साताऱ्यात नुकत्याच झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनात कवयित्री सौ आशा दळवी यांनी “अस्तित्व” ही तर, कवी तथा चित्रकार रामदास खरे यांनी “स्कायलाईन” ही कविता सादर केली. या दोघांचे ही मनःपूर्वक अभिनंदन. वाचू या, या दोन्ही कविता.
— संपादक
1) “अस्तित्व”
वचन त्याने दिले
वनवास “तिच्या” प्राक्तनी होते
युगानुयुगे “अग्निदिव्य ” द्यावयाचे होते
तिला कुठे अस्तित्व होते |धृl …..२
इंद्राच्या चुकीची शिक्षा
“अहिल्या” भोगते
“पाषाणास” कधी ह्रद होते |धृ|
द्युतात हरो, जिंको कुणीही
सत्व “तिचे” पणास होते |धृ |
माहेरी हे धन “परक्याचे” होते
सासरी अस्तित्व तिचे गुलाम होते |धृ |
गर्भातच “श्वास” तिचे नामंजूर होते
“स्त्रीत्वाच्या” शृखलांनी जखडले होते |धृ|
तो फास घेतो,
“गळा” तिचा आवळतो
तो श्वास संपवतो जीव तिचा गुदमरतो
कोवळ्या कोंबांचे “ती” छत्र होते |धृ |
तो दिवा,”ती” वात होते
ती जळुन राख होते
नाव “मशहूर “त्याचे होते |धृ |
तावून साऱ्या दिव्यातून
फिनिक्स पक्षासम राखेतून ती पुन्हा झेपावते
“अस्तित्व” आपुले सिध्द करते……!!!!!
— रचना : आशा दळवी. दूधेबावी, सातारा

2) “स्कायलाईन”
वेगवेगळ्या प्रहारातील
त्या विराट महानगरीचे रूप
निरखतोय कधीचा मी
हडसनच्या नितळ काठावर
महासत्तेचा विशाल मेघ
डोईवरून जाताना
होते टॉवर्सची दमछाक.
वर्ल्ड ट्रेड सेंटरचा सुळका
न्याहाळताना ९/११ आठवणींची
भयाण लहर चमकून जाते सर्वांगात.
बुलस्ट्रीटचा वळू बेरक्या नजरेने
पारखत असतो मला, खिशाला !
बिल गेट्सच्या महासंगणकावर
दिसत असते वारंवार
उद्याच्या मायावी जगाचे रूप.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा अलिबाबा
गल्लीबोळात उंडारतोय
गरजवंतांना खिंडीत गाठून
कथा, कविता ते सेक्स
असं सर्वकाही देतोय रेडीमेड
अगदी फ्रॅक्शनमध्ये !
वॉरेन बफेची गोंडस छबी
भुरळ पाडत असते
गुंतवणुकीदारांवर, दलालांवर.
ब्रूकलिनच्या राक्षसी पुलावरून
धापा टाकताना रोज दर्शन घेतो
निरागस स्वातंत्र्य देवतेचे
तिच्यातील अचाट शक्तीचे.
म्युझियम मधली अब्स्ट्रॅक्ट चित्रे
अचानक फेर धरून नाचू लागतात
पोर्ट्रेटसच्या मुखावरचे भाव बदलतात
आणि गोंडस शिल्पांचे मादक हात
कवेत घेण्यासाठी पुढे सरसावतात.
मी थरारून पुन्हा हडसन काठी..
माझ्या पॅलेट मधले एकेक रंग
सफेद, काळा, तपकिरी
कॅनव्हासवर ओघळू लागतात
अनाकलनीय भाषेत बोलू लागतात !
मग.. न्यूयॉर्कची स्कायलाईन
हळूहळू धुरकट होत जाते
कसलीशी महाघोषणा होण्यापूर्वी
हडसन मध्ये विलीन होते.
— रचना : रामदास खरे. ठाणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
