चार बहिणी
एका गावात चार मुली रहात होत्या. वडील गावातीलच प्राथमिक शाळेत शिक्षक. अर्थात उत्पन्न तुटपुंजे. आर्थिक परिस्थिती हलाखीची. डोक्यावर छत्र दारिद्रयाचे ! पदरी चार जणी पाठोपाठच्या. खायला पुरेसे अन्न कधीच नाही. सर्वांनाच कुपोषण. उपासमार व पाठोपाठ चार बाळंतपणांनी पत्नीची तब्येत खालावलेली. ती अंथरुणाला खिळून !
मोठी मुलगी वयात येताच पत्नीने तिचे लग्न करण्याचा हट्ट धरला. “मी आता जास्त वाचणार नाही. माझ्या डोळ्यांदेखत एका तरी मुलीचे लग्न करा”.
गावातीलच तोडीस तोड गरीब असलेल्या एका बिजवराशी तिचे लग्न करून दिले. त्याला दोन मोठी मुले होती. जवळपास आईच्याच वयाची १२ व १०. मुलगी निमूटपणे लग्नाला तयार झाली. लग्न होताच दोन मुलांची आई झाली. गरिबीचा संसार सुरु झाला. तिला स्वतःचे मूल झालेच नाही.
मास्तरांच्या घरच एक खाणारे तोंड कमी झाले. मुलीच्या आयुष्याची अशी माती झालेली पाहून आईने लौकरच प्राण सोडले. खाणारे आणखी एक तोंड कमी झाले.
मोठ्या बहिणीचे लग्न व आईचे निधन झाल्यावर दोन नंबरची मुलगी वडिलांचा संसार चालवू लागली. ती दिसायला रंग रुपाने देखणी होती. त्यामुळे गावातीलच एका श्रीमंत माणसाने तिला मागणी घातली. मोठ्या मुलीचे लग्न अगदीच गरीब, विधुर, पदरी दोन मुले असलेल्या माणसाशी परिस्थिती पायी करावे लागले त्याचे दुःख मास्तरांच्या मनात होतेच त्यामुळे निदान दुसरी मुलगी तरी श्रीमंत घराण्यात पडतेय हे पाहून जराही आढेवेढे न घेता, मास्तरांनी आनंदाने होकार दिला. लग्न होऊन मुलगी सासरी गेली.
घरात गडगंज श्रीमंती होती. लग्नानंतर नवऱ्याने तिला दागिन्यांनी नखशिखांत मढविले. साड्यांची तर रेलचेल होती. घरात गडीमाणसेही भरपूर होती. पण दुर्दैवाने पाठ सोडली नव्हती. ती सुंदर असल्यामुळे तिला घराबाहेर कुठेही जाण्यास मज्जाव होता. (हो! कोणाची वाकडी नजर पडू नये म्हणून) लौकरच तिच्या लक्षात आले की नवरा बाहेरख्याली होता. शेजारच्या खोलीत नित्य नवी बाई येत होती. त्याचे बिंग बाहेर पडू नये म्हणून संध्याकाळ नंतर नोकरा चाकरांना घरात येण्यास बंदी होती. घरात येणाऱ्या चवचाल बायकांची व नवऱ्याची सरबराई हिलाच करावी लागे. तीही विनातक्रार ! काही दिवसांनी हे सुद्धा कळले की नवऱ्याची अशी चालचलणूक बघून पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती.
इकडे मास्तर मात्र मुलगी श्रीमंत घरात, दागिन्यांनी मढलेली, दहा नोकर घरी असल्याने कामाचे ओझे नाही, खाऊन, पिऊन मजेत आनंदात असेल ह्या समाधानात होते !
दरम्यान मास्तर वृध्द झाले. सेवानिवृत्तही झाले होते. आणखी दोन मुलींची लग्ने करण्याची जबाबदारी होती. चौथी मुलगी अजून वयाने लहान होती. तिसरी मुलगीच स्वैंपाक व इतर गृहकृत्ये करून घर सांभाळत होती. घर चालविण्यासाठी तिची गरज होती. ती रंगरुपाने सावळी दिसायला अगदीच साधारण होती. पण बुद्धीने हुषार होती.
म्हातारे वडील, पाठची धाकटी बहीण व घरसंसार चालवून तिने शाळेत जाण्याची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. ती जिद्दीने शाळेत जात राहिली व उत्तम रीतीने दहावी पास झाली.
पण जननिंदेपासून कधी कोणाची सुटका झालीय ? अखेर तिच्याही लग्नाचा विचार करण्याची वेळ मास्तरांवर आली.
शेजारच्या गावात एक मध्यमवयीन स्थळ असल्याचे कळले. गरिबीपुढे पर्याय नसतो. साधारण रुपाच्या, गरीब मुलीशी कोण लग्न करणार ? नाईलाजाने तिचे लग्न करून दिले. खण व नारळ देऊन.
लग्नानंतर कळले, पतीमध्ये शारीरिक व्यंग होते. पाय अधू व दृष्टि कमी होती. त्याचा गैरफायदा घेऊन आजूबाजूचे लोक फसवत असत. त्याचे एक छोटेसे दुकान होते.
परिस्थिती लक्षात येताच पत्नीने दुकान ताब्यात घेतले. अर्थ व्यवहार पाहू लागली. मुळातच ती बुद्धिमान होती त्यामुळे हिशोब चोख ठेवू लागली. फसवणूक बंद झाली. हळूहळू धंद्याला बरकत आली.
मधल्या काळात दोन मुली झाल्या. तिने न डगमगता मुलींना उत्तम शिक्षण देऊन स्वतःच्या पायांवर उभे केले. एक मुलगी डॉक्टर व दुसरी इंजिनियर झाली.
वयोवृद्ध पतीचे निधन झाले पण दोन्ही मुली आपापल्या संसारात सुखी असून आईचा उत्तम संभाळ करत आहेत.
आता मास्तर खूपच वृद्ध झाले होते. धाकट्या मुलीचे लग्न केले की आपण सुखाने मरु असे त्यांच्या मनात येई . मुलगी वडिलांची उत्तम काळजी घेत होती. तिनेही मोठ्या बहिणी प्रमाणेच दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. स्वभावाने अतिशय गुणी, मनमिळावू होती.
शेजारच्या गावात एक जोडपे रहात होते. या मुलीच्या गुणांची माहिती त्यांच्या कानांवर पडली. त्यांचा मुलगा आर्मी ऑफिसर होता. त्याचे प्रथम लग्न झाले होते. पत्नी डॉक्टर होती पण लग्नाला दहा वर्षे झाली तरी मूल झाले नव्हते आपल्या मुलाने दुसरे लग्न करावे म्हणून ते मुलाच्या मागे लागले होते. मुलगा रजेवर येताच त्यांनी मुलाचे दुसऱ्या लग्नासाठी मन वळवले. दुसऱ्या दिवशी आईवडील व मुलगा मास्तरांच्या घरी आले आणि लग्नाचा प्रस्ताव मांडला. मुलाची संपूर्ण माहिती, काहीही न लपवता पुढे मांडली.
“आम्हाला नातवंड हवे आहे, घर संभाळणारी सून हवी आहे. तुमची आमची जात, भाषा वेगळी असली तरी आमची हरकत नाही. आम्ही संभाळून घेऊ. तुम्हालाही एकटे पडू देणार नाही.”
मुलीचे वय एव्हाना २० झाले होते. सर्व अटी कबूल करून तिच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या आर्मी ऑफिसरशी तिचे लग्न झाले. तिचे वय २० व पतीचे ३५ हे आपण आतापर्यंत पाहिलेच. लग्न करण्यात आजी – आजोबांना नातवंड पाहिजे हाच उद्देश त्यांनी आधीच स्पष्ट सांगितला होता. मुलीच्या होकार नकाराचा प्रश्नच नव्हता.
लग्न होऊन ती सासरी आली. सासू – सासरे स्वभावानी खूप चांगले होते. सासरे सुशिक्षित होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सुनेला जवळ बसवून मोडक्या तोडक्या हिंदी व इंग्रजीचा आधार घेत त्यांनी संगितले, “तुझी सासू घर संभाळेल, तू काळजी करू नकोस. आम्ही मराठी भाषिक आहोत आणि तुमची भाषा तामीळ आहे. सहा महिन्यात तू मराठी भाषा बोलणे, वाचणे शिकून घे. म्हणजे तुला सासूशी व इतर नातेवाईकांशी बोलण्याचा, मिसळण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. मी तुला भरपूर पुस्तके अभ्यास करण्यासाठी आणून देईन. दिवसा सासूला थोडी मदत करत जा व रोज रात्री, त्या दिवशी काय शिकलीस ते मला सांगत जा. मी मदत करीन”.
मुलगी आज्ञाधारक, सुस्वभावी व कष्टाळू होती. तिने तीनच महिन्यात मराठी बोलणे, वाचणे शिकून घेतले. सासूशी संवाद सुकर झाला. नवरा आर्मीतला त्यामुळे त्याच्याशी तुटक मुटक इंग्रजी बोलून तेही सुधारत होते. तिचा आत्मविश्वास वाढत होता. लौकरच पतीची बदली बॉर्डरवर झाली. हिला दिवस गेले होते. त्यामुळे तिला पतीबरोबर जाता आले नाही. तिची सवत डॉक्टर होती आणि कोल्हापूरला प्रॅक्टीस करत होती. तिला दिवस गेल्याचे कळताच ती स्वतः कोल्हापूरहून येऊन तिला आपल्याकडे घेऊन गेली. नऊ महिने पूर्ण होईपर्यंत तिने हिचा खूप प्रेमाने व चांगला संभाळ केला. पौष्टिक जेवण खाऊ घातले. सकाळ, संध्याकाळ फिरायला नेऊन व्यायामाची काळजी घेतली. अशा रीतीने ती तिची सर्वतोपरि उत्तम काळजी घेत होती. स्वतः गायनॅकॉलॉजिस्टच असल्याने हिचे बाळंतपण देखील तिने पार पाडले.
बाळ जन्मले आणि हिचा दैवदुर्विलास सुरु झाला. बाळाला ती सवत लगेचच आपल्या खोलीत घेऊन गेली. बाळ तिने स्वतःच्या ताब्यात घेतले. ती अवाक् झाली वयाच्या २०/२१ व्या वर्षी इतके सारे पुढे होईल अशी बिचारीने कल्पनाही केली नव्हती !
इथे मला कृष्णाला देवकीने जन्म दिला पण लगेचच ते बाळ तिच्या पुढयातून उचलून वसुदेवाने टोपलीत ठेऊन यशोदेकडे नेले तीच आठवण येते.
फक्त ठराविक वेळी, अंगावर दूध पाजण्यापुरते बाळ हिच्या मांडीवर आणून ठेवी आणि स्वतः जवळ बसून राही. म्हणजे बाळाला दूध पाजण्याचा व त्यावेळी बाळाला गाणे म्हणणे किंवा गप्पा मारणे हा आनंदही तिला मिळू दिला नाही. त्यामुळे बाळाला जन्मदात्रीच्या आवाजाची ओळखही झाली नाही, की चेहराही पाहायला मिळाला नाही.
सासूसासरे नातू बघायला येऊन गेले. थाटात बारसे झाले अर्थात नाव मोठीने तिच्या आवडीचे ठेवले. आता त्यांना मोठी आई, छोटी आई संबोधू या. बाळ जो पर्यत अंगावर दूध पीत होते तोपर्यंत छोटी आई कोल्हापुरात सवतीजवळ रहात होती. नंतर तिची रवानगी रिकाम्या हाताने पुन्हा सासूसासऱ्यांकडे करण्यात आली. ती बिचारी ह्या सगळ्याचा जाब कोणालाही विचारू शकत नव्हती. निमूटपणे सासूसासऱ्यांची सेवा करणे हेच तिच्या नशिबी होते.
कालांतराने ती नवऱ्याकडे राहायाला गेली. दुसऱ्यांदा दिवस गेले . येव्हाना सासू सासरे वृद्ध झाले होते, पतीची बदली सरहद्दीवर झाली. तिला पुन्हा नवऱ्याच्या आईवडिलांकडे जावे लागले. एक नातू दिला होता त्यामुळे आता तिचे महत्व कमी झाले होते. त्यामुळे गरोदरपणाचे फारसे कौतुक उरले नव्हते. दोन वृद्धांची सेवा व येणाऱ्या बाळाच्या आगमनाची वाट पहाणे इतकेच तिचे जीवन होते. दुसराही मुलगा झाला. आता हा तरी आपला मुलगा, ह्याचे नाव आपल्या आवडीचे ठेवू, उत्तम शाळेत शिकवू अशी स्वप्ने ती पहात होती. नातवंडाचे तोंड पाहिले आणि आजी-आजोबांनी राम म्हटला.
मोठा मुलगा कोल्हापुरातच शाळेत जाऊ लागला. प्रायमरी शिक्षण तेथेच. त्यानंतर त्याला चांगल्या शाळेत घालायचे म्हणून पुण्याला पाठवले. दोघे सख्खे भाऊ पण कधीच सहवास नसल्याने त्यांनी एकमेकांचा भाऊ म्हणून स्वीकार कधीच केला नाही. छोटी आई तर उपरीच ! तिला तो आई तरी कसा मानणार ?
आता ती दोन्ही मुलांच्या शिक्षणात अडकली. दुर्दैवाचा घाला पडला. तिच्या पतीचे स्कूटर अपघातात अचानक निधन झाले. मुलांच्या शिक्षणाची, संगोपनाची सर्व जबाबदारी एकटीवर पडली. तिचे स्वतःचे वडील नव्वदीच्या घरात पोचले होते. त्यांना तिने आपल्या जवळ आणले. त्याच दरम्यान तिची एक नणंद विधवा झाली निराधार. तिलाही तिने आपल्या जवळ आणून आधार दिला. ह्या नणंदेने तिला जन्मभर खूप साथ दिली, मदत केली. दोघी बहिणी बहिणी सारख्या रहात होत्या.
तिच्या पतीने कधीतरी थोड़ी जमीन घेतली होती. त्यावर आता तिने स्वतःच्या हिंमतीवर, पतीचे जे फंडाचे पैसे मिळाले होते त्यातून टुमदार बंगला बांधला. दहावीपर्यंत शिक्षण असूनही पैशांचे व्यवहार समजून घेतले.
आयुष्य पुढे सरकत होते. दोन्ही मुले उत्तम शिक्षण घेऊन तयार झाली. मोठा मुलगा मुंबईस नोकरीसाठी गेला. लग्न केले. हिला त्याच्या आयुष्यात कधीच आई म्हणून स्थान नव्हते. आताही नाही. तो आणि त्याची बायको व दोन मुली.
धाकटा मुलगा आणि ती, तिने बांधून घेतलेल्या बंगल्यात रहातात. त्याचे ही लग्न होऊन दोन मुले आहेत. पण मोठा भाऊ लहानपणी दुसऱ्या आईकडे रहात होता हे कळल्या पासून आपण ही कदाचित हिचा पोटचा मुलगा आहो की नाही ही शंका त्याला सतत वाटते. तसे तो तिला वारंवार विचारतही असे.
हा तिच्या हृदयीचा सल आहे. दोघांना जन्म मी दिला, दूध पाजले, धाकटयाला तर किती कष्ट करून शिकवले, वाढवले. वडिलांची उणीव भासू दिली नाही तरी दोघांनाही मी त्यांची “आई” आहे ह्यावर विश्वास नाही.
ती न देवकी ती न यशोदा
जरी ती दोन मुलांची जन्मदात्री आई.

— लेखिका : सुलभा गुप्ते. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.