“काळजाचा तुकडा”
शरयूने दारातील झाडाकडे पाहिले. झाड टवटवीत हिरवं गार दिसत होतं. नुकत्याच पावसाच्या सरी येऊन गेल्याने पानावरील थेंब मोत्यागत भासत होते.
त्या पेरूच्या झाडावर चिमणीचे घरटे होते. चिमणी चिव चिव करत घरट्याशी येते आणि चोचीत आणलेला चारा मोठ्या प्रेमाने पिल्लांना भरविते. शरयूला वाटते या मुक्या पक्षांना देखील नियतीनं आईपणाच सुख दिलंय आणि मी ? मी कुठल्या जन्माच्या पापाची शिक्षा भोगतेय ? कालच डॉ. शर्वरीने सर्व तपासणी रिपोर्ट पाहून सांगितले, “शरयूताई तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाही !” डॉक्टरांच्या या निदानाने शरयू नखशिखांत हादरली. सारंगचा चेहरा तर फोटो काढण्यासारखा झाला होता. अन् सासुबाई ? त्यांना काहीच ढम्म नव्हते ! त्या शांतपणे ऐकून नेहमीच्या रूटीन मध्ये व्यस्त !!
मनात प्रश्नाचे काहूर माजले होते. सासुबाई गप्प का ? ही वादळापूर्वीची शांतता आहे का ? त्यांच्या मनात नक्की काय सुरू आहे ? का.. का ते भावाच्या मुलीशी सारंगच दुसरे लग्न लावताहेत ? सारंगच दुसरं लग्न ? मला सवत ? सवती मत्सर ? हाय रे दैवा !! अन सारंग या गोष्टीस तयार होईल ? उद्याच लग्नाचा सहावा वाढदिवस आहे अन् त्या दिवशी मला तो काय सवत आणणार या निर्णयाच गिफ्ट देणार ?
अनुताई अगदीच नेहमी प्रमाणे रोजची कामे उरकून वाढदिवसाच्या तयारीत होत्या. सखू कडून घर व्यवस्थित सजवणे, येणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींच्या स्वागताची, मेजवानीची ऑर्डर देणे यात व्यस्त होत्या. शरयू मात्र मनातून उदास होती. संध्याकाळचे सात वाजले तरी शरयू शांत शांत होती. अखेर अनुताईच म्हणाल्या ,अग शरा सगळी तयारी झालीय, तू आता तुझं आवरून घे ना ! म्हणून त्या घराबाहेर पडल्या .
शरयू हॉल मध्ये आली. सर्व फर्निचर चकचकीत होते. खिडक्यांचे पडदे बदललेले होते. तिच्यासाठी कुठलेच आवरणे राहिले नव्हते. नंतर ती किचन मध्ये आली. बघते तर ओट्यावर गरमागरम पुलाव, छोले, पुऱ्या ज्या गरम राहू शकतील अश्या डब्यात होत्या . बासुंदी, दोन कोशिंबीर, दोन चटण्या, गरम कांदाभजी सखुबाई करणार म्हणत होती. शरयूला या कार्यक्रमाचा काहीच उत्साह नव्हता.
आठ वाजता शरयूच्या पाच मैत्रिणी सारंगचे चार मित्र जोडीने आले. अनुताईंनी डिनर सुरू करण्यास सांगितले. प्रत्येकाने आपणास हवे ते घेऊन आनंदात खाणे सुरू केले. सर्वांचे खाणं होताच अनुताईंनी शरयू आणि सारंगला औक्षण केलं. आलेल्या मित्र मैत्रिणींनी शुभेच्छा देत आपापल्या भेटवस्तू दिल्या.
अनुताई फोनवर बोलताना म्हणाल्या या !! या !! मी आलेच बाहेर !! बाहेरून आत येताना अनुताईंच्या हातात सुंदरश्या दुपट्यात गुंडाळलेलं बाळ होतं ! ते बाळ शरयू आणि सारंगला जोडीनं उभे करून त्यांच्या हातात देत म्हणाल्या, “अग स्वतःलाच बाळ व्हायला पाहिजे असं कुठल्याच शास्त्रात नाही. बाळ आपण दत्तकहि घेऊ शकतो !! तुमच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त मी हे बाळ तुमच्यासाठी अनाथाश्रमातून कायदेशीर पूर्तता करून आणले आहे. तुम्हीच याचे आई बाबा. या बाळाचं नाव मी आत्ताच जाहीर करते श्रीकृष्ण. श्रीकृष्णाची जन्मदा देवकी, तर पालनपोषण करणारी यशोदा ! तरी शरयू आमची यशोदा बनून आईपणाचा कर्तव्य आनंद सुख अनुभवणार ! सर्व उपस्थितांनी अनुताईंच्या या निर्णयाचे स्वागत करून आनंदाने टाळ्यांचा कडकडाट केला.
तर शरयू ? तिला तर सासू म्हणजे साक्षात आईपेक्षाही पूज्य वाटायला लागली. ती त्यांच्या पायांना घट्ट धरून हमसून हमसून रडू लागली. तिला वाटले, किती विचार उच्च आहे यांचा ! अन मी काय विचार करीत होते ? इतका उच्च विचार आणि आचरणास मन सुद्धा मोठ असावं लागतं ! खरंच आईंचा मन ….
मन आहे आभाळ आभाळ !!
अनुताई त्या बाळास सर्वांना दाखवत म्हणतात..
“पहा आमचा बाळ ! श्री कृष्ण !!
माझा नातू !! सारंग शरयूचा बाळ !!
आमच्या काळजाचा तुकडा !!!

— लेखिका : अलका मोहोळकर. पंढरपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800