“गोष्ट दोन लुगड्यांची !”
मी घरात फिरायला, चालायला लागले तेव्हापासुन तिला अशीच बघतेय. ती कोण आहे हे समजायचे माझे वय पण नव्हते.
बयो म्हणत असत तिला.
काम असेल तरच किंवा काही विचायचेअसेल, ऊत्तर द्यायचे असेल तरच ती हळू आवाजात दोनचार शब्द बोलत असे. एरवी तोंडावर पट्टी न चिकटवता अगदी गप्प निशब्द असे.
बयो तशी नीटस रेखीव , गोरी, शांत चेहेरा असलेली होती.
घड्याळ बघायचे तिला माहितच नव्हते जणू. झोप झाल्यावर ऊठायची आणि आपलं अंघोळी पर्यंत आवरून कामाला जुंपून घ्यायची.
तिच्या शब्दकोषात चहा न्याहरी हे शब्द नव्हते बहुतेक.
यंत्रासारखं निपूटपणे कामे ऊरकत रहायचे यात कधीही खंड पडला नाही.
कामं ऊरकतात तो दोन अडीच वाजुन जात.
एकटीच ती आपले ऊरले सुरले वाढून घेऊन जेवत असे.
नाही आवड नाही सवड.
मोठं होताना हळूहळू कळू लागलं … तिला कोणी मायेने …. ‘जेवतेस ना ?…. जेवलीस का ? इतकं सुद्धा विचारत नसे.
ती घरात रहाते ह्याची कोणी दखलच घेत नसत.
ती कोण आहे ? हे काही वर्ष ऊमगलं नाही तरी आसपास होणार्या चर्चातून काही बाही कळायला लागलं होतं. मी कधी तिच्याशी आपुलकीतून बोलायचा प्रयत्न केलाच तर आई, बाबा आणि आजी चांगलेच ओरडत. तिच्याकडुन कधीच प्रतिसाद मिळत नसे.
शाळेत मला बाबा सोडून पुढे पेढीवर जात.
आई म्हणाली….’तिच्यासाठी दोन लुगडी आणायला हवीत ‘!.
लक्षात ठेऊन घेऊन या. या महिन्यात घ्यायला हवीत.
मी अचानक म्हणाले …’बाबा एक गुलाबी आणि एक आकाशी आणा ना.
त्यावर आजी कडाडली. आगाऊपणा करू नकोस. गुपचुप शाळेत निघ.
इतकी का आजी रागावली मला कळलंच नाही. सारखं सारखं तिला प्रिंट नसलेलं… लाल रंगाचं.. काठपदर काहीच नसलेलं असं लुगडं का आणतात ?
मला काही कळलं नव्हतं.
पुढे खेळताना शेजारच्या घरातील रमाकाकू म्हणाल्या… ‘कशी आहे गं बयो ? बरी आहे का ?
काल खूपच ताप होता. थकली होती बिचारी’.
मी घरात गेले तर बयो खाली मान घालून कामात गुंतली होती. बाजूने मी बघितल्यावर डोळे लाल व चेहेरा थकलेला दिसला.
घरात कोणाला काहीच माहीती नव्हते. तिची दखलच घेत नसत तर कळणार तरी कसे ?
एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटे. ही बयो अंगावर या लाल लुगड्यांशिवाय काहीच का घालत नाही. ना दागिना… ना फूल वेणी… ना पावडर कूंकू. अशी काय ही.
मला काय माहित .. तिचे त्या लाल लुगड्यावर आयुष्यभराचे दूर्देव नियतीनेच लाल रंगात रंगवून ठेवलंय बाकी इच्छा आशा भावना तिच्या आसपास पण फिरकायला नियती परवानगी देत नव्हती.
आजूबाजूनी मग कळत गेलं. ती माझ्या बाबांची सावत्र बहीण होती.
आधी पाच सहा वर्षाची असताना आई गेली व वडिलांनी माझी आजी घरात लग्न करून आणली.
पुढे माझे बाबा काका आत्या असा रक्ताचा गोतावळा वाढला आणि ही सावत्र बाजूला दुर्लक्षित पडली.
पुढे वडील … माझे आजोबा गेल्यावर ती एकटीच अशी राहिली.
आजीने १५व्या वर्षी लग्न करून दिले तर सहामहिन्यात नवरा काविळीने गेला. आणि ती कूठे जाणार ?
म्हणुन तिचे दूर्दैव परत आमच्या घरात घेऊन आले.
तिला बाल विधवा म्हणुन कोणीही कशाही प्रसंगाला बोलवत नसे. ना माहेर मायेचे ना सासर हक्काचे.
बिचारी काम एके काम .. जूंपलेली असे.
रात्री न जेवता झोपत असे.
वर्षाला दोन लाल लुगडी चोळ्या आणि जगायचे आहे याकरता ऊरलेलं दुपारचेच फक्त अन्न या खेरीज तिसरी गोष्ट तिला औषधही मिळत नसे.
सारे आयुष्य असं तिने कष्टात गाडुन घेत काढलं आणि तिच्या दोन लाल लुगड्यावर तिचे दूर्दैव नियती छापत राहीली.
अशी ही माणुस या नावाला कलंक लागेल अशी दोन लाल लुगड्यांची कहाणी ती जगत राहीली. विना तक्रार … आशेविना.
— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800