“ते गेले.”
पहाटे पहाटे आलेला फोन. वैतागच आला खरं तर त्याला.
‘नेहमीच कसा अवेळीच त्रास देतो हा ?.’
हा विचार आला आणि लगेच त्याने स्वतःला सावरलं.
‘आज तरी नको.’ म्हणत उठलो. ‘चहा घेऊनच जावं’ म्हणत, चहा केला. बायकोचा चहा झाकून ठेवला. एक चिट्ठी लिहून ठेवली, तयार झालो आणि निघालो. स्कूटर ने अर्धातास तरी लागणार होता. स्कूटर धावत होती आणि त्या बरोबर आठवणी ही.
बाबा जाताना एक जबाबदारी सोपवून गेले होते ह्याची. तो मला कधीच आवडला नाही. काळा, खुजा, बोलताना अडखळणारा, बारीक डोळे बोलताना जास्तच बारीक व्हायचे. त्यांच्याशी बोलायला गेलो तर तो हात हातात घेण्याचा प्रयत्न करायचा. पण मी त्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होऊ दिला नाही. एक अंतर ठेऊनच मी बसायला लागलो होतो.
माहित नाही. का ? पण मला वाटायचं तो माझ्याकडे खूप मायेने बघायचा. तसं त्याच माझं काहीच नातं नव्हतं. मग ?
बाबा सांगायचे त्याला जवळचं असं कोणीच नव्हतं. तो बाबांचा मित्र होता अगदी जिवश्चकंठश्च. मला आश्चर्य वाटायचं की बाबा आणि ह्याची मैत्री झालीच कशी ?
बाबा दिसायला सुरेख, हुशार, कर्तबगार. माझी आई ही सुंदर आणि हुशार. अनेकदा वाटायचं मी आई सारखा दिसतो. कधी विचारायला गेलो तर ती हसून फक्त गालांवर थोपटायची.
इतक्या वेळात मी त्याच्या घरी पोहोचलो होतो. शेजारचे चार सहा लोक बाहेर उभेच होते. मी घरात शिरताच ते ही घरात आले.
“गेले दोन महिने आजारी होते. आम्हांला जमेल तितकी सेवा आम्ही केली. देव माणूस होते हो. मदतीला अगदी धावून यायचे. ऊन, पाऊस, रात्र, दिवस काही काही बघायचे नाहीत.”
मी चमकलोच. ह्या माणसात कौतुक करण्यासारखे काही होते ? हलके हास्य चेहऱ्यावर आले.
घरात शिरलो आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे घरातील नीटनेटकेपणा. तशा वस्तू कमीच होत्या घरात, पण ज्या होत्या त्या स्वच्छ आणि जागेवर.
‘शेजाऱ्यांची मेहेरबानी दुसरं काय ?’ विचार आला.
सारे क्रियाकर्म उरकले आणि मी जायला निघालो तेव्हा, “इतर दिवस कसे करायचे ?”
हे तिथल्या लोकांनी विचारलं.
“नंतर कळवतो”
म्हणत मी निघणार तितक्यात टेबलावर ठेवलेल्या एका डायरीकडे माझं लक्ष गेलं. त्यावर माझा लहानपणचा फोटो चिकटवलेला होता आणि सोनू असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. फोटो अजूनही चांगल्या अवस्थेत होता. मी माझ्या नकळत ती डायरी उचलली आणि सगळ्यांचा निरोप घेतला.
घरी पोहोचल्यावर बायकोने विचारलंच,
“झालं का सगळं ?”
“हो ! बाबांचा मित्र वारला. त्यांचं सगळे उरकून आलो.” माझं रुक्ष उत्तर ऐकल्यावर ती ही कामाला लागली आणि मी ही आंघोळीला गेलो.
ऑफिस करुन घरी आलो तर घरात शुकशुकाट.
‘काय झालं असावं ?’
विचार करत, आत शिरलो. घरात अंधार. एक मिनिट मनाचा थरकाप उडाला. धडपडत लाईट लावले. बघितलं तर बायको सुजलेले लाल डोळे घेऊन सोफ्यावर बसलेली. मी घाबरुन तिच्याकडे धावलो,
“काय गं ! काय झालं ?”
तिने एक क्षण माझ्या नजरेला नजर दिली आणि ती सकाळची डायरी पुढे केली.
“काय करून बसलात ? त्याची तुम्हाला ही कल्पना आहे का ? बापरे ! कसं सगळं सहन केलं असेल बाबांनी ?”
म्हणत ती हुंदकेच घेऊ लागली. “कोण बाबा ? कुणा बद्दल बोलते आहेस ?”
म्हणत मी ती डायरी हातात घेतली.
“तुम्ही वाचा. आता पश्चात्ताप करण्याशिवाय तुम्ही काहीही करु शकणार नाही.”
खरं तर मी लवकर उठून त्याची सर्व कामं करून, ऑफिसची कामं करून खूप थकलो होतो. परत विचार आला, अवेळी त्रास देणं सुरुच आहे ह्याचं ! तरी ही डायरी वाचायला लागलो. ती डायरी होती की दारुण दु:खाची ज्वाला ? ज्यात त्याने स्वतःला जाळून घेतलं होतं आणि उरली होती फक्त राख. तिला सोबत घेऊन तो जगत होता ?
डायरी वाचून मला जोरात ओरडावंसं वाटलं. धाय मोकलून रडावसं वाटलं. स्वतः ला बदडावंसं वाटलं.
शी, मी नलायकपणाचा कळस गाठला होता. ह्या जन्मी तरी मी मलाच क्षमा करु शकणार नव्हतो.
कां ? कां ? मी असा वागलो ? त्याच्या डोळ्यातील मायेचा अर्थ आत्ता लागून काय उपयोग ? त्याला माझे हात हातात घ्यायचे असायचे. तो त्यासाठी आसुसलेला होता. पण मी त्याला स्पर्श करु देत नव्हतो, हे आत्ता जाणवतंय पण आता माझ्या हातात काही नव्हतं.
लहानपणापासून रंग रूपावरून हिणवला जाणारा तो, माझा आधार घेऊ पहात होता आणि मी सगळ्यात जास्त त्यांच्याशी चिडत राहिलो.
सोमेशला डायरीतला एक एक शब्द आता उलगडत होता.
श्रीनिवासने बायको गेल्यावर पहिल्यांदा आपल्या दोन वर्षांच्या मुलाच्या सोनू डोळ्यात तिरस्कार बघितला होता. त्यानंतर हात झिडकारणं, जवळ न येऊ देणं, पापी देणं तर दूरच. हे सगळं असह्य होऊन मुलाच्या आनंदासाठी आणि त्याने आपल्यासोबत विषादाने जगण्यापेक्षा शेजारी नवीन रहायला आलेल्या पण लहानपणापासून त्याचा घनिष्ठ मित्र असलेल्या, अनमोल शेट्टी ह्या पत्नी पत्नींना त्याला सोपवण्याचा निर्णय घेतला, तो काळजावर दगड ठेवून, अनेक रात्रीच्या जागरणाने विचार करून. ते जोडपं अनेक वर्षांपासून नि:संतान होते. त्यांना सर्व सांगून आणि गळ घालून त्या पोराला त्यांच्या सुपुर्द केलं.
दूरुन तो त्याची प्रगती बघू लागला.
कधी तरी भावना उंचबळल्या की यायचा तो अनमोलकडे. पण हाती काहीच लागायचं नाही. पुढे पुढे तर तो आला की सोनू घरातून निघूनच जायचा.
काही वर्षाने अनमोल आणि त्याच्या पत्नीचा एका अपघातात मृत्यू झाला. जाताना, “त्यांच्याकडे लक्ष दे. तो..” इतकं बोलता बोलता अनमोलचा श्वास संपला होता.
हे सोमेशला आठवलं.
पण सोमेशने त्यांच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. उलट तो कधी भेटायला आला तर बाहेरच बसवून एका टाकाऊ कपात त्याला चहा देऊन, त्याच्याशी न बोलताच त्याचा निरोप घ्यायचा.
आता त्याने दूर दुसरे घर घेतले. नंतर कधीच भेट झाली नाही.
डायरी वाचून झाल्यावर त्याच्या मनात हे विचार घुमायला लागले.
हा तर माझा बाप होता जो माझी घृणा मनात ठेवून जगत राहिला आणि न भेटता निघून गेला. मी त्याला स्पर्श ही केला नाही शेवट पर्यंत. शेवटी खांदा दिला पण हात नाही.
एकदा परत ये …..मीच तुझा हात हातात घेईन. मीच तुझी पापी घेईन…..एकदा तरी ते रे…..म्हणत सोमेशने हंबरडा फोडला…..

– लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
