Sunday, July 6, 2025
Homeकलाकलायात्री प्रा.डॉ.सुभाष पवार

कलायात्री प्रा.डॉ.सुभाष पवार

मित्रवर्य, चित्रकार, कला प्राध्यापक, समीक्षक, लेखक प्रा डॉ सुभाष पवार सर यांना जाऊन बोलता बोलता १३ दिवस झाले. ते गेले, हे मानायला मन तयार होत नव्हतं. पण ती वस्तुस्थिती होती. ते गेले, त्यावेळी मी
मुंबईतच नसल्याने त्यांच्या अंत्यदर्शनाला जाऊ शकलो नाही. पण आज त्यांच्या तेराव्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी गेलो. अत्यन्त विद्वान असूनही अतिशय सहजपणे बोलणारे, मिश्किल स्वभावाच्या पवार सरांना हार घातलेल्या तसबिरीत बघताना मन गलबलून गेले.

सर केवळ चित्रकार किंवा प्राध्यापकच नव्हते तर सर्व सामान्यांमध्ये चित्रकलेची जाण निर्माण व्हावी यासाठी ते अविरतपणे कार्यरत राहिले. विविध वृत्तपत्रातून ते लेखन करीत. त्यांच्या चित्रकलेबद्दल त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. चित्रकला,
चित्रकारांची सरळसाध्या, सोप्या शब्दांत ते माहिती देत. त्यांनी केलेले कार्य कलेच्या क्षेत्रात ऐतिहासिक महत्वाचे आहे.

पवार सरांनी १० वर्षांपूर्वी लिहिलेल्या “महान भारतीय चित्रकार” या ग्रंथाचे प्रकाशन झाले होते. त्यानिमित्ताने त्यांची मी घेतलेली मुलाखत येथे देत आहे. या मुलाखतीवरून त्यांच्या कार्याची थोरवी निश्चितच आपल्याला कळेल. पवार सरांना विनम्र अभिवादन.

आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्रकलेचे अध्यापन करणाऱ्या प्रा.सुभाष एकनाथ पवार यांच्या “महान भारतीय चित्रकार “या संदर्भ कला ग्रंथाचे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, प्रा.सुहास बहुलकर यांच्या उपस्थितीत मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत नुकतंच झालं. या ग्रंथाच्या निमित्ताने प्रा.सुभाष एकनाथ पवार यांच्याशी केलेली ही थेट बातचीत….

भारतीय कला क्षेत्रात आपल्या चित्र कर्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या जेष्ठ व श्रेष्ठ १५० चित्रकारांचा परिचय करून देणाऱ्या अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथाची संकल्पना आपणास मुळातच कशी सुचली ? असे विचारले असता पवारसर म्हणाले, “गेली जवळपास तीस वर्षे मी चित्रकलेचा अध्यापक म्हणून व स्वतः चित्रकार म्हणून तसेच कलासमिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या कारकिर्दीच्या प्रारंभीच मला असे जाणवू लागले की, आपल्याकडे चित्रकलेच्या इतिहासाकडे ज्या गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, पाठपुरावा करायला हवा तो झालेला नाही आणि म्हणून मी स्वतः हे काम हाती घेऊन देशातील विविध भागातील चित्रकारांची, त्यांच्या चित्रांची माहिती संकलीत करू लागलो. पुढे एका वृत्तपत्राच्या संपादकाशी चर्चा करताना देशातील विविध चित्रकारांच्या कारकिर्दीवर आधारित लेखमाला प्रकाशित करता येवू शकेल असे निष्पन्न झाले.

ही लेखमाला नियमित प्रसिद्ध होऊ लागताच वाचकांचा आणि विशेषतः चित्ररसिकांचा या लेखमालेस उदंड प्रतिसाद मिळाला. पुढे हे लेख एकत्रितरित्या वाचनास मिळावे अशी कलारसिकांकडून मागणी होऊ लागली. काही चित्ररसिकांनी तर प्रसिद्ध झालेली कात्रणे एकत्र करून त्यांचे व्यक्तिगत संग्रह तयारही केले. चित्ररसिकांचा प्रतिसाद आणि अशा संदर्भ ग्रंथाची गरज यातूनच या संदर्भ कला ग्रंथाची प्रेरणा मिळाली.”

या ग्रंथात कोणत्या चित्रकारांचा समावेश करण्यात आला आहे ? याविषयी बोलताना पवार सर म्हणाले, साहित्यात जसे वेगवेगळे प्रवाह असतात तसेच प्रवाह चित्रकलेतही आहेत. परंतु कोणतेही चित्र मनाला आनंद देणारे असावे अशी माझी चांगल्या चित्राविषयीची धारण आहे. त्यामुळे कलाक्षेत्रात चांगले योगदान दिलेल्या, व्यक्तीचित्रणापासून ते निसर्गचित्रापर्यंत, अमूर्त चित्रापासून ते मुद्राचित्रणापर्यंत, धार्मिक चित्रापासून ते सामाजिक लोकजीवनापर्यंत, बोध चित्रापासून ते मुखपृष्ठ चित्रापर्यंत अशा विविध विषयांवर चित्र काढलेल्या चित्रकारांचा या ग्रंथात समावेश केलेला आहे.

ही माहिती व चित्रे कशी प्राप्त झाली ? असे विचारल्यावर पवारसर म्हणाले, “देशातील सर्वच चित्रकारांची माहिती, त्यांची चित्रे एकत्र उपलब्ध नसल्यामुळे ही सर्व माहिती गोळा करण्यासाठी, प्रसंगी चित्रकारांच्या जन्मगावी, कर्मभूमीत त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जावे लागले. काही थोर चित्रकारांच्या चित्रांची छायाचित्रे घेण्यासाठी विविध संग्रहालयामध्ये जावे लागले, असे सांगून हे काम अत्यंत जिकरीचे जसे होते तसेच खूप आनंद देणारेही होते, त्यामुळे या कामाने मिळालेला आनंद शब्दातीत आहे” असे पवार सर म्हणाले.

महान भारतीय चित्रकारांच्या ग्रंथात पवार सरांनी केवळ भारतीय वंशाच्याच चित्रकारांचा समावेश केलेला नाही, तर भारतात वास्तव्य केलेल्या आणि भारतीय शैलीची चित्र काढलेल्या कॅप्टन डब्ल्यु. ई. ग्लॅस्टन सालोमन, रोरीच, प्रा.व्हॉटर, मिस मेरी हेंडरसन या विदेशी चित्रकारांचाही समावेश केला आहे. ग्रंथात
अंत्रिदांद, श्रीमती अंबिका धुरंदर, अमृता शेरगिल, सौ प्रेमा विनायक पाठारे, बी.प्रभा, कु.रतन वडके या महिला चित्रकारांचाही समावेश आहे.

आधुनिक भारतीय चित्रकलेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजा रविवर्मा यांच्यापासून या ग्रंथाची सुरवात होते. ग्रंथाच्या उजव्या बाजूच्या पानावर चित्रकाराचा सचित्र जीवन परिचय व डाव्या बाजूच्या पानावर चित्रकाराने काढलेले चित्र दिले असल्याने हा ग्रंथ अत्यंत आकर्षक व वाचनीय झाला आहे.

थोडक्यात, गेली १५० वर्षातील भारतीय चित्रकलेचा इतिहास उलगडून दाखवण्याचे कार्य या संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातून झाले आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

पवार सरांनी लिहिलेली “राशीनुसार करियर मार्गदर्शन”, “नवग्रह ज्योतिष दरबार” आणि “ज्योतिष सुभाष्य” ही ज्योतिषविषयक पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. ‘भारतीय चित्रकार आणि ज्योतिष ग्रहयोग’ या विषयावर त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापिठात प्रबंध सादर करून पीएचडी मिळवली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कलाशिक्षण क्षेत्रातील आदर्श कलाशिक्षक पुरस्काराचेही ते मानकरी ठरले होते. असेच उपक्रम पुढेही हाती घेण्याचे पवार सरांनी ठरविले असून त्यांच्या भावी उपक्रमासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ या….

– लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. चित्रांच्या साम्राज्याचा महासम्राट. त्यांच्याबद्दल फार माहिती नव्हती. परंतु आपल्या लेखामुळे त्यांच्या अफलातून चित्रशैलीबाबत खूप काही समजले. अशा या महासम्राटाला मानाचा मुजरा…

  2. डॉ. प्राचार्य. श्री सुभाष ए. पवार यांची अतिशय मुद्देसूद आणि सर्वांगीण व्यक्तिमत्वाची जाणीव श्री भुजबळ यांच्या लेखातून कळली. हा लेख निच्छितच भुजबळ सरांचे श्री पवार सरांशीचे मित्रत्व आणि आत्मीयता दर्षवते. भुजबळ सरांनी वरील माहिती प्रकाशित करून दिवंगत श्री सुभाष पवार सरांना एक आगळी वेगळी श्रद्धांजलीच वाहिली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मी ही भुजबळ सरांचे आभार मानतो….श्रीकांत द. चव्हाण, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments