Monday, December 22, 2025
Homeसाहित्यकवी वसंत बापट

कवी वसंत बापट

कवी वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे हे स्मरण….

वसंत बापट यांचे खरे नाव विश्वनाथ वामन बापट. पण त्यांचे साहित्यविश्वातले प्रसिद्ध नाव मात्र वसंत बापट कवी, ललीत गद्यलेखक. प्रवासवर्णनकार, स्वातंत्र्यशाहीर, वक्ता, प्राध्यापक म्हणून जनमनात त्यांची प्रतिमा आहे..

वसंत बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ साली कराड येथे झाला, आणि १७ सप्टेंबर २००२ साली पुणे येथे त्यांचे निधन झाले. एक तळपती तेजोमय काव्यजोत विझून गेली.

वसंत बापटांच्या आयुष्याची घडण आणि त्यांची कविता यांच्यात निकटचे नाते आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय अंदोलनाच्या काळात, समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी काव्य लेखन केले. जनजागरण हे त्यांच्या प्रारंभीच्या कवितेचे प्रयोजन होते. राष्ट्रीय गीते, स्फूर्तीगीते, पोवाडे,वगनाट्ये लिहीली. त्यामुळे त्यांच्या कवितेचे रुप प्रचारात्मक होते.

कबी वसंत बापट

पण तरीही बापट मूलत: प्रेमकवीच आहेत. प्रेमभावना आणि निसर्ग चित्रण यांचे सहचर्य बापटांच्या कवितेत दिसून येते. प्रेमभावनेच्या अविष्कारासाठी पार्श्वभूमी म्हणून बापटांनी निसर्ग जवळ केला आहे…
अशीच एक मनातली कविता अथवा ओठावरचं
गाणं, अगदी ह्रदयात वसलेलं म्हणजे…

अजुन त्या झुडपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते,
अजुनी आपुल्या आठवणींनी
शेवंती लजवंती होते..

तसे पहाया तुला मला ग
अजुन दवबिंदु थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव
अजुन ताठर चंपक झुरतो..

अजुन गुंगीमधे मोगरा
त्या तसल्या केसांच्या वासे
अजुन त्या पात्यात लव्हाळी
होतच असते अपुले हासे

अजुन फिक्कट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतांमधले गरळ झोकूनी
अजुन वारा बरळत आहे…

हे गाणं आठवणीतलं. वारंवार ऐकावं असं..
अतंत्य हळुवार आणि भावपूर्ण काव्य !
या काव्यात गतायुष्यातल्या प्रेमाच्या मधुर
सुखद आठवणी आहेत. त्या आठवताना कवीचं
मन अत्यंत कोमल झालेलं आहे. अगदी फुलासारखं नाजुक नितळ सुगंधी..

अजुन त्या झुडपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते..
इथे झुडुप याचा अर्थ चाकोरीत गुंतलेलं जीवन.
आणि त्या झुडपाच्या मागे प्रीतीच्या आठवणी दडल्यात आणि त्याकडे पाहून मनातली सदाफुलीही अशीच हळुच हसते…

या संपूर्ण कवितेत प्रीतीविषयक भावनांना
सदाफुली, शेवंती दवबिंदु, चंपक मोगरा लव्हाळी
यांचं रुप दिलं आहे…
तसे पहाया तुला मला ग
अजुन दवबिंदु थरथरतो…

ताठर चंपक झुरतो..
विसरायचंच असा निर्धार केलेल्या मनाला ताठर चंपकाची उपमा दिली आहे…पण उत्कट भावनांमुळे त्याचा ताठरपणा लवचिक होतो आणि अंतस्थ तो झुरत आहे..

प्रेमकाव्य उलगडतांना, या निसर्गातल्या कोमलतेचा त्यांनी रुपकात्मक आधार घेतला आहे…दवबिंदुंचं थरथरणं, झुरणारा चंपक या कवीच्या अस्तित्वाचाच भाग आहेत. भावनांना यांत सहज गुंतवले आहे… एकेकाळचे त्यांच्या प्रीतीचेही ते साक्षीदार अजुनही मनांत दडलेले आहेत…पुन्हा एकदा मीलनाची ओढ असणार्‍या कवीमनाला हे कुठेतरी आतून जाणवत आहे..

प्रेयसीच्या आठवणींनी थरथरणं, झुरणं हे व्यक्त करताना त्यांनी किती सुंदर निसर्ग चित्रच मनासमोर साकारलं आहे.
कवीने प्रांजळपणे सांगितलं आहे की पात्यांमधल्या लव्हाळ्याचं हंसणं, तिच्या केसात माळलेल्या मोगर्‍याचा सुगंध अजुनही मनात तसाच दरवळत आहे.
शेवटच्या कडव्यात कवी अधिक भावुक
आणि आशावादी आहे.
अजुन फिकट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतामधले गरळ झोकूनी
अजुन वारा बरळत आहे..

फिकट चंद्राखाली हे शब्द प्रीतीच्या अंधुक धूसर
पूर्णत्वासाठी आहे..अंत:र्मनात एक कोंडलेला वारा अजुनही आहे आणि तोच मनातलं हे मीलनाच्या आशेचं गरळ या माझ्या गीतांतून बरळत आहे…
यात गरळ, बरळत आहे हे कठोर शब्द संस्कारक्षम
मनावर चढवलेल्या मुखवट्यांना प्रवाहाविरुद्ध जाऊन फोडणार्‍या मानसिकतेसाठी वापरले आहेत.

बाकी शब्दांची कोमलता, आणि भावनांचा झुळझुळता काव्यरुपी झरा अत्यंत नादमयआणि लयबद्ध आहे..खरोखरच, मनावर हळुहळु पांघरत जाणारी, धुंद करणारी ही प्रेमाची काव्यरचना आहे..

राधिका भांडारकर

– लेखन : सौ. राधिका भांडारकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सुंदर शब्दांत रसग्रहण राधिका ताई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”
सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37