Thursday, November 21, 2024
Homeसाहित्यकथा : उभी वाटणी

कथा : उभी वाटणी

बँकेत कारकून असणारा सदानंद नावाप्रमाणेच स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना आनंद देणारा. वृतीने कष्टाळू, कामसू, कर्तव्यदक्ष. वरिष्ठांनी सांगितलेले कुठलेही काम कुठल्याही अडचणी न सांगता तत्परतेने करणारा. त्यामुळे वरिष्ठही त्याच्यावर खूष असत.

कारकुनाची नोकरी म्हणजे अर्थार्जन जरी मर्यादित असले तरी परोपकारी स्वभाव असल्याने, कोणालाही गरज पडली तर मदतीला धावून जाणारा सदानंद. वेळ पडल्यास प्रसंगी स्वतः झळ सोसून. अर्थात तो आजूबाजूला सर्वांमध्ये लोकप्रिय होता.

सदानंद चा सुनंदाशी विवाह झाला. तीही मध्यम वर्गातून आलेली; परिस्थितीची झळ सोसतच मोठी झालेली. शिक्षण १२ वीच्या पुढे घेता आले नाही. लग्न झाले आणि सुनंदा- सदानंदचा मध्यमवर्गीय संसार सुरु झाला. हुंडा, दागिने नाही तरी काटकसरीचे बाळकडू बरोबर घेऊनच सुनंदाने गृह प्रवेश केला होता. त्यामुळे आपल्या घरात काय काय नाही ही तिची तक्रार कधीच नसे. शिक्षण कमी असले तरी कोंड्याचा मांडा करून कसे जगावे हे ती जाणून होती. स्वैंपाकात कुशल होती .अन्नपूर्णाच जणू. दोन माणसांचा संसार टाकटुकीने चालू होता.

सुनंदा स्वभावाने अबोल, शांत, समजूतदार होती. कारकुनाचे घर ते काय! साधेच होते. दोघांच्याही अंगावर साधे, सुती कपडे, बॅकेत जायचे म्हणून सदानंदचा शर्ट तेवढा थोडी फार इस्त्री केलेला किंवा बऱ्याचदा नीट झटकून वाळवून उशीरवाली ठेवलेला. सुनंदाच्या साड्या तर फारच साध्या, सुती असायच्या.
घर साधे होते तरी हातात कला असल्यामुळे सुनंदाने विणकाम, भरत काम, क्रेपची कागदी फुले असे काही ना काही करून टापटिपीने सजवले होते.

सुनंदा आपली हलाखीची परिस्थिती उघडी पडू नये म्हणून शेजारी पाजारी कुठे जात नसे. घरची धुणी भांडी, केर लादी, स्वैंपाकादि सर्व कामे ती स्वतःच करत असे.

एक दिवशी शेजारच्या ब्लॉकमधील तरुण मुलगी सकाळीच सुनंदाकडे आली. “सुनंदा वहिनी ! मी शेजारची मेधा. सासूबाईंची तब्येत बरी नाही आणि आज मला रजा मिळणे शक्य नाही. तुम्ही जमेल तसे येऊन-जाऊन माझ्या सासूबाईंकडे लक्ष ठेवाल कां ? अशी तिने विनंती केली.
“अहो त्यात काय ? हा शेजारधर्म आहे. ठेवीन हो मी लक्ष. तुम्ही निश्चिंत मनाने ऑफिसला जा. सासूबाईंची औषधे तेवढी ठेवून जा. तासाभरात आलेच तुमच्या घरी. बाकी दिवस मला मोकळाच असतो. लागूनच ब्लॉक असल्याने मला सोपे आहे.”

मेधाने सुटकेचा निःश्वास टाकला. पटापटा आवरुन ती कामावर गेली. जातांना तिने सुनंदाकडे किल्ली ठेवली. सुनंदानेही लौकर लौकर स्वतःचे घरचे काम आवरले. गरम गरम तांदळाची पेज वाडग्यात घेऊनच ती मेधाच्या घरी गेली. चावीने दार उघडून आत प्रवेश केला. सासूबाईंना नमस्कार करून तिने स्वतःची ओळख करून दिली.
“आई मी शेजारची सुनंदा. मेधाताईंना रजा मिळाली नाही, म्हणून आज तुमच्या जवळ बसणार आहे बघा, तुमच्यासाठी गरम गरम पेज आणलीय. थोडी खाऊन घ्या. तरतरी वाटेल. मग औषध पण घेता येईल.”
आजींना बसते करून तिने त्यांना पेज खाऊ घातली व त्यांचे नॅपकिनने तोंड पुसून दिले. आजी कृतज्ञतेने हसल्या.

औषध घेतल्यावर आजींचा डोळा लागलासे पाहून सुनंदाने स्वतःच्या घरी जाऊन पटकन मुगाची खिचडी केली. सकाळची बटाटा काचरा भाजी होतीच. खिचडी, भाजी, भाजलेला पापड घेऊन ती पुन्हा आली. आजी हरिपाठ पुटपुटत होत्या. तिला पाहून मंद हसल्या.
“आज देव पारोसे. पूजा नाही, नैवेद्य नाही. सुनंदा तेवढे देवावरचे निर्माल्य काढून, निरंजन लावतेस कां ग ?”
“त्यात काय येवढे” ? म्हणून तिने देवपूजाच करून टाकली. पुडीतली फुले वाहिली, साखर ठेवली, निरंजन लावले देवाला नमस्कार केला, आजींना नमस्कार केला आणि जवळ बसून हलके, हलके त्यांचे पाय दाबू लागली. आजी प्रसन्नतेने हसल्या. त्यांच्या मनात आले, ‘किती गुणाची, सुस्वभावी आहे मुलगी !’

बाराच्या सुमारास सुनंदाने आजींना खिचडी, भाजी, पापड जेवायला दिले. कोमट पाणी दिले. ताप उतरला होता. त्यांना हलके पांघरूण घालून, ती त्यांना थोपटत जवळ बसून राहिली. मेधाचा फोन आला. आजी बऱ्या आहेत हे ऐकून तिलाही आनंद झाला. तिने सुनंदाला टेबलवरचे सफरचंद, केळे खावयास सांगितले. तिचा उपासच होता. आजी उठल्यावर दोघींनी चहा घेतला. सुनंदाने त्यांना एक भजन गाऊन दाखवले. हरिविजय मधील थोडा भाग वाचून दाखवला. इतक्या वेळात दोघींची चांगलीच गट्टी जमली.
६ वाजता मेधा घरी आली. सदानंदची पण घरी येण्याची वेळ झाली होती. मेधाने सुनंदाचे खूप आभार मानले. “आभार नका मानू ताई. गरज पडली तर हाक मारा. मी येऊ शकते.”

छोटासा प्रसंग पण मेधा, सुनंदा मैत्रिणीच बनल्या. दुसऱ्या दिवशी सुनंदा आजींच्या तोंडाला चव येईल म्हणत लिंबाचे गोड लोणचे घेऊन आली. ते इतके चविष्ट होते की मेधा, आजी दोघी खूष झाल्या. थोडी देवाण घेवाण वाढीस लागली त्याबरोबरच मैत्रीसुद्धा वाढत राहिली. जाता येताना सुनंदाचे भरतकाम, विणकाम, फुले इ .कलाकुसरीच्या वस्तू मेधाच्या नजरेत भरल्या. मला पण असा टेबलक्लॉथ विणून दे सुनंदा असे म्हणत सुनंदाला उत्तेजन दिले. इतर मैत्रिणी पण स्वतःच्या ऑर्डरी देऊ लागल्या. तिचे लोणचे व कलाकुसर यांनी तिला प्रसिद्धी मिळाली. थोड्या प्रमाणात पैसेही घरबसल्या हाती येऊ लागले.

अशातच सुनंदाला दिवस गेले. “हुषार, कर्तृत्ववान मुलगा होऊ दे !” आजींचा आशीर्वाद होताच. तसेच झाले. मुलगा  झाला. तो हुषारच निघाला. मनोज नाव ठेवले. आता आर्थिक गरज वाढली. मुलाला वाढवायचे, उत्तम शिक्षण द्यायचे हे  ध्येय समोर उभे राहिले पण तेही आव्हान सुनंदाने स्वीकारले. मेधाच्या सासूबाईं जवळ एक दिवस राहून प्रेमळ स्वभावान तिने त्यांना दोघींना केव्हाच जिंकले होते. आता मेधाच्या प्रोत्साहनाने वर उल्लेखलेले बारीक उद्योग करून त्यातून कमाई वाढू लागली. लोणच्याच्या जोडीला मैत्रिणी लाडू, चिवडा, चकल्या, शंकरपाळे अशा पदार्थांची ऑर्डर देऊ लागल्या. एका गरजू स्त्रीच्या मदतीने सुनंदा हेही पार पाडत होती. जोडीला कलात्मक बाळंतविडे ती तयार करू लागली. उच्च जातीत जन्मल्यामुळे वरील सर्व गोष्ट घरात राहून करता येत होत्या. सदानंदला तिचा फार अभिमान वाटे. लहानगा मनोज आईबाबांचे कष्ट, आर्थिक ओढाताण जवळून पहात होता. त्याला सारे समजत, उमगत होते. खूप अभ्यास करून त्याने उत्तम डिग्री मिळवली. लगेच चांगली नोकरी मिळाली. सर्वप्रथम त्याने आईला कष्ट कमी करावयास लावले. आता केवळ हौस म्हणून थोडे कष्ट करायचे.

दोन वर्ष नोकरी झाल्यावर मनोजचे लग्न झाले. सुस्थितीतील, शिकलेली सून मिळाली. रोहिणी नाव होते. लग्नानंतरही ती नोकरी करत राहिली. त्यामुळे सुनंदाच्या हातचे स्वैंपाक घर सुटले नाही. रोहिणीचे  बाळंतपण तिने आनंदाने नीट पार पाडले. कुटुंब विस्तार झाला. मनोज व रोहिणीने नोकरीतून कर्ज काढून दोन खोल्यांचे घर घेतले. सदानंदनेही निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडातून काही रक्कम घरासाठी दिली. एक खोली सदानंद सुनंदा व दुसरी मनोज रोहिणी, बाळाला अशी वाटणी झाली. हळूहळू घर लहानच पडू लागले. आईबाबांचे वय वाढत होते. तब्येतीच्या कुरबुरीमधे भर पडत होती. औषधांवर खर्च वाढत होता. सुनंदाच्याने फारसे काम होत नव्हते. खर्चात काटकसर शक्य नव्हती. फळे, दूध आधी साहजिक बाळाच्या वाटणीला. घर लहान पडू लागले. रोहिणीची काटकसर समजत होता. मधून मधून तोंडही वाजत होते. रोहिणीचा धुसफुसाट कानी पडत होता. जन्मभर काटकसर, कष्ट केलेल्या सदानंद – सुनंदाला ही मानहानी सहन होईना अखेर एक दिवस दोघांनी आपणहून वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय व्यक्त केला.
“तुमची अडचण करून राहण्या पेक्षा आम्ही दोघे वृद्धाश्रमात जाऊन राहतो. पेन्शनमध्ये आमचे भागेल. मनोज तू सूज्ञ आहेस, वाईट वाटून घेऊ नको. बाळाला नीट वाढवा.”

मनोजच्या  शांत, गरीब स्वभावामुळे ही वेळ आली. रोहिणीच्या हट्टापुढे आपण आईबाबांना दुरावलो ही खंत त्याच्या मनाला लागून राहिली. तो तिच्याशी संभाषण टाळू लागला. आईबाबांबरोबर घरातील आनंद वृद्धाश्रमात गेला. काही वर्षातच दोघांचे वृद्धाश्रमातच निधन झाले.
मनोज एकटा पडला. अधिकच अबोल, अंतर्मुख झाला. सदैव काहीतरी विचारात गढलेला असायचा. आयुष्याची संध्याकाळ गडद होत होती. अशाच एका संध्याकाळी मनोजने कायमचे डोळे मिटले. हातात मृत्युपत्राचे कागद होते.
“माझ्या पश्चात ह्या आमच्या राहत्या घराची ‘उभी वाटणी’ करावी. घराचा उभा अर्धा भाग रोहिणी व बाळास मिळावा. जिच्या हट्टामुळे हे घडले. उरलेला अर्धा उभा भाग ज्या वृद्धाश्रमाने माझ्या वृद्ध माता पित्यांना संभाळले त्या आश्रमास मिळावा.”
अशाप्रकारे उभी वाटणी करून अबोल मनोजने रोहिणीवरील राग व्यक्त केला. अशी वाटणी करून त्याने तिला एक प्रकारे घराबाहेरच काढले. कारण घराची उभी वाटणी कशी करणार ? विकणे भाग होते. रोहिणीपुढे एका खोलीत राहण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

सुलभा गुप्ते

— लेखिका : सुलभा गुप्ते. पुणे (सध्या कैरो ईजिप्त)
— संपादक : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments