सुमारे दीडशे वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात मालेगाव हे छोटेसे शहर होते. पाच कंदील, मामलेदार गल्ली, संगमेश्वरच्या काही भागात मराठी वाचक विखुरलेला होता.
त्यावेळी गावातून झालर लावलेल्या घोडा टांग्यातून महिला प्रवास करत. इंग्रजांच्या काळात शहरातील नागरिकांसाठी १८६४ मध्ये काकाणीनगर वाचनालयाची स्थापना झाली.
१९६४ मध्ये काकाणी नगर वाचनालयाची शताब्दी साजरी करण्यात आली. तोपर्यंत अष्टकोनी बुरूज असलेल्या इमारतीत वाचनालय होते.
शंभर वर्षांत वाचनालयात केवळ ३ हजार विविध विषयांवरील ग्रंथ होते. आज जवळपास ६५ हजार ग्रंथ वाचनालयात वाचकांसाठी उपलब्ध असून, सुमारे ७०० सभासद आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून काकाणी नगर वाचनालयाची ओळख आहे. गेल्या २० वर्षांत दोन टप्प्यात वाचनालय बांधण्यात आले. १९६४ नंतर डॉ. नवलराय शहा यांनी अध्यक्षपदाची तर दत्ता गवांदे यांनी सचिवपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या काळात वाचनालयात ग्रंथ संपदा वाढली. परिसरातील ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी डॉ. शहा व गवांदे यांनी लक्ष दिले. त्यांनी चार दशके वाचनालयाची जबाबदारी सांभाळली.
आजची भव्य इमारत दोघांच्या प्रयत्नातूनच टप्प्याटप्प्याने साकारण्यात आली. त्यातून राज्यातील तालुका पातळीवरील पहिल्या मालेगाव तालुका ग्रंथालय संघाची स्थापना करण्यात आली.
नवीन वाचक वाढले पाहिजेत या विचारातून डॉ. नवलराय शहा व दत्ता गवांदे यांनी तालुक्यात २५ नवीन वाचनालये सुरू केली. ग्रंथालय चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले. जिल्हा, विभाग व राज्य ग्रंथालय संघाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले.
मालेगावी काकाणी वाचनालयात तीनवेळा जिल्हा पातळीवरील अधिवेशने झाली. दोनवेळा राज्य पातळीवरील अधिवेशने घेणारे हे राज्यातील एकमेव वाचनालय आहे. ‘ग्रंथमित्र सेवक पुरस्कार’ दिवंगत राजेंद्र सोनार यांना मिळाला होता. २००४-२००५ मध्ये वाचनालयाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ मिळाला आहे
काकाणीनगर वाचनालय हे मालेगावचे भूषण आहे.

– लेखन : समीना शफीक शेख
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800