Home कला “काजवा महोत्सव”

“काजवा महोत्सव”

1

अनेक दिवसांपासून एखादं दुर्मिळ छायाचित्र टिपण्याच्या शोधात असताना, मी पावसाची वाट पाहत होतो. भंडारदऱ्याच्या काजवा महोत्सवाला जायचं होतंच. निसर्गप्रेमी मित्रांच्या सोबत जाण्याचा योग नुकताच जुळून आला आणि मग काय, काजव्यांच्या दुर्मिळ छायाचित्रणाची संधी मिळाली !

रविवार, काजव्यांच्या शोधात… रात्रीच्या गडद अंधारात उमललेली “लक्ष-लक्ष प्रकाशफुले भुतखेल परिसरात पाहून मन भारावून गेलं.

पण हे सर्व अनुभवताना काजव्यांना काहीसा त्रास सहन करावा लागला. मोबाईलच्या झगमगाटी लाईट्समुळे अनेकांनी त्यांना त्रास दिला. काही क्षण तर मोबाईल प्रेमी आणि काजवे यांच्यात जणू स्पर्धाच सुरू होती – पण शेवटी निसर्गच विजयी झाला.

लक्ष-लक्ष काजवे… नभोमंडळातील तारका दळं जणू पृथ्वीच्या भेटीला आली होती !

सर्व बाजूंनी पसरलेल्या गडद अंधारात, अग्निशिखेसारखा झगमगणारा काजव्यांचा लयबद्ध चमकाट सुरू होता.
आपण निशब्द… कल्पना करा… काय अद्भुत देखावा होता तो !

दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा, या काळात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा- घाटघर परिसरातील वृक्षराजींवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते.

शिखरस्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडं लक्षावधी काजव्यांनी झगमगून जातात.

हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर – अशा काही विशिष्ट झाडांवरच काजव्यांचा काही दिवसांचा ‘बसेरा’ असतो.
ज्या झाडांवर हा ‘बसेरा’ असतो, ती झाडं जणू ख्रिसमस ट्रीसारखी भासतात. काजव्यांची लुकलुकती उघडझाप आपल्या डोळ्यांना मंत्रमुग्ध करते.

या लुकलुकत्या काजव्यांचे छायाचित्रण मात्र अतिशय कठीण !
प्रखर वाहन दिव्यांचा प्रकाश, सततची हालचाल, आणि जंगलातील अंधार हे सगळं आव्हानात्मक होतं.

तरीही घनदाट जंगलात दीर्घ वास्तव्य करून, काजव्यांचा प्रकाश स्मृतिपटलावर आणि कॅमेऱ्यात टिपण्याची अनुभूती अतिशय मनोहारी होती.

आपल्यालाही हा आनंद अनुभवता यावा, यासाठीच ही धडपड….

विजय होकर्णे

— लेखन, छायाचित्रण : विजय होकर्णे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version