Friday, November 22, 2024
Homeलेखकशी होते राष्ट्रपती निवडणूक ?

कशी होते राष्ट्रपती निवडणूक ?

येत्या १८ जुलै रोजी होणारी भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक ही भारतात होणारी १६ वी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे.
श्री रामनाथ कोविंद हे भारताचे विद्यमान राष्ट्रपती आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५६(१) मधील तरतूदी नुसार भारताचे राष्ट्रपती पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदावर राहतात. राष्ट्रपती श्री
रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्यामुळे, नव्या राष्ट्रपतींची निवडणूक मतदान १८ जुलै २०२२ रोजी होत असून २१ जुलै २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे.

यशवंत सिन्हा

या निवडणुकीत श्री यशवंत सिन्हा यांची एकमताने यूपीएचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर एनडीए तर्फे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू आहे.

द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपतीपदाची निवडणूक अशी होते……

राष्ट्रपतीपदासाठी पात्रता
उमेदवार हा ३५ वर्षे वयाचा भारताचा नागरिक असावा. तो केंद्रात किंवा राज्यात कोणत्याही फायद्याच्या पदाचा (office of profit) वापर न केलेला असावा. त्याच्यासाठी ५० सदस्यांनी (खासदार, आमदार) सूचक, अनुमोदक करणे गरजेचं आहे.

 राष्ट्रपती पदासाठी उभे असणाऱ्या उमेदवारांना मतदान करणारे मतदार
या पदासाठी दोन्ही, राज्यसभा व लोकसभा सदस्य (खासदार) आणि सर्व राज्यांचे विधान सभेचे (विधान परिषदेचे नाही) आमदार मतदान करतात. प्रत्येक राज्यातील आमदाराचे मतमूल्य (Value of Vote) वेगळे असते.

★ सदस्यांचे मतमूल्य असे ठरते.
सदस्यांच्या मतांचे मूल्य राज्यघटनेच्या ५५(२) कलमानुसार ठरवले जाते.
सुरुवातीला आपण मतदान करणारे एकूण किती सदस्य असतात हे बघू या, म्हणजे मतांचे मूल्य समजायला सोप्प जाईल.
लोकसभेचे ५४३ आणि राज्यसभेचे २३३ अशी एकूण ७७६ खासदारांची संख्या आहे.
सर्व राज्यातील (पोंडेचरी, दिल्लीसह) आमदारांची संख्या ४१२० आहे.
खासदार + आमदार = एकूण मतदार
७७६ + ४१२० = ४८९६.

प्रथम आमदारांचे मतमूल्य जाणून घेऊ.
(आमदारांची लोकसंख्या × एक हजार ÷ राज्याची लोकसंख्या = एका आमदाराचे मतमूल्य)
उदा.महाराष्ट्राची लोकसंख्या ५,०४,१२,२३५ आहे.(१९७१ ची) व आमदारांची एकूण संख्या २८८ आहे. इथे २८८ X १००० = २८८००० या संख्येने एकूण लोकसंख्येला भागले असता १७५.०४२ हे उत्तर येते. म्हणून महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मताचे मूल्य १७५ आहे. म्हणजेच आमदार × मतमूल्य = राज्यनिहाय मतदान (२८८ × १७५= ५०४००) याचा अर्थ महाराष्ट्राचे मतदान ५०४०० एवढे आहे.

याच पद्धतीने प्रत्येक राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्य काढून राज्याचे एकूण मतदान ठरवले जाते.यात उत्तर प्रदेशच्या एका आमदाराचे मतमूल्य सगळ्यात जास्त म्हणजे २०८ आहे तर सिक्कीमच्या आमदाराचे सगळ्यात कमी म्हणजे ७ आहे.

आता आपण खासदारांचे मतमूल्य कसे काढतात ते बघूया. (सर्व आमदारांचे मतमूल्य ÷ सर्व खासदार = १ खासदाराचे मतमूल्य)
भारतातील सर्व आमदारांचे मतमूल्य ५४९४७४ आहे.
५४९४७४ ÷ ७७६ = ७०८ म्हणजेच एका खासदाराचे मतमूल्य ७०८ इतके आहे. आता खासदारांच्या संख्येला मतमूल्याने गुणले असता एकूण मतदान मिळेल. ७७६ × ७०८ = ५४९४०८
(आमदार मतमूल्य + खासदार मतमूल्य = एकूण मतदान) ५४९४७४ + ५४९४०८ = १०९८८८२

ज्या उमेदवाराला यातील ५०% मते पडतील तो राष्ट्रपती म्हणून घोषित केला जातो. ही निवडणूक पदवीधर आमदार निवडणुकीसारखी असते. जर उमेदवाराची संख्या जास्त असेल व कोणालाच ५०% पेक्षा जास्त मते मिळाली नसतील तर सगळ्यात कमी मते मिळालेल्या उमेदवाराची मते दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवाराला वर्ग केली जातात. तरी आकडा गाठता आला नसेल तर खालून क्रमाक्रमाने उमेदवार बाद करत राष्ट्रपती घोषित करता येतो.

विजय पवार

– लेखन:  विजय पवार
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी. ह. मु.- अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments