चोरी ची कैरी
चवीला आंबट पण तिला खाणारे आंबट शौकीन बरेच असतात. कोणी विकत आणून खातो तर कोणी वाटसरू आंब्याचे झाड दिसले की, वर नजर करून बघणाराच, परत खात्री करणार.. जवळपास कोणी आहे कां ? कारण झाली पडलेली कैरी, दिसली नाही तर.. पुढची तयारी.. करायला. एक तर दगडाने पाडू की, झाडावर चढू.. काहीच सुचत नाही.
खाली पडलेली कैरी घेतली तर, सांगता येईल.. की, पडली होती म्हणून घेतली. पण झाडावर चढून कैरी घ्यायची म्हणजे.. एक प्रकारे चोरी झाली की हो.. असा मोह प्रत्येकाला होतोच.. हे मन आहे ना, ताब्यात राहतच नाही.
अशीच अवस्था सीमा मॅडम.. ची झाली. सकाळी सर्व आवरून शाळेत ड्युटीवर हजर झाल्या. एक क्लास घेत नाही तो, ऑफिस चे बोलावणे आले. मुलांना अभ्यासक्रम दिला. अन् ऑफिस गाठलं.
“मॅडम ss.. शेजारचे गावी जाऊन, निवडणूक आयोगाने दिलेली कामे उरकून घ्या. हि फाईल.. आणि हो ss.. तिकडून आल्यावर, डायरेक्ट घरी गेलं तरी चालेल.. उद्या परत.. शाळेतच यायचं.”
ईच्छा नसली तरी काय..? घेतली फाईल अन् पुढील प्रवास सुरू.. एस टी स्टँड वर जाऊन बस पकडली. वैतागवाडी चे तिकीट घेतले.. मॅडम चा चेहरा पडलेला होता. निवडणूक, जनगणना.. वैगेरे शासकीय कामकाज डोक्यावर बोजा सारखे, प्रत्येकालाच वाटते. पण काय करणार ? शालेय उपक्रम राबवता राबवता.. जीव रडकुंडीला येतो. त्यात हि असली भर पडते. सांगायचं कुणाला..?
“वैताग वाडी फाटा ss.. चला ss घ्या उतरून.. ओ s मॅडम ss..*
मॅडम ची तंद्री उडाली.. पट्कन खाली उतरून.. पायपीट सुरू.. पुढील अर्धा किलोमिटर चा पाई प्रवास.. डोक्यावर उन घेत.. पाय टाकीत मॅडम चालत होत्या.. ईतक्यात रस्त्याच्या कडेला, थोड आत.. शेतात.. एक आंब्याच झाड दिसलं.. वाईच घडीभर सावलीला टेकाव म्हणून.. झाडाखाली विश्रांती साठी खोडाचा आधार घेऊन बसत नाही तोच.. वरून टपाक.. दिसी एक कैरी पडली. नशीब डोक्यात नाही पडली. नाही तर मॅडम बेशुद्ध झाल्या असत्या.
कैरी ला बघताच .. तोंडाला पाणी सुटलं.. नशिबात असतं ते देव देतो.. म्हणतात, म्हणून.. मॅडम उठल्या अन् हळूच ईकडे तिकडे बघत.. कैरी उचलली. कोणी बघत तर नाहीं ना..! बघितलं तर बघु दे.. मी चोरी थोडीच केली. अन् तिथून निघायला लागली. परत थांबली.. मनात काय आलं कुणास ठाऊक..? पिशवी तून पाण्याची बाटली काढली.. थोडं पाणी पिले अन् बाकी शिल्लक पाणी झाडाच्या बुंध्याशी टाकलं.. पाणी टाकल्या टाकल्या.. जमिनीत जिरून गेलं.. अर्ध्या बाटली पाण्यात.. झाडाची तहान थोडीच भागणार होती.. सीमा क्षणभर.. बघतच राहिली.. अन् पिशवीतून दुसरी बाटली काढून सर्व पाणी टाकलं.. हळू हळू ते पण जिरून गेलं.. पण सीमाला समाधान वाटलं.. मनात म्हणत होती.’ या झाडाने सावली दिली, एक कैरी पण दिली.. मी थोडं पाणी दिलं तर कुठे बिघडलं..
हे सर्व पलीकडे झाडा आड बसलेला राखणदार बघत होता.. सीमा जायला निघाली तशी……. त्याने आवाज ठोकला..
“मास्तरीन बाई.. कुठं निघाल्या..? इकडं या… हांग.. या s या.”
त्याच्या आवाजाने सीमा.. जरा कचरली.. कैरी घेतली म्हणून.. कातवतो की काय..? मनात शंकेची पाल चुकचुकली.. त्याचे जवळ जाऊन.. पट्कन बोलायला लागली.
“कैरी खाली पडलेली.. होती म्हणून एकच कैरी घेतली.. बाबा.. तसं काही चुकलं असेल तर.. हि घ्या.. तुमची कैरी ss.. मी काही चोरून नाही घेतली..”
“मास्तरीन बाई ss.. म्या ओळखतो तुमास्नी.. मपली पोर.. तुमच्याच वर्गात आहे. पोर लई गुण गाते तुमची.. तुम्ही लई चांगल्या आहेत बघा.. मंगा धरून बघतोय.. तुमच्या जवळचं सार पाणी.. झाडाला टाकलं.. एव्हढे वाटसरू येतात नी जातात.. पण असं कधीच घडलं नाही.. झाडावर चढून.. आंबे चोरून नेतात.. झाडाची जाण कोणाला बी नाही.. तुमचं मन लई मोठं आहे बघा.. अजून पाहिजे का कैऱ्या.. झाडावरून काढून देतो.. लागलं तर.. आंबे बी तुमच्या घरी आणून देईन. ईश्वर तुमचे भलं करो.. अन्.. हां.. तेव्हढ पोरी कडं.. ध्यान ठेवा.. चांगल शिकवा.. तिला चांगल वळण लावा.. आता तुम्हीच तिचे माय बाप.. गरीबाची पोर आहे ती, हे काय.. इथ शेतात.. राखणदार म्हणून काम करून पोट भरतो.. जा से सावकाश जा.. आपल्या कामाला..”
तिथून सीमा निघाली खरी, पण तिचे पावलं.. जड होत चालली होती.. एका कैरी ची.. खरच आपण चोरी केली की काय..? तिला सारखे जाणवत होते. ती चोरी नव्हती, हे तीला ही माहीत होते.. पण, राखणदार चा.. विचार करून.. ती सुन्न झाली होती.. गरीब बिचारा.. किती विश्वासाने म्हणत होता..? की, माझ्या पोरीला.. चांगले संस्कार द्या.. चांगल वळण लावा.. कारण त्याला माहीत होते की.. आंब्याच्या कैरी काय नी माझ्या पोरीच काय.. राखण करू शकत नाही.. बलवान शक्ती शाली चोर आला नी माझ्या पोरीला पळवून नेले.. तर काय करणार..?
एक प्रकारे फार मोठी जवाबदारी होती ती.. अचानक…..
“घेऊन मी ही जवाबदारी.. शिकवीन मी अश्या पोरींना.. आणि चांगले संस्कार करून.. त्यांचे रक्षण देखील करीन. मास्तरीन बाई म्हणून नव्हे, तर त्यांची आई बनून मी ही जवाबदारी पार पाडीन ..”
एक नव्या विचाराने.. जोषातच मॅडम गावात गेल्या.. सर्व कामे उरकून.. घरी आल्या.. जेवण झाली.. अंथरुणावर पडून झोपावं.. पण झोप लागतच नव्हती.. पंखा फिरत होता.. त्याच बरोबर.. तिचं डोकं देखील गरगरत होतं.. कुठून तरी.. बापाचा आवाज येत होता.. स्पष्ट.. पण नाजूक..
“सीमा ss.. पोरी.. झोप आता.. तुला जागून चालणार नाही.. एक नवी जवाबदारी तुझ्यावर आली.. त्यासाठी तरी.. विश्रांतीची गरज आहे. सकाळी उठून कामाला लाग.. पुण्याचं काम आहे. बाय.. गुड नाईट..”
— लेखन : सुभाष कासार. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
👌👍