नवरात्र म्हणजे शक्तीचा जागर. भक्तीची गंगा. उपवास, स्तोत्र पाठ, पूजाअर्चा, दर्शनवरात्र म्हणजे शक्तीचा जागर. भक्तीची गंगा. उपवास, स्तोत्र पाठ, पूजाअर्चा, दर्शनासाठी वेगवेगळ्या मंदिरात जाणं हे दृश्य बघायला मिळतं.
अनेक शक्तीपीठांची वारी ही हे भक्त करतात. आपल्या कडे ५१ शक्तीपीठ आहेत असं एक मत आहे तर काहींच्या मते १८ शक्ती पीठ महत्त्वाची आहेत.
ही शक्ती पीठं कशी तयार झालीत ह्या मागे एक कथा आहे, ती थोडक्यात अशी…
राजा दक्षने एक मोठा यज्ञ केला आणि आपलीच मुलगी सती हिच्या नवऱ्याला म्हणजे शंकराला आमंत्रण दिल़ं नाही. रागावलेली सती त्या यज्ञात पोहोचली आणि वडिलांना असं कां केलंत ? हा जाब विचारला. त्यावर दक्षने शंकराचा अपमान करत काही वाक्यं बोलली. सतीने रागावून यज्ञ कुंडात उडी घेतली.
शंकराला हे कळल्यानंतर त्याने तांडव सुरू केले. भयाने चराचर कापू लागले. नंतर सर्व देवांच्या विनंतीला मान देऊन ते शांत झाले आणि यज्ञकुंडातून सतीचे शरीर खांद्यावर घेऊन पृथ्वीवर भ्रमण केलं. असं करत असता सतीच्या शरीराचे वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले. ज्या ज्या ठिकाणी हे अवयव पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठांची स्थापना झाली.
ह्या शक्तीपीठांपैकी एक म्हणजे कोलकाता येथील कालीघाट मंदिर.
कथेनुसार येथे माता सतीच्या उजव्या पायाचा अंगठा पडला होता.
ह्या मंदिरात जी देवीची मोठी प्रतिमा आहे. ह्या प्रतिमेत देवी, शंकराच्या छातीवर पाय देऊन उभी आहे. तिच्या गळ्यात नरमुंडमाळा आहेत. हातात तलवार आहे आणि नरमुंड ही. तिची जीभ बाहेर निघालेली असून त्यातून रक्त वाहताना दिसतं आहे.
ती जीभ मात्र सोन्याची आहे.

ह्या प्रतिमेची प्रतिष्ठा कामदेव ब्रह्मचारी ह्यांनी केली होती.
कोलकाताच्या ह्या कालीघाट मंदिराचे निर्माण १८०९ मध्ये एका श्रीमंत व्यापारी सुवर्ण रॉय चौधरी ह्यांच्या मदतीने झालं. मंदिरात काही गुप्त कालीन नाणी असल्याने हे मंदिर गुप्त काळात ही असावं असं वाटतं.
हे देवीचं जागृत स्थान आहे. इथे दर्शन करणाऱ्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात हा भक्तांचा विश्वास आहे. ह्या मंदिरात फक्त देशाच्या वेगवेगळ्या भागातून लोक येतात असं नाही तर विदेशातून ही दर्शनार्थी भरपूर संख्येत येतात.
हे मंदिर काली देवीचं एक सिद्ध का शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं.

अगोदर हे मंदिर हुगळी (भागिरथी) नदी किनारी होतं पण हळूहळू ही नदी दूर गेल्याने हे आता आदिगंगा नावाची एक नहर आहे त्याच्या किनारी आहे जी शेवटी हुगळीला जाऊन भेटते.
तर असे हे कालीमातेचं कालीघाट शक्तीपीठ.

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800