अमेरिकेत आता पानगळीला सुरवात झाली आहे. तिथे जे, मेपलचे वृक्ष असतात त्यांना खूप छान छान रंग चढतात. नझारा अतिशय सुरेख दिसतो. त्यावरून अरुणा मुल्हेरकर यांनी केलेली कविता व पाठविलेली छायाचित्रे आपल्याला नक्कीच मोहवून जातील…..
– संपादक
रंगपंचमी खेळ चालला
पहा निसर्गात
लाल केशरी पीत तपकिरी
वृक्ष शोभतात
ठाऊक आहे का उद्याचे
भविष्य या तरूंना
प्रभा फाकते ज्योतीची
दिवा मालविताना
क्षितिजावरती मावळतीचे
रंग कसे उधळले
कालचक्र हे अविरत फिरते
कोणी ना जाणले?
वसंत सरुनी बहर संपला
ग्रीष्म वर्षा येऊनी गेला
हेमंताच्या आगमनाने
पानगळीला आरंभ झाला
क्षणभंगूर हे आहे जीवन
आज मानवा जगून घे तू
आयुष्याच्या संध्याकाळी
हसत रहा नि हसवित जा तू
सृष्टीने हा धडा शिकविला
पानगळ अटळ आहे
जन्ममृत्यूच्या चक्रातून
सदा सर्वदा फिरणे आहे

– रचना : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800