दोन दिवस कसे गेले कळलंच नाही आणि आजचा तिसरा दिवस आणि तोही अर्धा दिवस. उगीचच एक हुरहूर वाटायला लागली.
आजचा ब्रेकफास्ट खास होता. नाव वारीची तयारी…साबूदाण्याची खिचडी, दही, केळं आणि कलाकंद हा बेत ! आज जेवण नव्हतं. कार्यक्रम १ वाजता संपणार होता, म्हणून सकाळीच सर्वांना शिदोरी दिली होती. त्यात पनीर काठी रोल, मोतीचूर लाडू, फ्रूटी, घरी जाईपर्यंत पुरेल इतके सुक्या पुऱ्याचे मकिनचे एक पाकिट. .. हा विचार नक्कीच कौतुकाचा होता.
कार्यक्रम लवकर सुरू होणार होता. म्हणून लगबगीने सर्व मोठ्या हॅालमध्ये जात होते. मी दोन दिवस जे भेटू शकले नव्हते त्यांना चितळ्यांच्या स्टॅाल शी भेटायला बोलाविले. ते येईपर्यंत इतर काही कपड्यांचे, खाद्यपदार्थांचे स्टॅाल होते, ते पाहिले. काही बालपणीचे, बिल्डिंगमध्ये रहाणारे खूप वर्षांनी भेटले. नवीन ग्रूपवरच्या, पण कधीही न भेटलेल्या काहींची भेट झाली. छान वाटले.
आज हॅाल तुडूंब भरला होता. समारोपाचा कार्यक्रम होता. आषाढ महिना असल्यामुळे महेश काळे ह्यांचा अभंगवारी हा कार्यक्रम होता. त्यांनी वारकऱ्यांच्या पांढऱ्या टोप्या वाटायला आणल्या होत्या.
आजचा ड्रेसकोड होता बायकांसाठी काठापदराची साडी, इरकली साडी ….रंग विटकरी.. हिरवा किंवा हळदी आणि नथ ! पुरूषांसाठी पांढरा कुर्ता, धोतर, उपरणं.. खूप जणं ह्या वेषात आली होती.
दारावर उभे असणाऱे येणाऱ्यांना कपाळाला उभे गंध आणि बुक्क्याचा टिळा लावत होते. छान भक्तिमय वातावरण झाले होते. आत शुभदा सहस्त्रबुध्दे ह्यांचे स्क्रिनवर सुरेख सॅंड आर्ट चालू होते. त्यानंतर समारोपाचे भाषण, मंडळांच्या अधिकाऱ्यांची भाषणं, काहींचे सत्कार, आणि पुढील २०२६ चे संमेलन सियाटल ला होणार आहे तेव्हा त्यांना स्टेजवर बोलावून त्यांचे स्वागत असे काही कार्यक्रम झाले.
आणि त्या नंतर सुरू झाला मुख्य कार्यक्रम, ज्याची सर्व जणं उत्सुकतेने वाट पहात होते. आपला सर्वांचा लाडका क्रिकेटपटू सुनिल गावस्कर, ह्यांचा जीवन गौरव सोहळा ! सुनिल गावस्करांची मुलाखत अतिशय छान झाली. आपण नेहमी त्यांना टिव्हीवर क्रिकेटसंबंधी बोलतांना पाहिले आहे. हसत खेळत त्यांनी अनेक किस्से सांगितले. त्यामुळे प्रेक्षक एकदम खूश झाले.
त्यानंतर स्टेज वर US क्रिकेट टीमचा कॅप्टन सौरभ नेत्रवळकर आला आणि क्रिकेटप्रेमींना त्याचे जोरदार स्वागत केले. तो आणि अमेरिकेचा कोच दोघेही मराठी असल्यामुळे अभिमान वाटला. तेही मराठीत छान बोलले. गावस्करांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. गावस्करांना जीवन गौरव पुरस्कार देतांना मानपत्राचे वाचन झाले. जे द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी अतिशय सुरेख लिहीले होते.
आणि त्या नंतर सुरू झाला महेश काळे ह्यांचा अभंगवारी हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमाचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य होते .. एकीकडे मुक्ता बर्वेचे वारीच्या चित्रांप्रमाणे सूत्रसंचालन चालू होते, मग महेश काळेंनी स्वतः रचलेला, चाल लावलेला अभंग सुरू केला. डावीकडे स्टेजवर असलेल्या सुलेखनकार अच्युत पालव ह्यांनी कुंचला घेऊन विठ्ठल चितारायला सुरवात केली, आणि उजवीकडे प्रसिध्द शिल्पकार भगवान रामगुढे ह्यांनी विठ्ठलाची मूर्ती बनवायला सुरवात केली. अध्यात्म, संगीत, कला ह्यांचा त्रिवेणी संगम, मंगलमय वातावरण ह्यांनी भारावून व्हायला झाले. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम ह्यांच्या महेश काळेंनी गायलेल्या अभंगांच्या नादात, वारी सारखेच सर्व गुंग झाले आणि भक्तीभावानी विठ्ठल विठ्ठल करत नाचायला लागले. ते वातावरण अनुभवणे हा एक आनंद होता. त्या आनंदमय वातावरणातच कार्यक्रम संपल्यावर सगळे पांगले.
जसे ऐकले होते तसाच हा BMM चा कार्यक्रम अतिशय सुंदर होता. आवडला. अनेक जणांनी २ वर्षांनी सियाटलला नक्की येणार असे जाहीर केले.
अमेरिकेत इतक्या उत्कटतेने मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत, हे प्रत्यक्ष पाहून त्या सर्वांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे असे मी म्हणेन.दर्जेदार कार्यक्रम दिल्याबद्दल सर्व कार्यकर्ते, कलाकार, आयोजक ह्यांना धन्यवाद आणि सर्वांना त्यांचे हे कौतुक कळावे म्हणून हा लेखनाचा केलेला छोटासा प्रयत्न !
धन्यवाद.
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800
सध्या अमेरिकेत गेलेल्या काही नातेवाईक व मित्रमंडळींकडून अत्यंत उत्कटतेने केलेले संमेलनाचे प्रत्यक्षदर्शी वर्णन ऐकले, वाचले होतेच; परंतु चित्रा ताई मेहेंदळे ह्या कसलेल्या लेखिकेच्या सिद्धहस्त लेखणीतून ते वाचताना स्वतः अनुभव घेतल्याचा आनंद मिळाला. सर्वच भाग मनःपूर्वक आवडले.मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. 🙏💐
फार छान वर्णन चित्राताई. आशिष चौगुले शी भेट झाली का?