वेगळे.अपेक्षा वेगळ्या..लग्न जुळण्या आधी सगळेच काही स्पष्ट नसते. कितीही भेटी गाठी घ्या, कितीही बोला..सगळे हात राखून केलेले नाटकी व्यवहार..आपण जे नाही ते तसे आहोत हे दाखवायचा मुखवटे घातलेला व्यवहार!माणसे जवळ आल्यावरच त्यांचे असली रूप समजते. कधी कधी ते आपला पूर्ण भ्रमनिरास करणारे असते.पण आज लग्न अन् उद्या घटस्फोट हेही शक्य नसते..संसार एकमेकांना आहे तसे स्वीकारले तरच टिकतो. यशस्वी होतो.दुसऱ्याने आपली प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे,आपण म्हणतो तसेच वागले पाहिजे हा दुराग्रह दुरावा निर्माण करतो.एका सुंदर नात्यात दरी निर्माण करतो.हा दुभंग जोडणे काळाच्या ओघात अशक्य होऊन बसते.

अमेरिकेत मुलं वाटच बघत असतात ,स्वतंत्र होण्याची. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची.राहुलने ठरवून टाकले केव्हाच.१६ वे वर्ष पूर्ण झाले की घर सोडायचे. शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जायचे.भांडू द्या यांना घरात किती भांडायचे!रागिणी ला तेव्हढे कळत नाही.पण तीही अमेरिकन संस्कृतीत वाढलेली. तिला सायंटिस्ट व्हायचे आहे.तिला नासा त प्रोजेक्ट करायचा आहे.स्पेस रिसर्च मध्ये तिला इंटरेस्ट आहे.आतापासूनच ती त्या विषयावरची पुस्तकं वाचते आहे.तसे या जगात कुणीच कुणावर अवलंबून नसते.पण म्हणून मायाममता, लळा जिव्हाळा या भावना तशाच आहेत.ती मनाची भूक तशीच आहे.प्रत्येक जण त्यासाठी आतल्या आत झुरतो आहे..ते सारे हवे तसे,हवे तेव्हा,हवे तितके नाही मिळाले तर ताण तणाव देखील आहेतच. नैराश्य,असमाधान,आतल्या आत सारखी टोचत राहणारी खंत.. न दिसणारे किडे जसे पोखरून टाकतात मोठ्या वृक्षाच्या मुळालाच.

रोहिणी रोहन च्या संसाराचे तसेच झाले..त्यांना अपेक्षा होती,घरचे मोठे, वाड वडील काहीतरी मार्ग काढतील.पण तरुण जोडप्याचे प्रश्न वृद्ध जोडपी सोडवू शकत नाहीत . आपली गाडी आपल्यालाच चालवावी लागते.रस्त्यात फसली, नादुरुस्त झाली तर आपल्यालाच त्यातून बाहेर यावे लागते..

अजूनही रोहन रोहिणी चे प्रश्न सुटलेले नाहीत.सुटले तर ते दोघेच सोडवतील एकत्र बसून.थंड डोक्याने, विवेकाने, तर्क शुध्द पद्धतीने विचार करून..तुमच्या लक्षात आले का?

ही फक्त रोहन रोहिणी ची गोष्ट नाही.आजकालच्या जगात ही प्रत्येक नवरा बायको ची गोष्ट आहे.संवाद, वाद,ताण तणाव थोडे उंनिस बीस कमी जास्त असतील.पण ही घर घरची कहाणी आहे.काही ती आतल्या आत दडपतात. लपवून ठेवतात.भीती असते समाजाची..नातेवाईकांची.
इमेज जपायची असते स्वतःची! प्रत्येक नवरा बायकोची जोडी थोडी शहाणी,थोडी वेडी असतेच असते..या थोडयाचे प्रमाण वाढते तेव्हा समस्या निर्माण होते.अन् मग लेखकाला लिहावे लागते!!

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”