Wednesday, July 2, 2025
Homeबातम्याकरिअरसाठी पर्याय असावेत - देवेंद्र भुजबळ

करिअरसाठी पर्याय असावेत – देवेंद्र भुजबळ

यूपीएससी व एमपीएससीच्या मुख्य परीक्षा देत असताना, सर्वच उमेदवार निवडल्या जातील, असं शक्यच नाही. म्हणून दुर्दैवाने निवड नाही झाली तर पुढे काय करावे ? हा मोठा बिकट प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच मुख्य परीक्षेची तयारी करीत असताना पर्यायी करिअरची तयारी करून ठेवली तर आयुष्य निश्चिंतपणे जगता येते आणि आपण करीत असलेल्या कामालाही न्याय देता येतो असे स्पष्ट प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक तथा न्युज स्टोरी टुडे या प्रसिद्ध वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी नुकतेच केले.

महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, चांगुलपणाची चळवळ, पुढचं पाऊल आणि मिशन आयएएस संस्था संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन ‘करिअर कट्टा‘ या कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री देवेंद्र भुजबळ पुढे म्हणाले की, केंद्रीय पातळीवर युपीएससीतर्फे तर राज्य पातळीवर एमपीएससी मार्फत स्पर्धा परिक्षा घेतल्या जातात. युपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षेतून आपण आयएएस होणे हेच अनेकांचे आकर्षण असते. पण सगळ्यांची त्यासाठी निवड होतेच असे नाही. युपीएससीतर्फे अन्य अनेक सेवांसाठी परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, संरक्षण दलातील सेवा या व अशासारख्या अनेक सेवांचा समावेश आहे.

तर एमपीएससीतर्फे घेतल्या जाणार्‍या स्पर्धा परिक्षांमधून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी, पोलीस अधिकारी अशा विविध पदांसाठी उमेदवार निवडले जातात. त्याच बरोबर न्याय सेवा, कृषी सेवा,शिक्षण सेवा, आरोग्य, अभियांत्रिकी, माहिती अशा अन्य सेवांसाठीही परीक्षा घेतल्या जातात.म्हणून आपण अमुकच आपण झाले पाहिजे, असा अट्टाहास न धरता अन्य क्षेत्रातील अनेक पदांसाठी प्रयत्न करीत राहणे आवश्यक आहे.

काही मुलं- मुली 22 /23व्या वर्षी आयएएस होतात. पण त्याचे रहस्य असे असते की, आई-वडिल त्यांच्या मुलांसाठी त्याच पदासाठीचा अभ्यासक्रम निवडतात. त्यामुळे त्यांची तयारी त्यांनी कितीतरी वर्षांपासून चालवलेली असते. म्हणून शालेय जीवनापासूनच पालकांनी आपल्या मुलांचा कल कशात आहे हे ओळखले पाहिजे व त्यांची तयारी करुन घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपणास अधिकारीच का व्हायचे ? मग सरकारी अधिकारीच का व्हायचे याचा मुळात विचार करून खासगी क्षेत्र, बँकींग, विमा, परिवर्तन अशा अनेक क्षेत्रांसाठीही अधिकारी लागतात. त्यामुळे केवळ सरकारी सेवेच्या ग्लॅमरचा विचार न करता आपल्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडून त्यात निपून झाले पाहिजे. बाह्य प्रभावाला बळी न पडता आपली तयारी करायला हवी, असे सांगून त्यांनी मुख्य परीक्षेत अपयश आले तरी एमपीएससी, युपीएससी या परिक्षा व्यतिरिक्त अन्य परिक्षांचाही विचार केला पाहिजे, असे सांगितले.

देवेंद्र भुजबळ

स्वतः चेच उदाहरण देताना श्री भुजबळ म्हणाले की, मी प्रारंभीच माझ्या आवडीचे माध्यम क्षेत्र निवडले.
त्या दृष्टीनेच तयारी करीत राहिलो. त्यामुळे मुंबई दूरदर्शनमध्ये नोकरीं करीत असताना १९९१ साली माझी यूपीएससी तर्फे प्रोग्राम एक्सिक्यूटीवच्या ३ पदांसाठी, भारतीय माहिती सेवेच्या वरीष्ठ श्रेणी पदासाठी, पत्रकारिता अधिव्याख्याता आणि महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा माहिती अधिकारी अशा ६ राजपत्रित पदांसाठी निवड झाली. शेवटी मी साधकबाधक विचार करून जिल्हा माहिती अधिकारी ही सेवा निवडली आणि त्यात यशस्वी होत गेलो आणि समाधानाने आयुष्य जगलो आणि जगत आहे. त्यामुळेच केवळ एकाच सेवेवर अवलंबून न राहता अन्य सेवांचा विचार व अभ्यास करावा असा मोलाचा सल्ला श्री भुजबळ यांनी यावेळी विद्यार्थांना दिला.

प्रारंभी मिशन आयएएसचे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी भुजबळ यांचा परिचय करुन दिला. मिशन आयएएसला नुकतीच 21 वर्ष पूर्ण झाली असून संस्थेतून ज्यांनी ज्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली, त्यातील आज अनेकजण चांगल्या हुद्यावर असल्याची माहिती नरेशचंद्र काठोळे यांनी दिली.

या ऑनलाइन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

शेषराव वानखेडे

– लेखन : शेषराव वानखेडे.

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. शेषराव वानखेडे यांनी अतिशय सुंदर मुलाखत घेऊन ती वाचकांसमोर मांडली. या मुलाखतीतून देवेंद्र भूजबळ सरांचे अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन तसेच स्वतःचे अनुभव स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रासाठी मोलाचे ठरतील.

  2. भुजबळ सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे. करिअर चे इतके पर्याय नक्कीच युवकांच्या विचारांच्या क्षितिजांना अधिक विस्तारित करतील.
    धन्यवाद भुजबळ सर🙏🏻

  3. नमस्कार
    करिअर कट्टा मध्ये आदरणीय श्री भुजबळ सरांनी फार सुंदर मार्गदर्शन केले आणि ते आजच्या तरुण पिढीला आवश्यक आहे आणि त्यात सरांनी आपला स्वतःचा आयुष्याचा प्रवास कसा केला ते अनुभव सांगितलं.
    फार सुंदर माहिती आहे त्याच्या फायदा आजच्या तरुण पिढी ने घेवून आपल्या स्वतःच्या आयष्य सुधारण्यास मदत होते.
    आदरणीय भुजबळ सरांचे आणि शेषराव वानखेडे सरांचे खूप खूप आभारी आहोत.

  4. करियर कट्टय़ावरील, करियरचे अनेक पर्याय देवेंद्र सरांनी आजच्या युवकांसमोर, अगदी सोपे करून मांडले होते. व ते वानखेडे यांनी संकलित करून वाचकांसमोर सादर केले.खूप आभार!

  5. करिअरसाठी पर्याय असणे आवश्यक आहे. केवळ आयएएस, आयपीएस, हेच जीवनाचे अंती मध्ये अंती मध्ये अंतिम ध्येय नसावे. आय. ए. एस. झालो म्हणजे सर्वकाही झालो असे म्हणता येणार नाही. कारण अशा उच्च पदासाठी सर्वांचीच निवड होईल हे सांगता येणार नाही. तेव्हा आपण इतरही खूप महत्त्वाचे अभ्यासक्रम समाजात आहे. आपण खूप तपशीलवार मध्ये करिअरचे अनेक पर्याय चांगल्या प्रकारे सांगितले आहे. शेषराव वानखेडे यांनी खूप चांगली माहिती संकलित करून सादर केली आहे त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४