‘नदीला पूर आला… पूर ! मोठठा पूर आला रे !’….दगड्या गावभर सांगत फिरत होता. आम्ही मित्रांनी, एकमेकांना फोन करून, आवाज देत नदीकिनारी पूर पाहण्यासाठी जमलो. नदीच्या पूरात तीन – चार डुकरे, वासरे वाहत चालली होती. अर्धमेली वाटत होती ती !… तेवढ्यात सदा म्हणाला.. “एवढं काय वाईट वाटून घ्यायचं त्यात ?” मी म्हणालो, अरे सदा, पाळीव प्राणी आहेत ती .’गरिबांचं जनावर म्हणजे ते त्यांचं धन असतं !’
सदाला व गावकऱ्यांनाही माझं म्हणणं पटलं.. सर्वांनी हळ हळ व्यक्त केली. पुराच्या पाण्यात गवत पेंड्या, वृक्षांची खोड, गरिबांच्या झोपड्या, त्यांचे संसार साहित्य, शेतीचे अवजारे सारं काही वाहत होते…. आणि आम्ही सर्व गाववाले स्वत:च्या डोळ्यांनी फक्त पाहत होतो. सकाळपर्यंत पूराचे पाणी ओसरेल अशी समजूत काढून आम्ही रात्री घरी पोहोचलो.
सकाळी चर्चा सुरू झाली “सात – आठ दिवसांनी ही पाण्याची पातळी नागमोडी होईल” एवढेच काय ते नदीच्या पुराचे महत्व.. रात्रंदिवस जुन्या नव्या आठवणी त्यांची चर्चा केली जाते. पुरामुळे पाण्यात वाहून गेलेल्या वस्तूंचे, आर्थिक नुकसानीची सर्वत्र चर्चा होते. मात्रं रात्रीतून ते सारे काही लोक विसरतात… आपल्या रोजच्या दैनंदिन कामात मग्न होतात… आणि संसाराच्या राहाटात गुरफटून जातात…

नदी आठ महिने कोरडी असते तेंव्हा तिची कोणी काळजी करीत नाही. तिच्या कडे कोणी पाहत सुद्धा नाही. नदीला किती किती वाईट वाटत असेल ?… आपण कल्पना न केलेली बरी !
मानव किती स्वार्थी, मतलबी ! आपण ताज्या घटनेकडे पाहणारे.. ‘जुने ते सोने’ म्हणतात.. माणूस फक्त बोलणाऱ्या माणसाला.. कान उघडेपर्यंत बोलणाऱ्याला… कोर्टात जाणाऱ्या व्यक्तीलाच तेवढा घाबरतो ! नदी- माय बिचारी मानवाला काहीच करू शकत नाही. नदीला देवाने बोलण्यासाठी तोंड दिले असते तर ? नदी माय अशी बोलली असती… (म्हणाली असती…) “अरे मानवांनो, लेकरांनो… पावसाळ्यात जेंव्हा मला पूर येतो, तेव्हा तुम्ही सारे लहान मुलं- मुली बाया – बापडे, सुखी- दुःखी लोक, मला आलेले आनंदाचे भरते, फेसाळणारा पूर पहायला येतात…. किती रे ! आनंद होतो मला… तुम्ही गप्पागोष्टी करता, आठवणी काढता ! एवढेच नव्हे… मी तर गाव गाड्याची, शेतीतील सारी घाण वाहून नेते… तलाव, बंधाऱ्यात तुम्ही जीवनासाठी, रोजच्या वापरासाठी पाणी साठवून ठेवता ! शेतीसाठी, वापरासाठी माझ्या पाण्याचा उपयोग करतात ! मात्र आठ महिने काटेरी गवत, विषारी वनस्पती, वेली वाढतात… ते मात्र तुम्ही काढत नाहीत. गटारीचे घाण पाणी, चिखल, मेलेली जनावरे, पूजेचे निर्माल्य, रोजची घाण सर्वकाही माझ्या अंगावर टाकता !…. माझ्या शरीरावर जखमा होईपर्यंत वाळू, माती ओरबाडता ! मला यातना देता !… मोठठाले खड्डे खणता… माझ्या नदीपात्रात घरातील, गावातील केरकचरा आणून टाकतात. तेंव्हा… तेव्हा कुठे जातात तुमचे सुविचार ?… सुबुद्धी.. सारे मतलबी ? किती किती रे कृतघ्न तुम्ही ?…

“पूर्वी मी आठ महिने अखंडपणे वाहत असे… तर चार महिने कोरडी असतांना गावातील तरुण माझ्या पात्रात लहान मोठे देशी खेळ, कबड्डी, खो-खो, मर्दानी खेळ खेळत असत.. माझ्यामुळेच पहिलवान गडी,देशासाठी फौजी, निरोगी शरीर घडत असे”… ‘निरोगी शरीरात निरोगी मन वास करते म्हणतात ‘ तेच कार्य मी करत होते. लहान लहान मुली, सासुरवाशिनी मातीत फुगड्या खेळत.. मातीत लोळण घेत.. किनाऱ्यावरील माती पासून घर कामासाठी विटा, कुडाच्या भिंती लिंपायला माती, घराच्या पायात भर म्हणून माती टाकत असत.. भांडी घासायला ही उपयोग होत असे.. एवढेच नव्हे तर… भरपूर छंद वेडे मुलं मुली शंख, शिंपले, पांढरे दगड, काळे दगड आटया- पाट्या खेळा साठी वापरत असत. भर दुपारी, उतरत्या दिवसाला म्हातारी माणसं गारवा, थंडावा मिळावा म्हणून माझ्या किनाऱ्या लगतच्या वडाच्या झाडाखाली येऊन बसत… तेव्हा माझा एक आगळाच रुबाब होता. नदीपात्रात केर कचरा, घाण टाकणे.. कचरा टाकणे म्हणजे पाप अशी जन- माणसात भावना होती. किती स्वच्छ, निर्मळ नि आनंदी होती मी तेंव्हा ! गेले ते दिवस…. राहिल्या त्या फक्त आठवणी !… फक्त आठवणी..!
बाळांनो ! लेकरांनो ! अजून सुद्धा वेळ गेलेली नाही…. मी तेवढीच स्वच्छ, निर्मळ, सुंदर, रम्य होऊ शकते… जर तुम्ही घाण टाकणे बंद केले, काटेरी झुडपे, विषारी वनस्पती, गवत स्वच्छ केले.. घाण टाकणाऱ्या मानवाला दंड केला… तर ! तर.. पूर्वीचे वैभव पुन्हा या तुमच्या दीन मायला येऊ शकते… मग.. मग तरुणांनो करणार ना विचार..?

— लेखन : गोविंद पाटील. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800