पूज्य साने गुरुजींची आज १२५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या एका नितांतसुंदर अजरामर प्रार्थनेचे रसग्रहण आपल्याला नक्कीच आवडेल. पूज्य गुरुजींना विनम्र अभिवादन.
– संपादक
साने गुरुजींनी विपुल गद्य साहित्य लिहिले आहे व काव्यरचनाही केली आहे. त्यांची काव्यरचना संख्येने थोडी असली तरी गुणवत्तेने श्रेष्ठ आहे. त्यांचे अंतःकरण अतिशय संवेदनाशील होते. फुलामुलांचे कवी म्हणून त्यांचा सार्थ उल्लेख होतो. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला आहे. त्यांनी बरीचशी कविता तुरुंगामध्ये लिहिली आहे. देशभक्ती, मातृभक्ती, ईशभक्ती यांचा उत्कट आविष्कार त्यांच्या कवितेतून होतो. साधी सोपी हृदयाला थेट भिडणारी भाषा हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट होते. मातृहृदयी साने गुरुजींनी वात्सल्य, प्रेम, मानवता व पददलितांविषयी कणव या गुणांच्या उत्कट आविष्काराने आपल्या साहित्याला मराठी भाषेमध्ये अमर करून ठेवले आहे. त्यांची अशीच एक सुंदर व सुप्रसिध्द कविता मी रसग्रहणासाठी निवडली आहे, ती म्हणजे “खरा तो एकची धर्म”…..
खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित,
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे,
जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती
सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे,
जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा,
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे,
जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल,
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे,
जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे,
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे,
जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे,
जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे,
जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे,
जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे,
जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे,
जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा,
जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे,
जगाला प्रेम अर्पावे
गुरुजींच्या या कवितेतील पहिल्या ओळीतच कवितेचे सारे सार सामावले आहे. जात, धर्म, पंथ या सगळ्या पलिकडे खरा धर्म कुठला तर जगावर प्रेम करण्याचा.
मानवाने मानवाशी मानवतेने वागावे आणि सकलांना प्रेम अर्पावे (द्यावे नाही). आपण ज्या भावनेने परमेश्वरचरणी फुले अर्पण करतो त्याच भावनेने प्रेम अर्पावे असे गुरुजी सांगतात.
हेच वाक्य प्रत्येक मराठी शाळेमध्ये सुभाषित म्हणून लिहिलेले आहे. ही कविता प्रार्थना म्हणून अनेक ठिकाणी गायली जाते. हेच या कवितेचे आणि कवीचे मोठेपण आहे.
साने गुरूजींवर महात्मा गांधीच्या जीवनशैलीचा मोठा पगडा होता. त्यामुळे दलित, गांजलेले, वंचित, दुःखी कष्टी जनांना मदत करावी असे त्यांना सतत वाटत असे. सगळी एकाच प्रभूची लेकरे आहेत. कुणाला हिणवू नये, तुच्छ लेखू नये. हे विश्व आनंद व सुखाने भरुन जावे. असे गुरुजींना वाटते.
विशाल हृदयाची आणि पारदर्शी मनाची व्यक्ती म्हणजे साने गुरुजी !
“मी पण ज्यांचे पक्व
फळापरी गळले हो
जीवन त्यांना कळले हो.”
या श्री. बा. भ. बोरकर यांच्या कवितेमधल्या जीवन आकळलेल्या संत, महात्मे व थोर व्यक्तीपैकी गुरुजी हे एक होते.
अशा महान सहृदयी हळव्या कविला त्याच्या आयुष्याचा शेवट आत्महत्येने करावा लागला ही एक शोकांतिकाच आहे.
या महान, व्यक्तीमत्वास माझी आदरांजली.
— रस ग्रहण : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सुंदर ओळी आहेत.
शुभेच्छा!
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.