महाराष्ट्रात १ मे या दिनाचं दुहेरी महत्व आहे. १ मे १९६० रोजी आजच्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली असल्याने हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो.तसंच हा जागतिक कामगार दिनही आहे.
जगभर १ मे हा कामगार दिन म्हणून पाळला जातो. मात्र तो साजरा केला जात नाही. याचं कारण म्हणजे अमेरिकेत १ मे १८८६ रोजी कामगार कल्याणासाठी फार मोठे आंदोलन झाले होते. कामाचे १६ तास कमी करून ते ८ तास करावेत, कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या योजना असाव्यात या तेथील कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या. या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलन समर्थक कामगार आणि आंदोलन विरोधी कामगार यांच्यात शिकागो येथील हेमार्केट चौकात हिंसक वळण लागले. बॉम्बस्फोट झाला. काहींना प्राण गमवावे लागले. शहिद कामगार यांच्याविषयी आदर प्रकट करण्यासाठी १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळावा, असे अमेरिकेतील कामगार संघटनांनी ठरविलं. पुढे हळूहळू जगातील इतर देशांमध्ये सुध्दा १ मे हा कामगार दिन म्हणून पाळला जाऊ लागला. बहुतेक देशांमध्ये या दिवशी सुट्टी देण्यात येते. विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात.
भारतात पहिला कामगार दिन मद्रास येथे (आताचे चेन्नई) १ मे १९२३ रोजी डाव्या विचार सरणीच्या किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान या संघटनेनं कॉम्रेड मलयपूरम सिंघवेलू चेट्टीयार यांच्या नेतृत्वाखाली पाळला. यावेळी सरकारकडे विविध प्रकारच्या मागण्या मांडण्यात आल्या. त्यातील एक प्रमुख मागणी होती, ती म्हणजे कामाचे तास १६ वरून ८ करणे ही होय. प्रत्यक्षात ही मागणी मान्य व्हायला अनेक वर्षे लोटली, आणि याचं श्रेय आहे, ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना. कामगार नेते असलेल्या बाबासाहेबांची ब्रिटीश सरकारने व्हॉइसरॉय एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य म्हणून ७ जुलै १९४२ रोजी नेमणूक केली. तेव्हा पासून कामगार कल्याण विषयक अनेक कायदे, योजना बाबासाहेबांनी लागू केल्या. खरं म्हणजे हा सर्व आढावा या लेखात घेणं शक्य नाही,स्वतंत्र ग्रंथाचा तो विषय आहे . पण आपण इथे निदान तोंड ओळख तरी करून घेऊ या.
बाबासाहेबांनी केलेले कामगार कल्याण विषयक कायदे आणि सुरू केलेल्या योजनांची संख्या २५ पेक्षा जास्त आहे. यातील काही प्रमुख म्हणजे त्यांनी कामगारांचे कामाचे तास ८ केले. ” समान काम समान वेतन ” या तत्वानुसार स्त्री -पुरुष यांच्या वेतनात समानता आणली. स्त्रियांना बाळंतपणाची रजा लागू केली. कामगार राज्य विमा योजना, आरोग्य योजना, कामगार कल्याण निधी, भविष्य निर्वाह निधी, कामगार संघटनांना मान्यता, किमान वेतन हमी, महागाई भत्ता, कामगारांना कौशल्य प्रशिक्षण, महिला व बाल कामगारांना संरक्षण मिळण्यासाठी कायदा, खाणीत काम करण्यास महिलांना बंदी, महिला कामगार कल्याण निधी, भर पगारी रजा, सेवा योजना कार्यालये, अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
बाबासाहेब केवळ कामगार नेतेच नव्हते तर निष्णात कायदे पंडित होते. इंग्लंड, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्यामुळे त्यांचा तिकडील कामगार चळवळी, कायदे, योजना यांचा चांगला अभ्यास होता. कामगार कल्याणाची तळमळ, कायदे करण्याचे ज्ञान, मिळालेली संधी याचा त्यांनी सुरेख उपयोग करून देशातील कामगारांना कायमस्वरूपी लाभ मिळवुन दिले. जवळपास १९४२ ते १९४६ अशी ४ वर्षांची त्यांची कारकीर्द देशातील कामगार कल्याणावर कायमचा ठसा उमटवून गेली.त्यांच्या या थोर कामगार कल्याण कार्याबद्दल भारतातील कामगार बंधू,भगिनी त्यांचे कायमचे ऋणी आहेत. जागतिक कामगार दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.
लेखन – देवेंद्र भुजबळ:- 9869484800.