Monday, October 27, 2025

कथा

“कातरवेळ”

अशीच मनाला हुरहुर लागते. चैन पडत नाही.मन अस्वस्थ होते आणि काय करावं असं बेचैन होते. कोणाची आठवण होते का ? नाही. मग हे असं काय होतंय.

आठवणींचा कोपरा असा ठसठसत राहातो. मनाच्या काठावरती येते ही बेचैनी. आठवणींचे शुभ्र कापूसमेघ मनाच्या दरीवर तरंगू लागतात. पिसारा फुलवू लागतात. आठवते ते श्रीरंगाच्या मुगुटातले डुलणारे मोरपीस.

इतक्यात क्षितिजावर सप्तरंगी इंद्रधनूची कमान ऊभी रहाते. निळ्या आरस्पानी नभांगणात ती कमान कमालीची छान दिसते. ऊनाड वारा बहकतो. सुसाट सुटतो. वृक्षवेलींना घुसळून काढतो. असा कसा हा वारा खट्याळ ?

बघता बघता कृष्णमेघ दाटून येतात. आभाळ ओथंबुन येते.
आता काजळ पैंजण वाजवत दबकत्या पावलानी सांजवेळ येते. साऱ्या चराचराला गिळायला बघते. प्रकाशाची आठवण होते. पण, कातरवेळ अधिकच गहरी होते‌ !

आत्ता ऊनपावसाचा खेळ चालू व्हावा असं वाटतं.
पक्षांची मधुर किलबिलाट, कोंबड्यांची बांग मोटेचा कूई कूई आवाज असं काही बघावंसं वाटतं. दूरून निर्झर नदीची खळखळ ऐकावी. फुलांचं नुकतंच फूलणं बघावं असंच वाटतं‌ जवळून एखादी बदकांची टोळी जावी. सगळीकडे हिरवाईने शृंगारलेली अवनी बघावी, एखादी आंब्याने लदडलेली आमराई बघावी. आंब्याच्या मोहराचा ताजा वास, आम्रवृक्षावरचे कोकिळेचे स्वर सारे आत्ताच आणि एकदमच का हवेहवेसे वाटते ?

रात्र काळोख लेऊन ऊतरते आणि सारा गांव काळोखात गडप होतो. पायवाट नदी खळखळ, फूले वृक्षवेली पक्षी सारे हरवून गेले. पण मग नक्षत्रांचे दिवे लागत गेले. एकेक तारका सजून आली व तारांगण रूपेरी चमकू लागले. चंद्र ही ऊगवला व चांदणे पसरले. सागराची गाज ऐकू आली. थोडी पाऊसधार कोसळली आणि मृदगंध आसमंती भरून राहिला.
नारळाच्या झाडांच्या सावल्या नाचू लागल्या. रात्र बहरत राहिली. हे असं मग डोळ्यासमोर उभं रहातं. मनाची व्यथा पळून जाते.
मनमोर पिसारा फुलवत नाचतो. हेच सृष्टीचे सौंदर्य मनाला भुरळ घालते. पण एकाचवेळी वास्तवात ते असू शकत नाही. मग मनाला मात्र ते हवेहवेसे वाटून बेचैनी येते.
असं असतं मन. कमालीचं बालिश.

— लेखिका : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादक : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments