दिवाळी
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठया प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. दिवाळी हा सर्वांचा आवडता असा सण असल्यामुळे दिवाळी या सणाची सर्वजण वाट पाहत असतात. मनाला आनंद आणि उत्साह देणारा असा हा सण आहे. पणती म्हणजे मांगल्याचे प्रतीक म्हणून दिवाळीच्या सणामध्ये घरात आणि घराबाहेर पणत्या लावल्या जातात. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ आणि ‘आवली’ म्हणजेच ‘ओळ’- याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना म्हणजे दिवाळी.
उंच जागी आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. दिवाळीची चाहूल लागली की, मज्जाच मज्जा असते. फराळ, नवीन कपडे, फटाके. दिवाळीची कितीही तयारी करा, फराळाशिवाय ती अपूर्ण आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येक भारतीय घरात फराळ तयार होतो. फराळ म्हटला की चिवडा, चकली, अनारसे, शंकरपाळे, लाडू, करंज्या आल्याच !
आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान येत असतो.
वसुबारस
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासहित पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
धनत्रयोदशी
आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशीला काली चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी आणि नरक निवारण चतुर्दशी या नांवाने देखील संबोधले जाते. प्राचीन हिंदू साहित्यानुसार नरकासुराचा वध श्रीकृष्ण, सत्यभामा आणि काली या तिघांनी आजच्या दिवशी केला होता. म्हणून या दिवसाची पहाट धार्मिक अनुष्ठान, उत्सव आणि आनंदाने साजरी करतात.
या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते.
नरक चतुर्दशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, दिवाळी पहाट हा कार्यक्रम आता भारतात जवळजवळ सगळ्या शहरांमध्ये आयोजित केला जातो. शास्त्रोक्त संगीत, सुगम संगीत, तसेच नाट्यसंगीत, भाव-भक्ती संगीत यासारखे अनेक प्रोग्राम दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध ठिकाणी आयोजित केले जातात.
लक्ष्मीपूजन
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करुन आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.
प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. लोककल्याणकारी राजा बळी, हा त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात.
घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच ‘दिवाळसण’ म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात.
पाडव्याच्या दिवशी पाडवा पहाट हा सुद्धा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी आयोजित केला जातो. यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्यावरील कार्यक्रम, सणांवर आधारित काही नृत्य प्रस्तुती, तसेच काही पारंपरिक खेळ आयोजित केले जातात.
भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले असे मानले जाते. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते.
बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.
या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. सुमारे डझनभर देशांमध्ये दिवाळीची अधिकृत सुट्टी आहे.
दिवाळीचा इतिहास
दीपोत्सव, दिपावली आणि दिवाली यांसारख्या शब्दांबरोबरच अधूनमधून दिवाळीचा उल्लेख करणारे दगड आणि तांब्यामधील संस्कृत शिलालेख भारतभरातील अनेक ठिकाणी सापडले आहेत. उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. एक परंपरा हिंदू महाकाव्य रामायणातील पौराणिक कथांशी या सणाला जोडते.
दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ला तयार करण्याच्या स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देतात.
दिवाळी सण आनंदाचा, उत्साहाचा आणि त्यामध्ये आपण संगीताचा आनंद तर घेतोच! म्हणूनच शास्त्रोक्त संगीताचा आनंद घेण्यासाठी दिवाळी पहाट ही संकल्पना मांडली गेली आणि त्याची सुरुवात साधारणपणे २० वर्षांपूर्वी झाली.
मन प्रसन्न करण्यासाठी आपण संगीत ऐकतोच आणि त्यातून दिवाळीच्या सणामध्ये जर आपल्याला हा आनंद प्रत्यक्ष अनुभवता आला तर तो दुग्धशर्करा योगच म्हणता येईल. शास्त्रोक्त संगीत तसेच वाद्य संगीताची जुगलबंदी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आयोजित केली जाते जसे की जलतरंग बासरी, सतार, व्हायोलिन, तबला यासारख्या अनेक विविध वाद्य जुगलबंदी, वाद्यवृंदाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दिवाळीमध्ये शास्त्रोक्त नृत्य संगीताची मेजवानी सुद्धा सगळ्यांना आवडते म्हणून कथक, भरतनाट्यम, कुचीपुडी, मोहिनीअट्टम यासारख्या शास्त्रोक्त नृत्यसंगीताच्या विविधरंगी कार्यक्रमांचे पण आयोजन केले जाते।
दिवाळी पहाट ही एक परंपरा आहे, जी सहसा लॉन, मोकळ्या बागा, तसेच सभागृहात आयोजित केली जाते. दिवाळीमध्ये संगीत-नृत्त्यामुळे तुमचे मन व घर प्रकाश आणि प्रेमाने भरते.

– संकलक : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800