Friday, November 22, 2024
Homeसाहित्यकहत कबीरा - कुंजविहारी विशेषांक

कहत कबीरा – कुंजविहारी विशेषांक

सोलापूर येथील आशय परिवार गेल्या दहा वर्षांपासून ग्रंथदिन विशेषांक प्रकाशित करीत आहे. विविध विषयांना वाहिलेला सर्वांग सुंदर विशेषांक आतापर्यंत ‘आशय’ द्वारे प्रकाशित झालेले आहेत. त्याची रसिक वाचकांनी वाहव्वादेखील केलेली आहे.

सोलापूर ही साहित्यिकांची खाण आहे. जुन्या पिढीत कुंजविहारी, पं. मा. कामतकर, रा. ना. पवार, कवी संजीव, काही काळ वास्तव्यास असलेले डॉ. वि. म. कुलकर्णी आदी अनेक कवी लेखक होऊन गेले आहेत. त्यांनी आपापल्या परीने साहित्याची सेवा केलेली आहे. इतरही अनेक साहित्यिक आहेत परंतु त्यांची नावे विस्तारभयास्तव नमूद करीत नाही.

सातत्याने ‘आशय’ परिवार ग्रंथदिनी अंक प्रसिद्ध करीत असतो परंतु गेल्या वर्षी कोविड महामारीच्या प्रकोपामुळे ग्रंथदिन विशेषांकाच्या प्रकाशनात खंड पडल्याचे संपादक नीतीन वैद्य यांनी स्पष्ट केले आहे. ‘आशय’ ने या वर्षी कविवर्य कुंजविहारी अर्थात हरिहर गुरुनाथ सलगरकर यांच्या संत कवी कबीर यांच्या साहित्याच्या अनुवादाचे संकलन असलेला कहत कबीरा हा खास विशेषांक प्रकाशित केला आहे.

संपादक नीतीन वैद्य यांनी आपले सहकारी जयंत राळेरासकर आणि पुरुषोत्तम नगरकर यांच्या साहाय्याने हा अंक तयार केला आहे. गेली अनेक वर्षे आशय हा दिवाळी अंक आशय परिवाराने प्रकाशित केला आहे. ‘आशय’ च्या अंकाची वाचक आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा कुंजविहारी विशेषांकात कवी कुंजविहारांच्या साहित्याचा प्रवास विशद केला आहे. कुंजविहारी हे सोलापूरातील प्रसिद्ध कवी दत्ता हलसगीकर यांचे मामा. साहित्याचा वारसा दत्ताजींनी उत्तम प्रकारे सांभाळला आहे.

या कहत कबीरा विशेषांकामुळे कुंजविहारींचे मोठेपणा नव्या पिढीतील युवकांबरोबर मधल्या पिढीतील लोकांनाही माहीत होईल. एरवी कुंजविहारी म्हणजे फक्त ‘भेटेन नऊ महिन्यांनी’ या एकाच कवितेचे कवी इतकेच माहीत असते. ती कविता गात गात सोलापूरचे आणि इतरही अनेक हुतात्मे हसत हसत फासावर गेले आणि त्यांनी आपल्या आईचे सांत्वन केले. ही माहिती या विशेषांकामुळे मिळते.

या विशेषाकांमुळे कुंजविहारी यांनी कितीतरी कविता लिहिल्या आहेत आणि त्याचे अनेक संग्रहही प्रकाशित आहेत. ते एक स्वातंत्र्यसेनानी होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कुंजविहारी तुरुंगातही गेले. तेथे त्यांना कबीर साहित्याचा परिचय झाला. त्यांच्या हयातीत कवितांची तीन पुस्तके आणि ओनामा मंदिरातर्फे त्यांनीच प्रकाशित केलेल्या चार पुस्तिका असे संग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी राज्यश्री वाचनालये सुरू केली तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांचे कार्य मोठे आहे.

उद्याचा देव कसा असावा ही कविता त्यांनी औरंगाबाद येथे १९५७ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात वाचली होती. २२ कडव्यांची ही कविता आहे.

नवीन राजवट, नवीन नाणे, पंचांगही ते नवे
आम्ही निधर्मी, देवमहाशय हवेत आम्हा नवे
असे ते या कवितेत म्हणतात.

देव असावा विश्वकुटुंबी ही संकल्पना ते मांडतात.

असेल शेती करील मशागत पिकवील तो जोंधळा
गाईगुरांचा आणि मुलांचा असेल त्याला लळा
अशा सर्वसमावेशक आणि सर्वसामान्यांच्या देवाची ते कल्पना करतात.

१९३७ व ३८ साली कुंजविहारींच्या पुढाकाराने जिल्हा साहित्य संमेलने व १९४१ साली झालेले अखिल भारतीय साहित्य संमेलन ही त्यांचीच कामगिरी पुढे या साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीचे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेत रुपांतर झाले ही माहिती या विशेषांकात आहे. ती नव्या पिढीला कुंजविहारी कळण्यास अधिक उपयुक्त आहे. गीत गुंजारव हा त्यांच्या ५०  कवितांचा संग्रह १९४५ साली कुंजविहारींच्या पन्नासाव्या वाढदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध झाला. १९७२ साली शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित केला होता.

कवी कबीराचे भक्तच बनले. परंतु ते डोळस. कबीराच्या काव्याचा कवीने केलेला भावानुवाद आहे. तो शब्दशः भाषांतराचा प्रकार नाही. त्यात कबीराच्या तत्त्वज्ञानाचे दर्शन होते, असे या पुस्तिकेत नमूद करण्यात आले आहे.

जसाच्या तसा दोहा या काव्यप्रकारातील तो अनुवाद नसून सर्वसामान्य लोकांना कबीर समजेल अशा भाषेत ते लिहितात. कुंजविहारींच्या साहित्यावर कन्नड कवी द. रा. बेंद्रे यांचाही प्रभाव होता. कबीराचाही होता. निशिकांत ठकार सरांनी विस्तृत लेखात कुंजविहारींच्या साहित्याचे गुणविशेष वर्णन केले आहेत. कुंजविहारी हे निस्पृह होते. साहित्य संमेलनानंतर ते कार्यकारिणीतून बाहेर निघाले तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही त्यांनी कधी सरकारी लाभ मिळवला नाही. पं. जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे आल्यावर कुंजविहारी का शोलापूर असे सोलापूरचे वर्णन केले होते, असा उल्लेख या पुस्तकात आहे, यावरूनच कवीचे महत्त्व विशद होते.

कहत कबीरा मधील भावानुवादाचे काही नमुने पाहा.
नाही कोणी घडविला, अनादिचा देवराय
नाही पूजा नाही पाट, वंदिती ना कोणी पाय
घडविला देव फुटे, अवतार गेले लया
धर्मवेड्या भाविकांनी किती मांडल्या लढाया
देवावरी प्रीत तया, कळू लागले खरे खोटे
अनादिचे लेणे हाती येताक्षणी सुख भेटे

खोट्या साधुवर ते कोरडे ओढतात अर्थात ते कबिराचेच शब्द आहेत फक्त कुंजविहारी आपल्या भावार्थातून ते प्रकट करतात.

संसाराचा केला त्याग, नामवंत सादू झाला
वाढविल्या दाढीमिशा, अहंभाव नाही गेला
नाही पत्नी नाही पुत्र, मेळविली शिष्यमांदी
जरी मुखी ब्रह्मज्ञान, तरला ना मायानदी
मन होता मायातीत, मंत्रमय बने वाणी
विरक्त वा कुटुंबी तो, विरळा तो साधू बनी
साधुसंत साधकांना, पुसू नये वर्गयाती
गुणातीत देव एक, एकभावे आराधिती
धर्मपंथ संप्रदाय न ते हिंदू – मुसलमान
देवासवे जडे नाते, नाही कोणी थोर सान
देव भक्त दोन्ही एक, दोन हात एक टाळी
जागवोनी भक्तिभाव भेदबुद्धी खांडोळिली

अशा अनेक कबीर वचनातून कबिराने समाजातील अनिष्ट रुढी परंपरा व प्रथांवर प्रहार केले आहेत, त्याची प्रचिती या अनुवादातून येते.

कवी कुंजविहारी यांच्यावर रवींद्रनाथ टागोरांचा तसेच कॉ. झाबवाला यांच्या साहित्याचा प्रभाव आहे. परंतु दोन्हींच्या प्रभाव त्यांच्या काव्यावर नाही. त्यांची स्वतंत्र शैली आहे. मुखपृष्ठानंतरच्या पानावर कुंजविहारींचा फोटो त्यांचा परिचय तसेच मलपृष्ठाच्य आतील बाजूस त्यांच्या प्रकाशित पुस्तकांची छायाचित्रे आहेत. सोलापूर समाचारने १८ डिसेंबर, १८४७  रोजी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या सत्कार अंकाचाही फोटो आहे. कुंजविहारींनी अनेक कन्नड कवितांचे भावानुवाद केले तसेच मलपृष्ठावरील चिरंजीव होवो जगी लोकशाही ही प्रसिद्ध कविता कुंजविहारींची आहे, ही अमूल्य माहिती येथे मिळते.

कवी कुंजविहारी यांनी सोलापूर समाचार या बाबुराव जक्कल यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रात दीड वर्षे कहत कबीरा हे सदर सुरू केले. त्यातील निवडक भावानुवाद या विशेषांकात आहेत. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षात कुंजविहारी यांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली आहे. कुंजविहारी यांचे साहित्य संग्रहित करण्यासाठी संपादकांनी अतोनात कष्ट घेतल्याचे जाणवते. कुंजविहारींना अभिवादन.

कहत कबीरा
– लेखन : प्रकाश क्षीरसागर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments