परवा जराशी कुजबुज
आली थोडी ऐकू…
अय्या खरंच की ,
गप्पा मारताय कपाटातल्या वस्तू…..!
वस्तूही साध्या सुध्या नाहीत बरका….
स्त्रियांचे सौंदर्य आमच्यामुळेच..
म्हणून मिरवतात ह्या ठसका…
लिपस्टिक म्हणते..
किती जाड झाले मी बाई…
किती दिवस झालेत..
ओठांच्या ट्रेडमिलवर
चालायची संधीच मिळली नाही….
पावडरचा डब्बा आता
फुस फुस करून रागावतो
रोज झाकण उघडुन…
“अपना टाईम आयेगा..”
म्हणत बसतो ..
काजळ तर भोगतिये
अंधाऱ्या कोठडीची सजा…
नजरेची किनार खुलवण्याची
तिची काही औरच मजा…
लायनर, आयशाडो
नेहमीच खातात जास्त भाव…
पण आता त्यांनाही प्रश्न पडलाय..
कधी पडायचं बाहेर आणि कसं ?
कानातले, गळ्यातले, परफ्यूम
लीप बाम.. कोणालाच करमेना..
काय तर.. म्हणे माणसांमध्ये
चालू आहे कोरोना.. कोरोना…..
मग मीही गेले त्यांच्या
गप्पात रंगून….
म्हटलं.. तुम्हीच काय ..
सगळेच कंटाळले
घरात बसून बसून ..
पण हो…एक चान्स आहे .
तुमचं लॉकडाऊन सुटण्याचा….
जेंव्हा मिळेल मला
स्लॉट वॅक्सीनचा…!!!

– रचना : सौ. प्रियांका रत्नेष निनगुरकर