न्याय …..
ही गोष्ट आहे एका व्यापाऱ्याची, शंकरची !वयाच्या सोळाव्या वर्षी वडिलांची नोकरी गेली. आई बालपणीच वारली होती. परिस्थितीने सर्व शिकवले. लहान वयातच जबाबदारीचे ओझे पडले. पुढे काही वर्षांनी लहान दोन बहिणींची लग्नेही केली. नंतर वडिलांचे ही छत्र हरपले.
शंकर अतिशय कष्ठाळू, साधा, सरळ, प्रामाणिक व जिद्दी होता.त्याने शून्यातून स्वतःचा व्यापार चालू केला होता. आज कपड्याचा त्याचा मोठा व्यवसाय होता. बाजार पेठेत चार मजली दुकान होते.
एकदा बाहेरगावी जात असताना अचानक शंकर ची बालपणीच्या मित्राशी भेट झाली. काय रे मोहन कसा आहेस…?
असे आपुलकीचे शब्द कानावर पडताच मोहनने मागे वळून पाहिले.
शंकरची चार चाकी गाडी पाहून मोहनला आनंद झाला. दोघांनी घट्ट मिठी मारली. किती बोलू आणि किती नको अशी अवस्था झाली.
शंकर ने कुटुंबाची व व्यवसायाची माहिती सांगितली. परमेश्वराच्या कृपेने सर्व छान चालले आहे असे सांगितले.
शंकर श्रीमंत व प्रतिष्ठित व्यापारी होता. पण…….त्याला कोणताही गर्व अथवा अहंकार नव्हता. अतिशय मनमिळाऊ, शांत, सर्वांच्या मदतीला धावून जाणारा, माणसं जोडणारा, माणुसकी जपणारा, सामाजिक कार्यात पुढे असणारा, मनाची श्रीमंती होती आणि त्यामुळे समाजात त्याला एक आदराचे स्थान होते.
शंकरची बायको देखील खूप प्रेमळ व समजुतदार होती. त्याना दोन मुलं होती जी शाळेत शिकत होते. असे हे समाधानी व आनंदी कुटुंब होते.
बालपणीच्या गप्पागोष्टी झाल्यावर त्याने मोहनची विचारपूस केली. मोहनचा चेहरा पडला होता. तो रडवेला झाला होता. त्याला बोलते केल्यावर त्याने सांगितले की त्याची नोकरी गेली असून सध्या त्याची परिस्थिती खूप अतिशय बिकट झाली आहे.
कोणताही विचार न करता शंकर ने त्याला त्याच्या व्यवसायात मदत कर म्हणून विनंती केली व सर्व कुटुंबाला पुण्यात घेऊन ये असे सांगितले.
मोहनच्या कुटुंबात त्याची पत्नी व दोन मुली होत्या. मोहनची पत्नी अतिशय चालाक, कपटी व स्वार्थी होती. काम कमी आणि मोठं मोठया गप्पा, दुसऱ्यांची निंदा करणे व फुशारकी मारण्यात तरबेज होती.
शंकर ने त्याच्या बंगल्याशेजारीच मोहनची राहण्याची सोय केली. शंकरला कधीच कोणामध्ये वाईट दिसत नव्हतं त्याचा दृष्टीकोणच तसा होता……स्वच्छ.
अतिशय प्रेमळ व दिलदार असे व्यक्तिमत्व होते.
दुकानातील सर्व कामगारांचा प्रिय मालक होता. त्याने सर्वांना एक कुटुंब म्हणून आपलेसे केले होते. त्यामुळे….सर्व कामगार अतिशय प्रामाणिकपणे व आनंदाने आपले काम करत होते.
मोहनला त्याने दुकानाच्या देखभालीची सूत्र हाती दिली होते.एक आदराचे स्थान दिले होते. सुरवातीला तो ही मन लावून काम करत होता.
दिवसेंदिवस कामाचा व्याप वाढत होता त्यामुळे अनेक वेळा शंकरला बाहेरगावी जावे लागत असे. विश्वासाने मोहनकडे दुकानाचे सर्व सूत्र सोपवले होते. आता तो गल्ल्यावर देखील बसू लागला.
सुरवातीला सर्व छान चालू होते. मात्र आता मोहनला तो भरलेला गल्ला, ते पैसे पाहून हाव सुटली. त्याची नियत फिरली होती. त्याला वाटले समुद्रातून जर थोडे पाणी काढले तर काय असा फरक पडणार आहे ?
मोहनच्या बायकोचेही हट्ट, हाव दिवसेंदिवस वाढत चालली होती. घरचे वाढते खर्च बायकोचे हिंडणे फिरणे, मौज मज्जा त्यामुळे रोज नकळत गल्यातून तो पैसे काढू लागला .
आता मोहन आळशी झाला होता. काम कमी व पैसे भरपूर….
शंकरचा आपल्या मित्रावरील अंध विश्वास त्याच्या पत्नीच्या लक्षात येऊ लागला कारण थोड्याच अवधीत मोहनच्या घरात अनेक महागड्या वस्तू दिसत होत्या. पण पुरावा नसल्याने ती ते सिद्ध करू शकत नव्हती. अनेक वेळा तिने सांगण्याचा प्रयत्न ही केला पण सर्व व्यर्थ…. आता या गोष्टींमुळे दोघांच्यात भांडण होऊ लागली होती.
घरात वाद होऊ नये म्हणून ती शांत असायची …. त्यांच्या या हसत्या खेळत्या कुटुंबाला दृष्ट लागली होती.
हे मित्र प्रेम दिवसेंदिवस वाढतच चालले होते. मोहन आपले खिसे भरत होता, सर्व हौस मौज करत होता.
शंकरच्या पत्नीला खूप वाईट वाटे कारण तिने आपल्या पतीचे कष्ट, आयुष्यभर काढलेल्या खस्ता, त्याग, समर्पन ते हलाखीचे दिवस जवळून पाहिले होते. त्यामुळे तिची चिडचिड होत असे. शेवटी हतबल होऊन तिने सर्व परमेश्वरावर सोपवले.
आज मोहनला दुकानात काम करता करता दहा वर्ष झाली होती. त्याचे स्वतःचे दुमजली घर, गाडी, बायकोला दाग दागिने सर्व भरपूर होते. चोरी त्याचे व्यसन झाले होते.
ज्या मित्राने आपल्या वाईट वेळेला साथ दिली त्यालाच आपण फसवत आहोत याची तिळमात्र लाज त्याला वाटत नव्हती.
बोलता बोलता आता शंकरची मुले मोठी झाली .ती हळू हळू वडिलांच्या व्यवसायात लक्ष देऊ लागली. दोन्ही मुलांना आता सर्व लक्षात येऊ लागले होते आणि आपली आईच बरोबर सांगत होती याची जाणीव झाली.
मुलांनी दुकानात कुणाच्याही नकळत एका रात्री सी.सी.टी.व्ही. बसवला. एक मुलगा गल्यावर व दुसरा मुलगा बाहेरगावी जाऊ लागला. वडील दोघांना मार्गदर्शन करत. लहान वयातच मुलांनी देखील वडिलांसारखी जबाबदारी घेतली होती.
सलग पंधरा दिवस सी.सी.टी.व्ही. तपासल्यावर मुलांच्या लक्षात आले की मोहन काका रोज गल्यातून हजार दोन हजार व सणासुदीला अथवा गर्दीच्या वेळी त्यापेक्षा जास्त पैसे काढत असतात म्हणून. आता मुलांकडे पुरावा होता. व्यवसाय मोठा असल्याने या गोष्टी लक्षात येत नसत. वडील अतिशय भोळे असल्याने त्यांना मोहनची लबाडी जाणवली नाही. व्यवसाय मोठा असल्याने हे कळत नसे.
मुलांनी अतिशय हुशारीने ही गोष्ट वडिलांना सांगितली, दाखवली आणि त्यांची पायाखालची जमीन सरकली.
ज्या मित्रावर गेली दहा वर्षे डोळे झाकून विश्वास ठेवला होता, तोच फसवत आला होता. त्यांना खूप वाईट वाटले. ज्या मित्रासाठी आपण आपल्या पत्नीला कसे ही बोलत होतो त्याच मित्राने आज विश्वासघात केला होता.
पण…… वेळ निघून गेली होती. कारण मित्राने भरपूर संपत्ती साठवून ठेवली होती. अक्षरशः लुटले होते.
शंकरने मोहनला बोलावून सर्व स्पष्टपणे विचारले पण त्याला कोणतीही भीती, खंत नव्हती,याचे शंकरला जास्त वाईट वाटले. आज तो खूप दुखावला गेला.
मोहन त्याची चूक कबूल करीत नव्हता. सर्व पुरावे पाहूनही उडवाउडवीची उत्तरे देत होता. शिवाय तो खोटे बोलण्यात तरबेज झाला होता.
आता पुढे बोलायला काहीच राहिले नव्हते……..
मोहनची नोकरी गेली मात्र त्याने भरपूर संपत्ती साठवून ठेवली होती.
आज त्याने एक जिवलग मित्र गमावला होता हे मात्र त्याच्या लक्षात येत नव्हते. पैश्यांची धुंदी डोळ्यांवर होती.
शंकर खूप अस्वस्थ झाला होता. त्याचा विश्वासवरचा विश्वास उडाला होता. आपण अनेक वेळा आपल्या पत्नीला दोष दिले पण ती खरी होती त्याची आज खात्री झाली.
हे विसरणे सोपे नव्हते…. आपला निर्णय आज चुकला होता याची जाणीव झाली…….
शेवटी वेळ आणि काळच सर्व दुःखाचे औषध असते…..
मुलांची व्यवसायातील रुची पाहून तो समाधानी होता. दोन्ही मुलं अतिशय हुशार, जिद्दी, वडिलांसारखे प्रामाणिक व मेहनती होते.
आज एका दुकानाचे चार झाले होते. वडिलांचे नाव मुलांनी राखले….अजून मोठे केले. चांगली वृत्ती, सुकर्म याचे ते पारितोषिक होते.
दुसरीकडे मोहनचे वाईट दिवस सुरू झाले. वाईट मार्गाने कमावलेला पैसे वाईट मार्गानेच जातो……त्याला जुगाराचे व्यसन लागले….पुढे दारू देखील घेऊ लागला….. बायको व मुलींना मारझोड करत असे. घरात सतत क्लेश, भांडण होत असे. आज मोहन सर्व पैसे व घर जुगारात हरला होता.
मोहनला अनेक आजारानी ग्रासले होते. तो सरकारी दवाखान्यात उपचार घेत होता. थोड्या दिवसानी मोहनच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला व दोन्ही मुलींना अनाथ आश्रमात राहण्याची वेळ आली.
मोहन ने लुबाडलेल्या पैशांमध्ये लोकांचा तळतळाट होता कारण त्याने फक्त शंकरलाच नव्हे तर अनेकांना फसवले होते. त्या पैशाला लक्ष्मीचा वास नव्हता. त्यामुळेच ती ज्या मार्गाने आली त्याच मार्गाने निघून गेली.
शंकरला जेव्हा हे सर्व समजले तेव्हा देखील त्याच्यातील चांगुलपणा, माणुसकी जिवंत होती.
एखादी चांगली संस्कारी व्यक्ती ठरवून सुद्धा कोणाशी वाईट वागू शकत नाही .स्वभाव बदलत नाही हेच खरे…….शंकर, मोहनला भेटायला कोणाच्या नकळत दवाख्यान्यात गेला.
मोहनची अवस्था अतिशय बिकट झाली होती. तो ढसाढसा रडत होता. शंकरची हात जोडून पाया पडून माफी मागत होता…
शंकरने सांगितले, “तुला वाटले कोणी बघत नाही पण तो परमेश्वर तर सगळंच पाहत होता ना रे…..? तू माझा विश्वासघात केला. मी माफ केले तरी त्या देवाकडे माफी नसते….कर्माचे फळ भोगावेच लागते.”
वेळ निघून गेली होती……. स्वतः परमेश्वराने त्याला शिक्षा दिली होती. अखेर उशिरा का होईना सत्याचा विजय झाला. देवाच्या दरबारी आज न्याय मिळाला होता.
आज एकीकडे शंकरची भरभराट झाली होत होती. चांगली वृत्ती व चांगले कर्म याचे ते फळ होते तर दुसरीकडे मोहनची दुर्गती झाली होती. हे त्याच्या कुकर्माचे फळ होते. अखेर नियतीने योग्य तो न्याय केला होता !

— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.