आज लहान मूलसुद्धा मास्क शिवाय बाहेर पडत नाही इतकी सगळ्यांना, लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत मास्कची गरज आहेच आणि तो लावून लावून सवयही लागली आहे.
पण…..
आम्हा स्त्रियांचे मास्क मुळे खूप नुकसान होत आहे असे नाही वाटत आपल्याला ?… अहो ..
आता तुम्हीच बघा, मुळात मुलींना/स्त्री ला बाहेर जाताना नीटनेटके म्हणजेच नटून थटून जाण्याची आवड. पण या मास्कमुळे चेहराच एव्हढा झाकला जातो की, ना लिपस्टिक, (वेगवेगळया रंगाची लिपस्टीक, कधी डबल शेडिंग, कधी लिपग्लोस, तर कधी मॅट फिनिशिंग, कधी लिक्विड लिपस्टीक. आजकाल लिपस्टिक चे नाव ही विसरत चाललोय !), ना चमकी, ना पावडर म्हणजेच गालावर लावतात ते रुज, चांगले फौंडेशन, सगळं एका बाजूला ठेऊन द्यावं लागलं आहे, कारण मास्क मुळे याचा काहीच उपयोग होत नाही. अगदी टिकली सुद्धा मॅचिंग करावीशी वाटत नाही.
पावडर तर सोडाच, वेगवेगळ्या नाकातील चमक्या, कानाचे टॉप्स सुद्धा मास्क पुढे झाकून गेल्या सारखे वाटते.
आहो.. खरं तर मैत्रीण/ओळखीचे कोणी समोर आले तर पटकन ओळखताही येत नाही. आपल्या मैत्रिणीमध्ये सुध्दा एकेकीची स्पेशालिटी असते. डार्क लिपस्टीक म्हणजे हीच, मोठं गंध / टिकली किंवा काहींची चमकी सुध्दा मोठी / लहान, प्रत्येकाची एक ओळख होती, पण मास्क मुळे सगळे सारखेच दिसतात. त्यात लॉकडाऊन मुळे नवनवीन फॅशनचे ड्रेस सुद्धा नाही मिळत बघायला.
मला तर असं वाटतं मास्कमुळे आपला रंग उजळलाय, कारण चेहऱ्याचा ऊन, धूळ, आणि बाहेरील पोल्युशन पासून बचाव होतोय. म्हणून डोळ्यापासून ते मानेपर्यंत रंग उजळला आहे असे वाटते. तुम्हाला सुध्दा असे वाटते ना ?
आतातर घरातच बसून असल्याने चेहऱ्याकडे म्हणजेच आरशात, स्वतःला बघायचा प्रश्नच येत नाही. आपलं मेकअप किट जणु एका बाजूला ठेऊन दिलंय, छान छान ड्रेस, भारी साड्या सगळ्या कपाटात बंदिवान झाल्यात. कोण आपल्याला बघतोय ? या भावनेने साधे सुधे कपडे परिधान करतोय.
अगदी घरच्या घरी जुन्या सुती कपड्याचे मास्क कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आवडीने बघितले/चर्चिले जातायेत. मॅचिंग मास्क घालण्याकडे कल वाढतोय.
मास्क सुध्दा किती वेगवेगळ्या प्रकारचे आलेत….
मेडिकेटेड, कॉटनचे, एन ९५ मास्क, लहान मुलांचे विविध प्राणी, पक्षी असलेले मऊसूत मास्क, तर छान कलरफुल पैठणीच्या कपड्याचे, काही मास्क तर जणू फुलपाखरू उडतंय चेहऱ्यावर असे सुंदर सुंदर. काहींवर कंपनीचा/बँकेचा लोगो, काही हौशी, हिरेजडित मास्क वापरतात. काही मास्कला इलेस्टिक तर काही नाडी बांधून सुद्धा घालतात.
काही मास्क द्वारे सामाजिक संदेशही दिला जातो.
हल्ली लग्न समारंभात शालू बरोबर नवरा नवरीचे प्रिंटेड फोटो असलेले मास्क घालायची फॅशनच झाली आहे. लग्नात अक्षतांबरोबर मास्क भेट द्यायची प्रथा रूढ झाली आहे.
खरं तर फक्त डॉक्टर, दंतवैद्य, ऑपरेशन थिएटर यांच्या कडेच मास्क आपण बघत आलो. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मास्क हा आज आपल्या जीवनाचा जणु अविभाज्य भाग होईल. डॉक्टर आणि नर्स यांचा तर मास्क लावणे हा कामाचा भाग आहे, पण आता या महामारीमुळे आपल्यालाही बंधन कारक झालाय.
गावाकडे जनावरांना सुद्धा मास्क वापरतात. मुंगसे म्हणतात त्याला. कशातही तोंड घालू नये, चारा व्यतिरिक्त इतर काही खाऊ नये म्हणून. गाईचे दूध ठरलेल्या वेळेत काढण्यात यावं म्हणुन वासरांना सुद्धा मुंगसें घालतात.
तर असे हे विविध मास्क असले तरी, मास्क काढताना सुध्दा कसा काढावा हे सुद्धा तेव्हढेच महत्वाचे. मास्कला सरळ समोरून हाथ लावून काढू नये, कारण बाहेरचे विषाणू बसलेले असू शकतात. मास्क कानाजवळून काढणे व लागलीच धुवून टाकणे किंवा लागलीच योग्य प्रकारे टाकून देणं योग्य. दुसऱ्याचा मास्क वापरू नये. किंवा तो उगाचच हनुवटीवर लावून ठेऊ नये.
मास्क लावायला आताच्या कोरोना महामारीमध्ये आपण चांगलेच सरसावलो आहोत, पण….आम्हा स्त्रियांची सौंदर्य प्रसाधनं काकूळतेने आमच्या कडे बघतायेत असे वाटते. कधी एकदाचा कोरोना जातो आणि पूर्वीप्रमाणे नटतो असं झालंय. असो…..मी फक्त मनातील व्यथा सांगितली. काय मैत्रिणींनो खरंय ना ?
– लेखन : अलका भुजबळ. 9869484800
A very good article @ mask
वेगवेगळ्या प्रकारच्या मास्क बद्दल मिश्किलपणे छान माहिती दिली. पूर्वी जनावरांनी शेतात काम चालू असताना इतर माल खाऊ नये म्हणून मुस्के घातले जायचे. आज मानवाला आपल्या स्वतःच्या बचवासाठी मुस्के ( मास्क ) घालावा लागत आहे. असो मास्क मुळे समस्त महिला वर्गाची खूपच कुचंबना झालेली दिसून येते. ती लवकरात लवकर दूर होवो अशी ईश्वराकडे प्रार्थना. मास्क जाऊन सौंदर्य प्रसाधनं वापरण्याची आपली इच्छा लवकरच पूर्ण होवो ही सदिच्छा 🙏
छान आहे लेख…खरचं मास्कने परिवर्तन केलेय स्त्रियांचे..म्हटलं तर फायदा आहे…पण हौसमौज गेली ना नसायची…
मास्कबद्दल खूप छान माहिती आहे. विविध विषय समाविष्ट केले आहेत. अभिनंदन!
नमस्कार, सर. आपल्या सारख्या मातब्बर साहित्यिकाने दिलेल्या शाबासकी बद्दल शतशः आभारी आहे. आपलं मार्गदर्शन असू द्या.
बापरे नुसत्या मास्क या शब्दात केवढी माहीती दडलीय.किती गोड शब्दात ती फुलवलीय. मास्कचा वापर तर अनिवार्य आहेच त्याचे महत्व तसच थोडासा मिश्किल गोड किती छान शब्दात सौ. भुजबळांनी खुलवलाय. खुपच छान
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार. असाच लोभ असू द्या.