Sunday, December 22, 2024
Homeकलाकवी दाम्पत्य सन्मानित

कवी दाम्पत्य सन्मानित

रायगड जिल्ह्यातील उरण येथील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात श्री नरेश पाटील व डॉ. सौ. अनुपमा पाटील यांचा असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत व मिस इंडिया डॉ. स्वरांजली गायकवाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या दाम्पत्याचे मनःपुर्वक अभिनंदन.
आज दोघांचीही एकेक कविता पुढे देत आहे
.
– संपादक

१. मैत्र जिवाचे
अंगणात मी बसले होते निवांत
पक्षी होते सुमधुर ती गाणी गात
आली चिमणी भुरकन एक उडून
खाऊ हातातला गेली की घेऊन

इवलेसे फुलपाखरू आले उडत उडत
बसले माझ्या खांद्यावर डोळे मिचकावत
हसून मी त्याच्याकडे पाहिले क्षणिक
मधु शोधण्या फुलांवर गेले ते बागेत

कावळे दादा आला करीत काव काव
मी म्हणाले तुम्हाला  काय हवं राव
म्हणतो कसा मला हवा मोठा बनपाव
घरट्यात भुकेने बाळे व्याकुळ अती राव

साळुंक्या आल्या दोन धावत धावत
म्हणाल्या देव का नाही आम्हा पावत
नाही आम्हाला आता उपाशी राहवत
ना इतरांची उपासमारीही  पाहवत

कोकिळा आली कुहू कुहू करीत
म्हणते मी आले का आणखी भरीत
जे जे देशील ते ते गोड मानून घेईन
सुमधुर गाणे आवडीचे ऐकवून जाईन

तेवढ्यात आलं एक कबूतर जवळ
पायाशी  त्याची उगीचच वळवळ
त्याची माझी दोस्ती फारच निखळ
दाणे टिपून गेले ते हसत खळखळ

पोपट आला करीत जप राम राम
लवकर मला दे म्हणे खूप आहे काम
 मिरची आण उद्या देऊन थोडे दाम
आवड माझी पेरुची पुरवी घनश्याम

झाडामध्ये लपला होता पक्षी भारद्वाज
पाहण्यासाठी मी त्याला दिला आवाज
ये ना बाहेर मानतात तुला शुभ सर्व
म्हणूनच काआहे तुला इतका गर्व

आकाशातून पहात होते शुभ्र बगळे
जोडावयाचे का नव्हते त्यांना हे नाते आगळे
मैत्रीचे हे गोड नाते त्यालाच कळते
उर्मी प्रेमाची ज्याच्या हृदयी सळसळते

  • — रचना : डॉ. सौ. अनुपमा नरेश पाटील. ठाणे.
  • २. अपात्र प्रेमी (रावण)

अशाच एका राज्याचा
मीही होतो राजकुमार
स्वयंवराच्या निमंत्रणाचा
झालो म्हणूनी भागीदार

प्रथम तिज पाहता
गात्र गात्र अधीरले
एकवटले सारे बल
धनु परी न उचलले

अहंकारातून झणी
भान जरी हरपले
अपमानित हृदय तरी
मनी चित्र बिंबले

विसर पडला असता
सहज कुणी बोचले
प्रीत तुझी रान वनी
दैन्य कसे भोगते

झालो मोहान्ध पुन्हा
हे न मनी उमगले
पतिव्रता आज ती
ना स्वयंवर कोठले

तपातून खडतर जरी
मिळवल्या महाशक्ती
शिवाकडून आशिवाकडे
उफाळून आल्या वृत्ती

कपट न कपट भासे
प्रीत जेव्हा स्पर्शते
बंधन न बंधन रुचे
लोभ जेव्हा ग्रासते

वाटले पाझरेल कधी
सोडवेना ती सती
ओलांडवेना तृण जरी
मोडवेना मना युती

शतकावरी केल्या जरी
याचना विनवण्या
प्रीत एकदाच फुले
आभाग्य असे सोसण्या

सम्पले सर्वकाही
जाळीयले स्वर्ण लंका
युगे युगे जलतो मी
आहे असा अपात्र प्रेमी

— रचना : नरेश पाटील. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on अंदमानची सफर : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७