आज जागतिक कामगार दिन आहे. या निमित्ताने जाणून घेऊ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कामगार कल्याणातील योगदान.
या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते , “गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल” एखाद्या गोष्टीसाठी बंड करण्याची वेळ तेव्हा येते जेव्हा त्याला गुलामगिरीची वागणूक मिळत असते, ज्या ठिकाणी आपण काम करतो त्याठिकाणी त्याचा मानसिक व शारीरिक छळ होत असतो, पिळवणूक होत असेल आणि ते जेव्हा सहन करणे असह्य होते तेव्हा तो त्याविरुद्ध बंड करून उठतो . तसेच जागतिक ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणाऱ्या मानवाच्या पिळवणुकीचा, छळाचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी, भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक अविष्कार या दिवसात होऊ लागला आणि हे थांबविण्यासाठी व कामगारांचे हक्क, अधिकार अबाधित राहण्यासाठी जी चळवळ झाली तो १ मे हा दिवस सर्व कामगार चळवळीची परंपरा झाली. म्हणून १ मे हा दिवस “जागतिक कामगार दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. १९३६ च्या ऑगस्ट मध्ये डॉ.बाबासाहेबांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा लढा सुरु असतानाच दिनांक २० जुलै १९४२ रोजी व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री म्हणून त्यांची झाली आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूरमंत्री होऊन त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त झाले.
बाबासाहेबांनी मिळालेल्या अधिकारांचा वापर करताना कामगारांच्या १२ तासाचे ८ तास काम करण्याचे महान कार्य केले. त्याचबरोबर जेवणाची सुट्टी, रजा, आरोग्याची काळजी व अन्य सोयीसुविधा देण्यास मालकांना भाग पाडले. शेतमजूरांनाही किमान वेतन मिळावे व त्यासाठी कामाचे तास सुनिश्चित करावेत असा शेतमजूरांना न्याय देणारे पहिले न्यायिक विचार या देशात मांडणारे विधाते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होत. जर शासनाने त्यावेळी त्याबाबतीत शेतमजूरांना किमान वेतन देण्याचा निर्णय कायम ठेवला असता, तर या देशातील आजची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले नसते. अशी वेळ शेतकऱ्यांवर आली नसती. त्यांची कुटुंबे उध्वस्थ झाली नसती. यावरून लक्षात येते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे किती कुशल व कुशाग्र कामगार नेते होते.
१२ व १३ फेब्रुवारी १९३६ साली मनमाड येथे रेल्वे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणाले होते, “भांडवलशाही आणि ब्राम्हणशाही हेच दोन कामगारांचे मुख्य शत्रू आहेत. कारण माझ्यामते समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाचा अभाव म्हणजे भांडवलशाही आणि ब्राम्हणशाही होय. याना देशातील सामाजिक, नागरिक हक्क नाकारले आहेत कामगाराच्या कामाच्या सनदी, कामातील बढतीच्या संधी नाकारल्या आहेत. आपल्या फायद्यासाठी हे लोक कामगारांचे सामूहिक शोषण करतात, दमण करतात आणि गुलामासारखे वागवतात . त्यांच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवतात. या वास्तव विचारांची पेरणी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच केली.
देशाची आजची परिस्थिती पाहता जे बदल होताना दिसतात त्यावरून लक्षात येते की, बाबासाहेबांची दृष्टी किती दूरगामी होती.
स्त्री-पुरुष या नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते एकमेकास पूरक आहेत आणि यामध्ये समानता असणे गरजेचे आहे. या देशात पुरुषांच्या बरोबरीने काम करणारी स्त्री सर्व क्षेत्रात आज दिसते.ती सर्वगुणसंपन्न आहे. ती तिच्या युक्तीने व सामर्थ्याने सर्व क्षेत्र व्यापले असूनही आजही ती सर्व हक्कापासून कोसो दूर आहे हे बाबासाहेबांनी जाणले व हि स्त्री शक्तीसुद्धा या देशाच्या परिवर्तनाचा हिस्सा बनली पाहिजे, ती हि समाजाच्या मुख्य प्रवाहात आली पाहिजे. , तिला केंद्रस्थानी मानून अश्या स्त्री स्वातंत्र्याचा आणि स्त्री मुक्तीचा विचार फक्त डॉ. बाबासाहेबांनीच हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून या देशात व्यापक केला. हे बिल विधेयक रूपाने संसदेत पास व्हावे व त्याचे पुढे कायद्यात रूपांतर व्हावे म्हणून हे बिल संसदेत सर्वप्रथम डॉ. बाबासाहेबानी मांडले होते .पण रूढी , परंपरावादी मनोवृत्ती आड आल्या आणि दुर्देवाने हे बिल पास न होता अडकले , रखडले आणि या देशातील मोठया स्त्रीशक्तीला आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागले. याची भयंकर खंत डॉ. बाबासाहेबांना वाटली. त्यांना खूप वाईट वाटले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे देशातील पहिले कायदे मंत्री होते कि त्यांनी ‘कायदेमंत्री’ पदाचा राजीनामा दिला. यावरून बाबासाहेब स्त्रियांच्या आस्थेसाठी किती संवेदनशील होते याचा प्रत्यय येतो. पुढे घटनेच्या माध्यमातून देशातल्या स्त्रीशक्तीला डॉ. बाबासाहेबानी न्याय मिळवून दिला.
स्त्री कामगारांची शक्ती आपल्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन काम करू शकते , हा विचार बाबासाहेबानी ओळखला व स्त्री कामगारांनाही न्याय मिळवून दिला. स्त्री कामगारांसाठी त्यांच्या कामाचेही नियोजन झाले पाहिजे , त्यांच्या कामाचे तास सुनिश्चित झाले पाहिजेत यामध्ये १२ तासाचे ८ तास केले , स्त्री कामगारांना पगारी प्रसूती रजा मिळाली पाहिजे,स्तनदा मातांसाठी स्तनपानगृहाची योजना, पाळणाघरे यांची सोय असावी, स्त्री कामगारांना रात्र पाळी नसावी , कामाच्या गरजेनुसार स्त्रियांसाठी स्वतंत्र स्नानगृह व शौचालय , व्यवस्था असावी अशा अनेक त्यांच्या मागण्या बाबासाहेबांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून केल्या आणि या देशाच्या कायद्यात त्यांचे रूपांतर करत त्यांची प्रभावी अमलबजावणीही केली.
बाबासाहेबांचे सर्व स्तरातील म्हणजेच उच्च अधिकारी वर्ग ते महानगरपालिकेतील चतुर्थश्रेणी सफाई कामगार क्षेत्राकडे बारकाईने लक्ष होते. याठिकाणी दलित समाजाची संख्या मोठी होती .अत्यंत गलिच्छ काम करून समाजाचे आरोग्य अबाधित राखणाऱ्या या सफाई कामगारांचा कोणीही वाली नव्हता. त्यांची संघटना करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याकाळी स्वतःला कामगार नेते म्हणवून घेणारे कोणीही पुढे आले नाहीत .तेव्हा डॉ. बाबासाहेबानी त्यांची संघटना स्थापन केली. या संघटनेमुळेच चातुर्वतश्रेणी कामगारांना सर्व प्रकारचे हक्क आणि नोकरीची शाश्वती प्राप्त झाली.
कामगारांसाठी पी.एफ, विमा, ग्रॅज्युएटी यांची तरतूद करण्यात आली आहे. कामावर रुजू होताक्षणी कंपनी किंवा संस्थेमार्फत विमा संरक्षण कर्मचाऱ्यांना लागू होते. तसेच एकूण पगारातील १२ % रक्कम प्रोविडेंट फंडात जमा केली जाते. कंपनी किंवा संस्थेमार्फतही तितकीच रक्कम पी.एफ खात्यात जमा होते. त्याचप्रमाणे सलग पाच वर्षे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटी (उपदान लाभ) देण्यात येतो. प्रत्येक वर्षात १५ दिवसाचे वेतन यानुसार सेवेचा एकूण वर्षासाठी ग्रॅज्युएटी दिली जाते.
कामगारांच्या जीवन सुरक्षेसाठी पेन्शन योजना चालू करून त्यांच्या रिटायरमेंटनंतर उदरनिर्वाह करण्यास आणि जीवन सुखी करण्यास उपयुक्त आहे. अशा अनेक सोयी सुविधा कामगारांसाठी करण्यात आल्या.
खरोखरच या देशातील कामगारांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानाबद्दल कामगार त्यांचे सदैव ऋणी आहेत.

– लेखन : प्रा.डॉ. यशोधरा वराळे. प्रभारी प्राचार्या डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800