सना आणि समीर दोघे बहिण भाऊ.
दोघांमध्ये फक्त दीड वर्षाचे अंतर. पण कधी भांडण नाही कि मारामारी नाही. बरोबर खेळणार, बरोबर जेवणार, बरोबरच झोपणार. एवढेच नाही प्रात विधीही बरोबरच करणार.
त्यांच्या या प्रत्येक गोष्ट बरोबर करण्यामुळे अम्मी कधी कधी त्यांच्यावर खूप चिडायचीही. एवढेच नाही ते दोघे आजारीही बरोबरच पडायचे. तेव्हा त्यांना संभाळताना अम्मीची खूप तारंबळ व्हायची.
दोघे मोठे होत होते. दोघे ही चंचल. त्यांना सांभाळने खूप कसरतीचे होते. अभ्यासात ही दोघे हुशार, स्वच्छता प्रिय. त्यांच्या समोरच गणू छोट्याशा खोलीत रहायचा. गणूचे वडील मिळेल त्या रोजंदारीवर काम करायचे. अन आई धुणे भांडीचे काम करायची.
गणू जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचा. मन लावून अभ्यास करायचा. कपडे जुने जरी असले तरी स्वच्छ असायचे. तो स्वच्छही रहायचा.
सना अन समीर खेळत असतांना तो गेटच्या बाहेरुन एक टक पहायचा. त्यांचे भारी भारी खेळणे पहायचा. स्मित हास्य करायचा. सना अन समीरलाही तो आवडायचा. गेट उघडून हळूच त्याला दोघे आत खेळायला बोलवत. अधुन मधुन सुट्टीच्या दिवशी त्याला अभ्यासालाही बोलवू लागले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्याच्याकडे पेन्सिल रबर नसेल तर देवू लागले. त्याला खाऊही द्यायचे. गणू विषयी अम्मी अब्बाला त्याच्या चांगूलपणा आणि हुशारी विषयी सांगत गरीब असला तरी तो कसा चांगला आहे, असे सतत काही ना काही सांगत असत.
संध्याकाळी दोघे बहिण भाऊ घरा समोरील छोट्याशा बागेत खेळता खेळता जेवण करायचे. आई सईदा पोळ्या करायला बसली की दोघांना आवाज द्यायची. दोघांना अर्धी अर्धी पोळी तूप लावून द्यायची. कधी जॅम लावून द्यायची. दोघे ही खेळता खेळता खायचे. अशा तीन चार छोट्या पोळ्या ते खायचे.
पण आताशा ती दोघेही अजून दोन पोळ्या जास्त खाऊ लागली. वाढतं वय आहे, खेळतात त्यामुळे त्यांची भूक वाढली असावी असे अम्मीला वाटले. मुलं खेळता खेळता पोटभर खातात हे पाहुन अम्मी हि खूष व्हायची. पोट भरले की ते झोपतील म्हणुन त्यांना घेवून झोपवायचा प्रयत्न करायची. झोपण्याची दुआ म्हणुन घ्यायची. छातीवर फुकायची. पण झोपण्या ऐवजी ते पुन्हा काही तरी खायला मागायचे. अम्मी विचार करायची. ऐवढे पोटभर दोघे तुप पोळी खातात, तरी पुन्हा त्यांना भूक कशी लागते ?
रोजच असे होवू लागले. आजही रोजच्या सारखीच मुलं आंगणात पोळी घेवून गेले. तेवढ्यात पोळ्या करता करता अम्मीला काही तरी काम आठवले. म्हणुन ती आंगणात गेली, पहाते तर काय सना अन समीर समोरील गणूला अर्धी पोळी खाऊ घालत होते. अन दुसरी अर्धी पोळी दोघे मिळुन खात होते. अम्मीने हे दृश्य पाहिले. तिला खूप आनंद झाला. आपल्या वाट्याची पोळी दोघे मुलं एका मुलाला देतात, अम्मीने हे सर्व पाहून न पाहिल्या सारखेच केले.
पुढेही रोज अम्मी मुलांना पोळी करतांना बोलवायची. त्यांना अर्धी अर्धी द्यायची आणि मुलांना दिसणार नाही असे लपुन रोजच हे दृश्य पहायची. हे पाहून अम्मीला खूप समाधान वाटायचे. कळत नकळत मुलांवर छान संस्कार होत होते !

– लेखन : प्रा.अनिसा सिकंदर शेख. दौंड, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800