Home लेख करूया नेत्रदान : 3

करूया नेत्रदान : 3

0

समारोप
माझ्या सासऱ्यांचे वयाच्या ९० व्या वर्षी २००३ साली निधन झाले. ते अगदी निरोगी, आनंदी, निरामय आयुष्य जगले. शेवटपर्यंत कार्यरत राहिले. आम्ही त्यांचे नेत्रदान करविले. त्यामुळे त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची सुंदर सुफल सांगता झाली.

त्यानंतरच्या १५ ऑगस्टला त्या नेत्रपेढीने कृतज्ञता म्हणून नेत्रदात्यांच्या नातेवाईकांना बोलावले होते. आम्ही पण गेलो होतो. त्यावेळी थोडेसे बोला असे सांगितलेले होते. अगदी थोड्या वेळात काय बोलावे हा विचार करताना घर ते हाॅस्पिटल या १५-२० मिनिटांत एक कविता सुचली. तिथे गेल्यावर ती एका कागदावर लिहून काढली आणि कार्यक्रमात वाचली. ती सर्वांना खूप आवडली. डाॅ.नी मागून घेतली. आजही एका नेत्रपेढीत तिचा बोर्ड लावला आहे.

!! नेत्रदान !!
आलेला प्रत्येक जणच जातो
ठरवून दिलेल्या वाटेने
मागे रहाणारा दु:खी होतो
विरहाच्या वेदनेने ||

देहाचे या लेणे
ईश्वराचे देणे
त्यांचे त्याला समर्पित
करावे श्रध्दाभावाने ||

रिक्त येसी रिक्त जासी
जाण इतरांच्या वेदनेसी
नश्वर देह आत्मा अविनाशी
स्मृती चिरंतन कर्मयोगाची ||

समाजकार्याच्या ओंजळीत
आपुलाही एक मोती
मांगल्याचे तेज पसरो
स्नेहाची ज्योती ||

जाता जाता पुण्य घडो
राखण्या ईश्र्वराचा मान
उजळण्या दोन नेत्रज्योती
करूया नेत्रदान ||

प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचे आहे. पण आयुष्यात असे काही तरी करावे की जगण्याचे सार्थक होईल.

हा निरोगी देह लाभला ही ईश्वराची मोठी कृपा आहे. वेळ झाली की तो जाणार हे ठरलेले आहे. पण त्याने केलेले चांगले काम मात्र मागे कायम रहाते.

आपण आपले समाजऋण फेडून ईश्वरी कृपेचा मान राखायला हवा. त्यासाठीच नेत्रदान करायचे. हा संकल्प खूप मौल्यवान आहे. एकाच्या नेत्रदानाने दोन जणांना दृष्टी मिळते. तेव्हा अवश्य नेत्रदानाचा संकल्प करूया. आपल्या आयुष्याची सफल सांगता करण्याचा या सारखा सहजसोपा मार्ग नाही.

सर्वांना माझे कळकळीचे आवाहन आहे की, आपण सर्वजण मिळून ही चळवळ यशस्वी करू या.
समाप्त

ज्योत्स्ना तानवडे

– लेखन : ज्योत्स्ना तानवडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version