पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने जरी मी हा लेख लिहित असलो तरी, या लेखात त्यांचा जन्म कधी, कुठे झाला, त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कामगिरी तसेच गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताच्या पंतप्रधान पदाची कारकिर्द यावर काही न लिहिता पूर्णपणे त्यांच्या अखंडपणे कार्यरत राहण्याविषयी लिहित आहे आणि माझ्या या लिहिण्याला स्वानुभवाचा संदर्भ आहे.
भारत सरकारचे दूरदर्शन आणि महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अशी माझी एकत्रित ३२ वर्षांची सेवा झाली आहे. आता मी जेव्हा ३२ वर्षे सेवा झाली आहे, असे म्हणतो ते ती कॅलेंडरप्रमाणे झाली आहे. एकही दिवस रजा, सुट्टी न घेता झालेली आहे, असे नाही. याचे कारण म्हणजे, सरकारी नोकराला दर वर्षी ३० दिवस अर्जित रजा, २० दिवस अनार्जित रजा (ही रजा वैद्यकीय रजा म्हणून जास्त ओळखली जाते !) ८ दिवस किरकोळ रजा, ५२ रविवार, ५२ शनिवार, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, वर्षभरात येणारे सण, जयंत्या, पुण्यतिथ्या, स्थानिक सुट्ट्या असा जर विचार केला तर वर्ष भरातील जवळपास १८० दिवस सरकारी नोकर आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यापासून दूर राहू शकतो. याचा अर्थ असाही नाही की, सर्वच जण या प्रमाणे रजा घेतात. काही विभाग, काही अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप असेही असते की, १८० दिवस काय ८ दिवसांची रजा मिळायची देखील मारामार असते. तसेच काही गोष्टी ज्याचा त्याचा स्वभाव, प्रवृत्ती यावरही अवलंबून असतात.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण असे आहे की, गेल्या २५ वर्षांत, म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि पुढे भारताचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी, कुठल्याही कारणाने होईना, एकही दिवस रजा घेतलेली नाही. आजपर्यंत ते अखंडपणे काम करीत आले आहेत. ना त्यांनी वैद्यकीय कारणास्तव रजा घेतली ना, आई वारली म्हणून रजा घेतली ! खरोखरच त्यांची ही कार्यनिष्ठा, देशाच्या प्रती पूर्णपणे समर्पित वृत्तीने काम करण्याची भावना पाहिली की, हा माणूस आपल्यासारखाच रक्तामांसाने बनलेला आहे हे खरेच वाटत नाही !
ऐन तारुण्यात संसाराचा त्याग करून नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने देश कार्याला वाहून घेतले.
स्वयंसेवक म्हणून संघाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या ते अतिशय निष्ठेने पार पाडत आले आहेत. १९७८ साली संघाने त्यांना वडोदरा आणि सुरत विभागाचे प्रादेशिक संघटक म्हणून नेमले. पुढे यथावकाश त्यांच्यावर राजकीय जबाबदाऱ्या सोपविल्या म्हणून ते राजकारणात आले. कुठल्याही पदाच्या, सत्तेच्या, संपत्तीच्या आमिषाने नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
आज आपण जेव्हा राजकारणातील आणि सार्वजनिक जीवनातील व्यक्ती बघतो, तेव्हा आपल्याला भयंकर संताप येतो, चीड येते. कारण आपल्याला हे दिसत असते की, बऱ्याच व्यक्ती या सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून संपत्ती गोळा करण्याच्या मागे लागल्या आहेत. त्याच हेतूने त्या काम करीत आहेत. पण नरेंद्र मोदींच्या बाबतीत मात्र त्यांनी स्वतःसाठी, स्वतःच्या सग्यासोयऱ्यांसाठी पदाचा दुरुपयोग केला असे कुणी म्हणू शकणार नाही. या बाबतीत ते किती कर्तव्य कठोर आहेत, याची काही उदाहरणे देता येतील. ती म्हणजे ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर पंतप्रधानमत्री म्हणून काम करीत असताना, त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी जमली आहेत, मजेने त्यांच्या सोबत रहात आहेत, त्यांच्या सोबत देशात, विदेशात फिरत आहेत अशी एकही घटना आजतागायत घडलेली नाही.
जिथेही ते राहतात, एकटे राहतात. जिथेही ते जातात, एकटे जातात. त्यांच्या सोबत सरकारी कामाशिवाय अन्य कुणी व्यक्ती असल्याचे मला तरी कधीच दिसले नाही. कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा विशेष वागणूक न देण्याचा नरेंद्र मोदी यांचा स्वभाव आहे.
या विषयी, वाचलेला एक प्रसंग आठवतो, तो म्हणजे ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांची पदवीधर झालेली पुतणी त्यांना भेटली आणि तिने त्यांना नोकरी लावून देण्याची विनंती केली.
यावर मोदींनी तिला सांगितले, मला तुझ्या सारख्या हजारो, लाखो पुतण्या, भाच्या आहेत. त्या सर्वांनाच मला नोकरी द्यायची आहे. त्यामुळे तुला एकटीलाच मी नोकरी कशी देऊ ?
मला असे वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कर्तव्यपरायणता, निस्पृह वृत्ती, सार्वजनिक जीवनातीलच नाही तर प्रत्येक नागरिकाने अंगी बाणवली तर भारत विकसित देश होण्यासाठी २०४७ साल उजाडण्याची वाट पहात बसावे लागणार नाही.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आनंदी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800