नवरस माहिती
रतिहासश्च शोकश्च क्रोधोत्साहौ भयं तथा।
जुगुप्सा विस्मयश्चेति स्थायिभावाः प्रकीर्तिताः॥
रस हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, ज्यात प्रामुख्याने परफॉर्मिंग आर्ट्सचा (performing arts) समावेश होतो. शब्दशः नवरस म्हणजे ‘नऊ भावना’.
भारतीय साहित्यविचारात रसविचारांची मांडणी प्रथम भरतमुनी यांनी केली. याचे विस्तारित विवेचन अभिनवगुप्त यांनी केले. भरतमुनी यांच्या मते नृत्यात 8 रस आढळून आले आहेत – , शृंगार, करुण, हास्य, रौद्र, भयानक, वीर, बीभत्स आणि अद्भुत. जेव्हा त्यांच्यामध्ये शांत रस मिसळला जातो तेव्हा त्यांची संख्या 9 होते.
नवरस म्हणजे नऊ भावना; रस म्हणजे मनाची भावनिक अवस्था. नऊ भावना म्हणजे शृंगार (प्रेम/सौंदर्य), हास्य (हशा), करुण (दु:ख), रौद्र (राग), वीर (वीरता/धैर्य), भयानक (दहशत/भय), बिभत्स (तिरस्कार), अद्भूत (आश्चर्य) , शांत (शांतता). या नऊ भावना आपल्या जगण्याचा पुरावा आहेत.
रस म्हणजे काय तर चेहऱ्यावरील हाव भाव ! नर्तक-नर्तिका, अभिनेता-अभिनेत्री त्यांच्या अभिनय कलेद्वारे या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि त्या प्रेक्षक अनुभवू शकतात, त्यालाच रसास्वाद असे म्हणतात. जसे की एखादा अभिनेता-अभिनेत्री हसते तेव्हा हसू येतं, रडत असतील तर रडू येत. नाटकामध्ये किंवा नृत्यामध्ये सुद्धा जेव्हा वीरतापूर्ण, जोश पूर्ण काही घडत असेल तर प्रेक्षकांमध्ये सुद्धा एक वीररस निर्माण होतो किंवा चुकीचं काही घडत असेल तर क्रोध निर्माण होतो कृष्ण राधेचे आपण जेव्हा कथा समोर बघतो तेव्हा आपोआपच शृंगाररस, रासलीला आठवते प्रेक्षकांना.
सगळ्या शास्त्रोक्त नृत्य प्रकारांमध्ये यां नवरसांना अगदी अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण कुठेही नृत्यामध्ये मुखकमलाद्वारे आणि हस्तमुद्राद्वारे ते भाव दाखवायचे असतात. जसे कथकली मध्ये जर बघितलं तर फक्त चेहऱ्यामधून व डोळ्यांमधून हावभाव प्रगट केले जातात आणि हे प्रत्येक शास्त्रोक्त नृत्यामध्ये अतिशय महत्त्वाचे समजले जाते. शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये याला भावांग असं म्हटलं जातं.
नवरात्री, नऊ दिवस आदिशक्ती माँ दुर्गादेवीची १. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही नऊ रूपे आहेत. तिचे नऊ अवतार शक्ती, धैर्य आणि महिला सशक्तीकरणाचे प्रतीक आहेत. नवरात्र हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
देवीची नऊ रूपे आहेत ती तुम्ही बघितली तर हे नऊ रस पण त्या नवदुर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महिषासुरमर्दिनी वीर रस, सरस्वती देवी शांतरस, या देवीच्या रुपाकडे बघूनच आपल्याला तो रस कळतो.
नवरस
1) शृंगार रस – प्रणय, प्रेम, आकर्षण. हा रस दाखवण्यासाठी चेहऱ्यावरचे सौंदर्य, चेहऱ्यावरील आनंद, डोळ्यांत आनंदाची झलक इ. मुनी भरतांच्या मते, जे काही शुद्ध, पवित्र, परिपूर्ण आणि दृश्यमान आहे. तो श्रृंगार रस आहे, या रसाचा स्थायी भाव म्हणजे रति होय. शृंगार: ह्या रसात प्रामुख्याने स्त्री व पुरुष यांच्या एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा व आकर्षणाचा उल्लेख केलेला असतो.
अध्यक्ष देवता : विष्णू.
रंग : हलका हिरवा
2) हास्य रस- ह्या रसात प्रामुख्याने विडंबन, चेष्टा, विसंगती ह्यातून निर्माण होणारा विनोद किंवा आनंद वर्णन केलेला असतो. हा रस विनोदी नाटकांतून्, विनोदी पुस्तकातून पोचतो. आनंद किंवा हशा आनंदाचे प्रतिनिधित्व करते जी मनाची स्थिती आहे जी आपल्याला समाधानी ठेवते. विनोदी रस (हास्य रस) – विनोदी रसाचे ६ प्रकार आहेत – मुख्यतः – स्मित, हसित, विहसित, आभासित, उपासित आणि अतिहासित.
अध्यक्ष देवता : शिवगण.
रंग : पांढरा
3) करुण रस – या रसाचा कायमस्वरूपी भाव शोक आहे. हे प्रतिबिंबित करताना चेहऱ्यावर शोकाची झलक दिसते. करुण रसाचा थेट परिणाम मानवी हृदयावर होतो. करुण ह्या रसात प्रामुख्याने दुःख ही भावना जाणवते. हृदयद्रावक अशा गोष्टीचे वर्णन ह्या रसामध्ये आढळते.
अध्यक्ष देवता : यम.
रंग : राखाडी
4) अद्भूत रस – या रसची कायमस्वरूपी अभिव्यक्ती म्हणजे विस्मय आहे. हे दाखवण्यासाठी नर्तक त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दाखवतो आणि नेहमीपेक्षा डोळे मोठे करतो. अद्भुत, विस्मय हा ह्या रसाचा स्थायीभाव असतो. ह्यात प्रामुख्याने अल्लाउद्दिन व जादूचा दिवा, अरेबियन नाईट्स, परीकथा अशा प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टींचे वर्णन असते.
अध्यक्ष देवता : ब्रह्मा.
रंग : पिवळा
5) बीभत्स रस – बीभत्स रसात किळस, वीट, तिरस्कार ह्या भावना दिसतात. हे दाखवण्यासाठी नर्तक आपल्या चेहऱ्यावर द्वेष आणतो आणि नाक, भुवया संकुचित करतो.
अध्यक्ष देवता : महाकाल.
रंग : निळा
6) रौद्र रास – या रसाची भावना म्हणजे क्रोध. रौद्र रसामध्ये तोंड, डोळे लाल होऊ लागतात, ओठ दाताखाली आणि कपाळावर वक्र रेषा दिसतात. रौद्र ह्या रसात प्रामुख्याने क्रोध व चीड ह्या भावना असतात.
अध्यक्ष देवता : शिव.
रंग : लाल
7) भयानक रस – नर्तक जेव्हा ते दाखवतो तेव्हा डोळे विस्फारलेले असतात, चेहऱ्यावर भीती असते, भुवया वरच्या बाजूला असतात, शरीर स्थिर असते आणि तोंड उघडे असते. भयानक ह्या रसात भीती ही भावना जाणवते. त्यास भयानक रस म्हणतात.
अध्यक्ष देवता : यम.
रंग : काळा
8) वीर रस – वीर रसाचे चार भेद मानले जातात – धर्मवीर, दानवीर, युद्धवीर, दयावीर. वीर रसात प्रामुख्याने पराक्रम, शौर्याचे वर्णन केलेले असते. ह्या रसात उत्साह हा स्थायीभाव असतो.
अध्यक्ष देवता : इंद्र.
रंग : भगवा
9) शांत रस – जेव्हा माणसाला ऐहिक सुख, दु:ख, चिंता इत्यादींपासून मुक्ती मिळते तेव्हा त्याच्यात शांत रस निर्माण होतो. याचा अर्थ शांत, सुखी आणि समाधानी. आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आंतरिक शांती ही सर्वात मोठी शक्ती आहे. त्याचप्रमाणे शांततेने आपण द्वेष, क्रोध, मत्सर, कटुता आणि कठोर विचारांवर मात करू शकतो. म्हणूनच शांत रस हा संत, योगी आणि साधू यांच्या पसंतीचा रस आहे.
अध्यक्ष देवता : नारायण.
रंग : शाश्वत पांढरा.
– संकलक : प्रिया मोडक, श्रद्धा जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Khup chan lihal aahe Manju.
Thank You Sangeeta !!!!!!