“नमो मातृभूमि जिथे जन्मलो मी ।
नमो आर्यभूमि जिथे वाढलो मी ।।
नमो धर्मभूमि जियेच्याच कामी ।
पड़ो देह माझा सदा ती नमीमी ।।”
काहीही लिहीण्यापुर्वी, माझ्या या भूमीला अनेक असे थोर क्रांतिकारक, थोर समाजसुधारक, थोर साहित्यिक, थोर विचारवंत दिले अशा मातृभूमीला प्रथमत: नमन.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मार्सेलीस येथे बोटीतून समुद्रात मारलेल्या आणि त्रिखंडात गाजलेल्या उडीस ११३ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने दि. ८ जुलै,२०२३, रोजी सायंकाळी ठिक ५.३० वाजता नवी मुंबईतील कोपरखैरणे याठिकाणी आपल्या भारताचा स्वाभिमान, धर्मवीर, हिंदुहृदयसम्राट, डोळ्यात लखलखती ज्वाला घेऊन ब्रिटीशांविरोधात बंड पुकारणारे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी नवी मुंबईचे आमदार मा.गणेश नाईक यांच्या सौजन्याने “कालजयी सावरकर” हा लघुपट दाखवण्यात आला.

चित्रपटाला सुरुवात होण्यापूर्वी हिंदू संस्कृतीच्या “अतिथी देवो भव:” या युक्ती प्रमाणे सावरकर विचारमंच यांच्या तर्फे प्रमुख पाहुणे आमदार श्री. गणेश नाईक, माजी खासदार संजय नाईक, आमदार संदीप नाईक, कलाकार- तेजस बरवे, लेखक – संपादक देवेंद्र भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. एका जल्लोषाच्या वातावरणात हा सत्काराचा कार्यक्रम खुप छान पार पडला. पाहुण्यांनी शुभेच्छा संदेश दिले आणि लघुपट पाहण्यासाठी आपले स्थान ग्रहण केले.

सावरकर विचार मंच, नवी मुंबई चे प्रमुख श्री संतोष कानडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
लघुपटाची सुरवात एका रोमांचकारी भागाने झाली. भारत भू स्वतः माझ्या विनायकाचे गुणगान गात होती. अंगावर काटा येणारा असा तो क्षण होता. क्रांतिकारक कसा असावा, आणि क्रांतिकारकांचे जीवन कसे असते हे प्रत्यक्ष डोळ्या समोर उभे राहिले होते. किती त्या यातना, किती ते कष्ट सगळं सहन करत फक्त आपल्या मातृभूमीसाठी आणि स्वजणांसाठी जीवाची बाजी लावन. किती कठीण असतं ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनपटात दिसून आले. त्याच्या या पराक्रमाने तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची बीज रोवली जात आहेत.

लघुपट पाहिल्यानंतर सावरकरांना अजून जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती आणि एखाद्या वाट चुकलेल्या जसा एखादा मार्गदर्शक मिळतो ना तशीच माझी भेट लेखक देवेंद्र भुजबळ यांच्याशी झाली. एक अंध:कारात असलेला मी त्याला प्रकाशाकडे नेण्याची वाट मला देवेंद्र भुजबळ सरांनी दाखवली. त्याच्या अनुभवातून आणि त्यांच्या अभ्यासातून मला स्वातंत्रवीर सावरकर चांगल्या प्रकारे कळले. देवेंद्र सरांनी त्यांनी लिहिलेलं “स्वातंत्रवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” हे पुस्तक मला भेट म्हणून दिले. अश्या अनेक प्रसंगांतून सावरकर माझ्या मनात घर करून बसले.
खरंच सावरकरांचे विचार, सावरकरांचे राहणीमान, सावरकरांची निती या सारखे अनेक विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवणाऱ्या प्रत्येक समाजसुधारकाला मी मनाचा मुजरा करतो.

— लेखन : ऋषिकेश काळे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
ग्रेट…सुदंर लेख…माहितीपूर्ण
छान लेख 👍