पुन्हा आज तीच नव्हे तशीच बरसात होती..अगदी मंद पण गार वारा आणि अलवार पडणारे पर्जन्याचे ते शिंपण..पुन्हा पुन्हा तोच क्षण आठवत होता तिला. पण आज तो येणार नाही हे माहीत होते तरीही कुठेतरी मनातल्या एका छोट्याश्या कोपऱ्यात त्याच्या येण्याची आस होती…तो यावा ह्याची इच्छा होती.
तेवढ्यात चपला चकाकली, ती घाबरली आणि तिने त्याने दिलेल्या त्याच्या उपरण्याला उराशी घट्ट धरले..अचानक तिला वाटले जसे ती त्याच्याच मिठीत आहे. तिने लोचन मिटून दिले घट्ट..जाणो हे स्वप्न तिला तुटू द्यायचे नव्हते.
बाहेरच्या वातावरणातील बदल पण तिला मिटलेल्या लोचनांनी दिसत होता.
समोर उभा असलेला घननिळा..त्या घननिळ्या वादळाच्या मागून आला होता.तिच्या आर्तव हाकेला..!
तिच्या प्रेमाचा स्वीकार करून !
आकंठ त्याच्या प्रेमात बुडलेली ती, त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होती.
तोच हसतमुख चेहरा..तेच गूढ नयन, तेच सरळ नाक, सगळे सगळे तसेच होते..मस्तकी तसेच मोरपीस .. काही शंकाच नव्हती..तिचा माधव आला होता परत तिच्या जवळ.
लोक उगीच म्हणायचे तो तुला सोडून गेला म्हणून..
त्याच्या कडे तृप्त दृष्टीने पाहून म्हणाली, “मी सांगेन सगळ्यांना “पहा.. पहा सगळे…तो आलाय …तो आलाय पुन्हा…. माझ्या जवळ..नाही गेला तो सोडून मला..बघा..बघा सगळे”
तिने खूप प्रेमाने बघितले कान्हाकडे.
आज नेहमीचा हसमुख कान्हा थोडा वेदनेत वाटत होता..
तिने विचारले, “काय झाले कन्हैया, आज चेहरा पुलकित दिसेना. कष्ट काही आहेत का ? सांगावे मला आपले समजून”
नटवर फक्त हसला..गोड हसला.
तिने पुन्हा विचारले, “मला सांगण्यासारखे नाही का ? नव्हे तुम्हाला मला ते सांगायचे नाहीये का ?”
निशब्द उभा राहिला श्याम.
आता मात्र तिला त्याचे येणे हा भासच आहे हे जाणवले..”कारण खरंच जर तो आहे तर बोलेल ना माझ्याशी..मला जवळ करेल..पण हा…!”
तिने स्वतः ला चिमटा घेऊन पाहिलं. वेदना झाल्या अंगी..म्हणजे हे स्वप्न नाही तर..तो आहे समोर.
खरंच…प्रत्यक्ष उभा. ह्रदयतील वेदना बाहेर आल्या, “कान्हा.. कान्हा..असे नको करुस..बोल माझ्याशी काहीतरी..मी इतक्या दिवसांपासून नव्हे वर्षांपासून .. इथेच ह्याच जागी रोज तुझी वाट पाहते..तू म्हणाला होतास एक छोटेसे काम आहे, झाले की येतो परत…का गेलास रे मला सोडून ?.. बरं, सोडून गेलास तर गेलास, माझ्याशी खोटे बोलून का गेलास. जाताना ही बंसरी मला देत गेलास, पण ह्यातला श्वास, ह्यातले स्वर तू घेऊन गेलास, का ? सगळे म्हणायचे मी तुझी लाडकी होते..पण तू तर मला अगदी एकटी सोडून निघून गेलास, का ? तू रागावला होतास का ? आणि आजही आला आहेस, पण एका शब्दाने तू माझ्याशी बोलत नाहीयेस..एवढेच काय चेहऱ्यावरचे हास्य पण छद्म वाटते आहे रे.
त्या दिवशी पळून गेलास..पण आज दे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे..अजून किती दिवस पहायची मी वाट सांग मला ?”
मुरारी असहज झाले ते तिच्याही लक्षात आले..पण मुरारींनी तिच्याकडे पाठ केली आणि बोलायला सुरुवात केली, “राधे ! मी छोटेसे कामच करायला गेलो होतो..ते काम म्हणजे धर्माचे अस्तित्व टिकवायला.. पण वेळ लागला ग. तुला बासुरी देऊन गेलो होतो कारण मी काम करायला गेलो होतो चंगळ करायला नाही..आणि दुसरे महत्वाचे म्हणजे तू नसताना कुणासाठी वाजवणार होतो मी ती बासुरी, सांग मला ?
माझे स्वर, संगीत, साधना सगळेच तुझ्यासाठी होते.. पण तू नव्हतीस सोबत. “माधवच्या शब्दात वेदना जाणवत होती, “आणि हो तुझ्याशी रागवायचा प्रश्नच येत नाही, कारण तू तसे कधी वागतच नाहीस..पण मी स्वत:वरच रागावलो होतो..तुझ्या निर्मळ प्रेमात अडकून मी जे कार्य करायला जन्म घेतला होता तेच विसरलो होतो..तुझ्या प्रेमाने मला भुरळ घातली होती.. म्हणून जाताना तुझ्या त्या प्रेमळ डोळ्यात डोळे घालून बघायची पण भीती वाटली मला. वाटले पुन्हा बघितले तुझ्या डोळ्यात तर अडकेन पुन्हा.. म्हणून लपून पळून गेलो. त्याकरता क्षमस्व. मला क्षमा करशील राधे ?
तू लाडकी होतीस नाही, अजूनही आहेसच पण म्हणून तू माझी दुर्बलता बनावी आणि लोकं तुला नावे ठेवावीत, अशी माझी इच्छा नव्हती म्हणून गेलो सोडून. पण लाडकी आहेस म्हणूनच तुला उत्तर द्यायला परत आलो.”
“खरंच कान्हा तू फक्त ह्यासाठीच परत आलायस ? एकदा माझ्याकडे बघून बोल पुनः, तू खरंच फक्त मला उत्तरे द्यायला परत आला आहेस ?” विव्हळत तिने विचारले कारण आज तिला त्याच्या शब्दात चंचलता किंवा खरेपण दोन्ही भासत नव्हते.
“हो फक्त तुला जीवनातील शाश्वत सत्य सांगायला आलो आहे मी !”
“आणि काय आहे ते शाश्वत सत्य ?”
“मृत्यू !”
“बरं म्हणजे तू तुझे दिलेले वचन पूर्ण करावयास आला आहेस तर !”
“….”
“चल घेऊन चल..जिथे योग्य वाटेल तिथे..तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे मी..मी तयार आहे तुझ्या सोबत यायला फक्त माझी एकच अट आहे की ह्यावेळेस तू मला एकटे नाही पाडायचे.”
नारायणाने मस्तकावरचे मोरपिस काढले आणि हळूच राधेच्या मस्तकापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत फिरवले..आणि त्या मोरपिसात आलेल्या राधेचा प्राणाला स्वतच्या मस्तकी धारण करून पुन्हा निघाला कर्मयोद्धा आपल्या ठरवलेल्या कामांवर.
वसुंधरेच्या मांडीत विसावलेल्या तिच्या नश्वर देहाला बघून, त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार आकाश, पर्जन्यरुपात अभिषेक करत होता.

– लेखन : सौ. अनला बापट. राजकोट
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

सौं बापट यांनी लिहिलेली कथा छान, नाट्यरूप संवाद उत्तम पण त्यातील ” चंगळ ” शब्दाऐवजी मजे खातर सारखा शब्द वापरला असता तर ठीक झाले असते कारण तो शब्द बसरीच्या अनुषंगाने वापरला आहे.