Wednesday, September 17, 2025
Homeलेखकस्तुरबा

कस्तुरबा

आज महाशिवरात्र. कस्तुरबा गांधींची पुण्यतिथी. त्यानिमित्त “बां” च्या स्मृती जागवतांना . . .

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी उर्फ “बा”.

स्वाभिमानी, खंबीर, संयमी, सहनशील आणि समंजस अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या कस्तुरबांची साथ महात्मा गांधींना पत्नी म्हणून ६२ वर्षे लाभली. सहस्रकातील महामानव म्हणून ज्यांचा संपूर्ण जगाने गौरव केला त्या पुरुषाची सहधर्मचारिणी म्हणून कस्तुरबांनी बापूजींच्या जीवनात अनेक भूमिका निभावल्या. कधी पत्नी म्हणून तर कधी सखी म्हणून. कधी सेविका म्हणून तर कधी कडवा विरोधक म्हणूनही आणि अनेक प्रसंगी गांधीजींना त्या मार्गदर्शक गुरु वाटल्या.

गांधीजींचा संदेश मग तो स्वातंत्र्य लढ्यासाठीचा असो किंवा महिला सक्षमीकरणाचा वा सत्य अहिंसेचा असो, देशभरातील स्त्रियांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात कस्तुरबांच्या मार्फत पोहोचला. अनेकवेळा बापूजींना त्यांच्या कर्तव्याची जाणीवही बां नी करून दिली. आपला पती स्वातंत्र्याच्या ध्येयाने पछाडलेला आहे याची पूर्ण जाणीव बां ना होती.

बापूजींच्या अनेक उपोषणात बां नी मनोधैर्य कधी ढळू दिले नाही. त्या बापूजींबरोबर सूत कातीत. विदेशी वस्त्रांची होळी, सूत कताईचे आवाहन, खादीचे महत्व, मिठाच्या सत्याग्रहाचा दांडी मार्च, तसेच दारूबंदीसाठी महिलांचा मोर्चा या आणि अशा अनेक कार्यक्रमांतून बांचा सक्रिय सहभाग होता.

बां च्या सामर्थ्याची बापूजींना पूर्ण जाणीव होती. गांधीजींनी कस्तुरबांबद्दल म्हटले आहे की “निष्कपट श्रद्धा, निस्वार्थ भक्ती व सेवा याचा आदर्श मला ‘बां’ मध्ये दिसला. अहिंसाशास्त्रातील ‘बा‘ माझी गुरु बनली. मला जन्मोजन्मी सहचारिणीची निवड करावी लागली, तर मी कस्तुरलाच पसंत करेन” अशा या महिला स्वातंत्र्य सेनानीला १९४२ च्या “भारत छोडो” आंदोलनात हौतात्म्य आले.

भारत छोडो आंदोलनाची घोषणा झाली आणि महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई (बापूजींचे स्वीय सहायक) यांना अटक झाली. या तिघांना कारागृहात ठेवण्यात आले. ठिकाण होते पुणे येथील प्रसिद्ध “आगाखान पॅलेस.” कस्तुरबा सतत आजारी असत. ब्रिटिश डॉ. गिल्डर आणि बापुजींच्या डॉक्टर आणि सहकारी डॉ. सुशीला नैयर बां वर उपचार करत होते. प्रभावती बहन बां ची सतत सेवा करत होत्या. प्रसंगी बापूजी स्वतः बां चे कपडे धूवून स्वच्छ करत. त्याच अवस्थेत बंदिवासात असतांना २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबांची प्राणज्योत मालवली. तो दिवस महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता.

गांधीजींना अश्रू आवरेनात. ६२ वर्षांची जीवनसाथ तुटली आणि ते एकाकी झाले. कस्तुरबांना बापूंनी कातलेल्या सुताची लाल किनारीची साडी नेसवली होती, गळ्यात तुळशीची माळ आणि बापूंनी कातलेल्या सुताचा हार घातला होता. ब्रिटिश सरकारने विचारणा केली होती कि बां च्या अंतिम संस्कारांबद्दल बापूंची काय इच्छा आहे. बापूंचा पर्याय होता की, “बां” चे पार्थिव माझ्या मुलांकडे आणि नातेवाईकांकडे सोपवले जावे.” याचा अर्थ असा होता की बां चे अंतिम संस्कार सर्व जनतेच्या समोर केले जावे. सरकारचे उत्तर आले
“जनतेच्या समोर बां ची अंतिम दहन क्रिया करायला सरकार परवानगी देऊ शकत नाही, परंतु मोजकेच मित्र मंडळी आणि नातेवाईक मिळून शंभरच्या आसपास संख्येने लोक बंदिवासाजवळ येऊन अंत्य संस्कारात सम्मिलीत होऊ शकतात.

आगाखान प्रासादाच्या एका कोपऱ्यातच कस्तुरबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बापूजींनी स्वतःच्या हातानी शेण माती लिंपून कस्तुरबांची समाधी आपल्या मानस पुत्राच्या महादेवभाई देसाईंच्या समाधी शेजारी बांधली आणि लहान लहान शंख शिंपल्यानी “हे राम” अशी अक्षरे लिहिली. आगाखान प्रसादात कारावासात असेपर्यंत बापूजी दररोज सकाळ संध्याकाळ समाधी दर्शनाला व प्रार्थनेला जात असत. कारण याच ठिकाणी त्यांचे दोन जिवलग आप्त चिर विश्रांती घेत होते.

१९४४ सालच्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधींचा ७५ वा वाढदिवस होता तेंव्हा ते आगाखान प्रसादात कारावासात होते. देशभरातील नेत्यांनी आणि जनतेने वाढदिवसाची भेट म्हणून बापूजींना राष्ट्रीय कार्यासाठी मानधनाची जी थैली दिली त्या निधीतून गांधीजींनी १९४५ साली कस्तुरबा ट्रस्ट ची स्थापना केली. कस्तुरबांच्या मृत्यू नंतर गांधीजींनी म्हटले होते की ” आगाखान प्रासादाची ही वास्तू भविष्यात एक तीर्थस्थळ बनेल आणि येथून महिलांच्या स्वावलंबिकारणाचे, सबलीकरणाचे कार्य होईल.”

या कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे मुख्यालय मध्यप्रदेशात इंदौर येथे आहे. “कस्तुरबाग्राम “ या नावाने हा परिसर ओळखला जातो. या ट्रस्टला महान अध्यक्षांची परंपरा लाभली. महात्मा गांधींच्या पश्चात सरदार वल्लभभाई पटेल, ठक्करबाप्पा, दादासाहेब मावळंकर, लेडी प्रेमलीला ठाकरसी, श्रीमती लक्ष्मी मेनन, मणिबेन पटेल, डॉ. सुशीला नायर अशा दिग्गजांनी आपले योगदान दिले आहे.

ट्रस्टचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरणाचे गांधीजींनी पाहीलेले स्वप्न आहे. स्त्री शिक्षण, बालवाडी, शाळा, महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्र, स्त्रियांचे आरोग्य, इस्पितळ, गोशाळा, पशुचिकित्सालय, खादी उत्पादन, बँक, पोस्ट ऑफिस, विद्युत केंद्र, अशा सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असे हे कस्तुरबाग्राम आहे.

आसाम पासून गुजराथ पर्यंत आणि कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत कस्तुरबा ट्रस्टच्या एकूण २३ राज्यातील ११७ शाखांमधील ४५० हुन अधिक केंद्रांमार्फत लाखॊ लोकांपर्यंत ट्रस्ट पोचला आहे. हा प्रचंड पसारा सांभाळून सर्व उपक्रम अतिशय कौशल्यपूर्ण रितीने आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सुरळीत राबवण्यात ट्रस्टच्या सेविकांची खूप मोठी भूमिका आहे. सेविका म्हणजे खरी पूंजी असून ट्रस्टचा कणाच आहेत. कस्तुरबा ट्रस्ट हे बां चे जिवंत स्मारक आहे. १९७२ सालापासून तत्कालीन अध्यक्षा श्रीमती लक्ष्मी मेनन यांच्या सूचनेवरून राष्ट्रमातेचा हा स्मृतिदिन कस्तुरबा ट्रस्टच्या सर्व शाखा आणि केंद्रातून “मातृदिन” म्हणून महाशिवरात्रीला साजरा केला जातो. मातेचा गौरव आणि महिला सबलीकरणाचे विविध उपक्रम व योजना या निमित्ताने राबवल्या जातात.

राष्ट्रमातेच्या स्मृतीला ७७ व्या स्मृति दिनानिमित्त त्रिवार वंदन. !

आशा कुलकर्णी

– लेखन : आशा कुलकर्णी.
(कार्यकर्ती – कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं