कमीत कमी मजकुरात लयबद्ध शैलीत कविता खूप मोठा आशय व्यक्त करीत असते. जगभरच्या साहित्यात कवितेला मानाचं स्थान आहे.
शालेय जीवनापासून आपण कविता वाचतो, अभ्यासतो. काही जण कविताही करायला लागतात.
वाचलेल्या, ऐकलेल्या काही कविता सतत आपल्या मनात रुंजी घालत असतात.
अशाच “मनातल्या कविता” सांगणार आहेत, त्यावर रसग्रहणात्मक लिहिणार आहेत डॉ. गौरी जोशी- कंसारा.
अल्प परिचय
डॉ. गौरी जोशी-कंसारा अमेरिकेतील, न्यू जर्सीमध्ये आयुर्वेद तज्ञ असून योग प्रशिक्षक आहेत. ह्या क्षेत्राचा त्यांचा पंधरा वर्षांहून अधिक अनुभव असून नाडीपरीक्षा आणि आयुर्वेदिक जीवन पद्धतीबद्दल तेथील लोकांमध्ये जागृती यावी यासाठी ह्या शास्त्राचा त्या प्रचार आणि प्रसार करत असतात.
त्या स्वतः ‘कथक‘ नृत्यांगना आहेत आणि त्यांनी आजवर अनेक विद्यार्थिनींना त्याचे शिक्षण दिलेले आहे. त्यांचे स्वतःचे ही अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर झालेले आहेत. त्यांना अभिनयाची आवड असून शाळा आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत.
अलिकडेच त्यांनी श्री. महेश दत्तानी लिखीत आणि दिग्दर्शित ‘द बिग फॅट सिटी’ नावाच्या झूम मीडियाद्वारे झालेल्या इंग्लिश नाटकात अभिनय केला आहे. ‘रक्तबीज’ या हिंदी नाटकाचे साभिनय वाचनही त्यांनी केले आहे. अनेक कार्यक्रमांच्या निवेदिका म्हणून त्यांनी सूत्रे सांभाळली आहेत. अनेक नृत्य स्पर्धा आणि सौंदर्य स्पर्धांचे त्यांनी परीक्षण केले आहे.
शालेय जीवनापासूनच अनेक वक्तृत्व स्पर्धा, नाट्य वाचन आणि नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. या स्पर्धांच्या तयारीच्या निमित्त्याने जी वाचनाची आवड निर्माण झाली त्यात त्यांना सर्वाधिक गोडी वाटली ती, कविता या साहित्यप्रकाराची.
डॉ गौरी या ‘मुक्तरंग ‘ नावाने कवितांचे फेसबुक पेज चालवतात. ‘ऋतुपर्ण’ मासिकात त्यांच्या कविता प्रसिध्द झाल्या आहेत.
आपल्या न्युजस्टोरीटुडे वेबपोर्टलवर त्यांचं “भावलेल्या शांता शेळके” हे रसग्रहण प्रसिद्ध झाले असून त्याला रसिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आपल्या विनंतीवरून त्या नियमितपणे “मनातल्या कविता” वर रसग्रहण करणार आहेत. रसग्रहणानंतर त्या स्वतःची कविताही सादर करणार आहेत.
उद्याचं रसग्रहण असणार आहे,
ग्रेसफुल ग्रेस !
तर स्वागत करू या, डॉ गौरी जोशी-कंसारा यांचं 💐
– टीम एनएसटी +91 9869484800