Monday, July 14, 2025
Homeबातम्याकांदळवन : संरक्षण आवश्यक

कांदळवन : संरक्षण आवश्यक

नवी मुंबईतील उलवे येथे बालाजी मंदिरासाठी भूखंडाचे वाटप सीआरझेड १ नियमांचे उल्लंघन असल्याच्या पर्यावरणवाद्यांच्या आरोपाची पुष्टी करत, कांदळवन कक्षाने हे दाखवून दिले आहे की, पाणथळ क्षेत्रावर भराव घालून या भूखंडाला तयार करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी मंदिराला दिलेली सीआरझेड मंजूरी रद्द करण्याची आणि सदर प्रोजेक्टसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले.

सिडकोने पाणथळ क्षेत्र आणि कांदळवन प्रभागापैकी काही भूभाग आधी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या (एमटीएचएल) कास्टिंग यार्डसाठी मंजूर केला होता. आंतरभरती पाणथळ क्षेत्राला पुनर्स्थापित करण्याऐवजी भराव घातलेल्या भूखंडाच्या भागाला तिरुमला तिरुपती देवस्थानमला (टीटीडी) देण्यात आले, असे केंद्र आणि राज्य शासनाला केलेल्या तक्रारींमध्ये नॅटकनेक्ट फाउंडेशनने नमुद केले आहे.

शासनाने स्थळाच्या पाहणीचे आदेश दिल्यानंतर कांदळवन कक्ष-नवी मुंबईच्या टीमने नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांच्यासह मंदिर परिसराला भेट दिली. परिक्षण टीमने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर्स (एमआरएसएसी) मार्फत तयार करण्यात आलेल्या सॅटेलाइट नकाशांसह स्थळाची तुलना केली, असे वनपाल बापू गाडदे यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. मंदिराचा भूभाग हा मूळत: पाणथळ भाग असून त्यावर भराव घातला गेल्याची त्यांनी पुष्टी केली आहे.

भूभागाच्या ४०-४५ मीटर परिसरामध्ये टीमला कांदळवने सापडली. कांदळवने आणि पाणथळ क्षेत्र अजूनही सिडकोच्या नियंत्रणामध्ये असल्याने, सिडकोने कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे परिक्षण अहवालात नमुद करण्यात आले आहे.

सिडकोने मंदिरासाठी मंजूर केलेला १० एकरांचा भूभाग सीआरझेड १ क्षेत्र असल्याचा पर्यावरणवाद्यांनी आरोप केला आहे.
सागरशक्ती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले, बालाजी मंदिराचे सदर क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तेथे कोणतेही बांधकाम होता कामा नये. कास्टिंग यार्डचे काम एकदा पूर्ण झाले की पाणथळ क्षेत्र आणि कांदळवनांचे व्यावसायिकीकरण करण्याऐवजी त्यांना रिस्टोर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरणवाद्यांचा आक्षेप असून देखील ७ जून रोजी मंदिर प्रकल्पाचे भूमीपूजन केले होते. शिंदे यांनी प्रोजेक्टला पर्यावरण मंजूरी दिल्याचे जाहिर देखील केले होते. बी. एन. कुमार आणि श्री. पवार म्हणाले, त्यांना मंदिराविषयी कोणताही आक्षेप नाही. परंतु मंदिरासाठी अशाप्रकारच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राऐवजी दुसरी जागा द्यावी.

स्थानिक मच्छिमार समाज खाडीमध्ये प्रवेश करण्यासाठी या क्षेत्राचा उपयोग करत असे, पण यावर एल ऍंड टीने बंदी आणली. गेल्या चार ते पाच वर्षांपासून येथे कास्टिंग यार्ड उभारले गेले आहे. कास्टिंग यार्डचे काम पूर्ण झाले असल्याने मच्छिमार समुदायाला हा भूभाग परत मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु धक्कादायकपणे हा भूभाग बालाजी मंदिरासाठी देण्यात आला, असे पवार यांनी सांगितले. ते पारंपारिक लघु मच्छिमार कामगार युनियनच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष देखील आहेत.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments