समस्त पालक आणि पाल्यांनी करिअर निवडतांना त्यांचा कल आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील आवड, याचा विशेषत्वाने विचार करून शालेय जीवनापासूनच करिअरचे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे निवडलेल्या क्षेत्रासाठी केलेली मेहनत नक्कीच फलदायी ठरते असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक, करिअर मार्गदर्शक, “करिअरच्या नव्या दिशा” या पुस्तकाचे लेखक तथा न्युज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते मिशन प्रशासनने नुकतेच ऑनलाइन आयोजित केलेले ५ वे पुष्प गुंफताना बोलत होते.
आपल्या इच्छेप्रमाणे आपण करिअर निवडून त्यात यशस्वी होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेच पाहिजे पण त्याच बरोबर पर्यायी करिअरसाठीही तयारी केली तर मूळ करिअरमध्ये यश न मिळाल्यास अपयशसुद्धा सुसह्य होते. नैराश्य येत नाही. त्यामुळे उमेद कायम राहते व पुनश्च उभारी घेता येते. डिप्रेशनची वगैरेची चिंता नसते.
आज सोशल मिडियामुळे करियरच्या उपलब्ध विविध संधी, शैक्षणिक कोर्सेसची माहिती सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे करिअरची निवड करण्यात मोठेच साह्य लाभते. असे असले तरींही आपल्या आवडीनुसार, त्या क्षेत्रातील भविष्यातील प्रगतीची शाश्वतीची खातरजमा डोळसपणे करणे गरजेचे असते. जिथे खूप गर्दी आहे, अशा ठिकाणी न जाता आपली आवड, क्षमता यांचा विचार केला पाहिजे.
यशासारखे दुसरे यश नाही, हे खरे असले तरी, अपयश म्हणजे जीवनाचा अंत नव्हे, अपयश हे क्षणिक आहे, कायमस्वरूपी नव्हे हे लक्षात घेऊन नैराश्यामुळे जीवन संपवु नये हा मोलाचा, धीर देणारा संदेश श्री भुजबळ यांनी यावेळी दिला.

प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असल्या तरीही कष्टाने त्यांच्या कक्षा विस्तारित करता येतात, असे सांगून त्यांनी स्वतःचेच उदाहरण दिले.
करिअरचा बेस उत्तम प्राप्ती हा असला तरीही कामापासून समाधान मिळणेही महत्त्वाचे असते असे सांगून त्यांनी ठराविक अभ्यासक्रम घेतला म्हणून ठरावीकच मार्ग, असे आजकाल नसते, आपली आवड आणि क्षमता जोखून सर्वत्र प्रयत्न असु द्यावा, असे सांगितले.
श्री भुजबळ सरांचे उद्बोधन अत्यंत मार्मिक होते. त्यामुळे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, अन्य श्रोते अत्यन्त प्रभावित झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्र संचालन मिशन प्रशासनचे अग्रणी श्री निशिकांत धुमाळ यांनी अत्यन्त जोशपूर्ण केले.

श्री भुजबळ सरांचे मार्गदर्शन, श्री निशिकांत धुमाळ यांचे लिलया सूत्र संचालन यामुळे हा कार्यक्रम एकुणच खूप उपयुक्त ठरला.
विद्यार्थ्यांनी, पालकांनी स्वतः चे यथार्थ मूल्यमापन करूनच पाऊल टाकावे व निष्ठेने पुढे जावे असा मोलाचा संदेश देणारा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल
आयोजक आणि मार्गदर्शकांचे मनःपूर्वक आभार. हा पूर्ण कार्यक्रम आपणास पुढील यु-ट्यूब लिंक वर पाहता येईल.
https://www.youtube.com/channel/UC3OGtPNXJNyZ6ZxW85yNDlw

– लेखन : राम भेलोंडे. नागपूर
“गर्दी असेल तिथे जावू नये.” देवेंद्र सरांचा हा संदेश, आजच्या पिढीला खूप मोलाचा असेल. “अपयश म्हणजे जीवनाचा अंत नसतो.” सरांनी दिलेला हा मंत्र, आजच्या पिढीने जरूर मनात कोरावा.सुंदर व उपयुक्त लेख आहे.
True & meaningful