दरवर्षी,
जन्माष्टमी साजरी करतांना,
तुझ्या बाल लीलात आम्ही रमतो,
दही हंडी फोडतांनाही,
तुलाच सारखे आठवतो,
पण तरी, तू दिसत नाहीस,
आजूबाजूला कधी सुध्दा….
कधी रे येशील तू कान्हा ?
मोरपिसाच्या, मऊ स्पर्शात
आम्हाला तू भासतोस,
बासरीच्या सुरेल सुरांत,
तूच तर गुंगवतोस….
पण तरी दिसत नाहीस तू
आजूबाजूला कधी सुध्दा…..
कधी रे येशील तू ?
राधा नावा पाठोपाठही
नेहमी तूच येतोस,
यशोदाच्या कुशीतही
सदा तूच असतोस….
पण तरी दिसत नाहीस तू
आजूबाजूला कधी सुध्दा…….
कधी रे येशील तू ?
इथल्या द्रौपदी हाका मारतात,
पण त्यांची अब्रू वाचवण्यास तू येतच नाहीस,
इथले अर्जुन, भांबावून शस्त्र टाकतात,
पण त्यांना मार्ग तू दाखवतच नाहीस….
नको …तुझी आता ती सुरेल बासरी,
नको …राधासंगची तुझी मस्करी,
नको ….ती बाल सुलभ खोडी,
नको….तुझी ती दही हंडी…….
आता फक्त हवा .. तुझा वेगळा अवतार !
तुझा शंखनाद आणि सुदर्शन चक्राचा वापर !
इथल्या कित्येक शिशुपालांचे,
शंभर अपराध कधीच भरले आहेत,
पण तरी दिसत नाहीस तू
आजूबाजूला कधी सुध्दा…….
कधी रे येशील तू कान्हा ?
— रचना : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
👌👌 अप्रतिम कविता 👌👌