सेना दलातील अधिकारी, सैनिकांना देश भरात जिथे नेमणूक होईल, तिथे तैनात रहावे लागते. सुदैवाने काही वेळा, काही ठिकाणी त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब राहू शकते. आपल्या पोर्टलच्या लेखिका, कवियत्रि सौ पुनम सुलाने सिंगल यांचे वास्तव्य सध्या पतीसमवेत काश्मीर खोऱ्यात आहे. तेथील त्यांनी टिपलेले हे पक्षी जीवन….
– संपादक
श्रीनगरला येण्यापूर्वी मनात खूप वेगवेगळे प्रश्न होते. या ठिकाणी अगदी मायनस डिग्री मध्ये तापमान गेल्यावर मार्च ते सप्टेंबर पर्यंत हिरवेगार असणारे डोंगर हळूहळू बर्फाच्या चादरी खाली झाकले जातात. संपूर्ण प्रदेश हा पांढराशुभ्र होऊ लागतो. ऑक्टोबर महिन्यात झाडांच्या पानगळीला सुरुवात होते आणि पाहता पाहता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबर मध्ये तर सर्व झाडे निष्पर्ण होतात.
अशावेळी येथील सर्व पक्षी हे नेमके कुठे जात असतील ? हा प्रश्न नेहमी माझ्या मनात असायचा. मला असे वाटायचे की वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे, आवाजाचे सुंदर सुंदर पक्षी थंडीच्या दिवसांमध्ये लांब कुठेतरी निघून जात असतील.
मात्र आम्ही राहतो त्या ठिकाणी घराच्या अवतीभवती अनेक वेळा भिंतीच्या आडोशाला असलेले कबूतर बघितले. त्यामुळे मागील एक दोन आठवड्यापासून दररोज स्वयंपाक बनवताना मुद्दाम पहिली पोळी ही पक्षांसाठी बनवायला सुरुवात केली. तेव्हापासून दररोज सकाळी सकाळी त्यांच्यासाठी बनवलेली पहिली पोळी, तसेच तांदळाचे दाणे टाकायला हातात घेतले की, एका मागून एक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पाखरांची यायला सुरुवात झाली.
सुरुवातीला फक्त एक दोन मैना आणि दोन-तीन कबुतरे यायची. मात्र पाहता पाहता पूर्ण अंगण कबूतर, चिमण्या, बुलबुल, मैना, कावळे अशा वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या पक्षांनी भरायला सुरुवात होऊ लागली. आता हे सर्व दाणे एकाच ठिकाणी टाकावे लागत नाहीत. याच्यामागे कारण असे आहे की, ज्या छोट्या चिमण्या आहेत त्या एका बाजूला हळूच घाबरत घाबरत येतात आणि लगेच एक दोन दाणे घेतले की कुठेतरी दूर उडून जातात आणि परत येतात. त्यामुळे त्यांना थोड्या लांब अंतरावर दाणे टाकावे लागतात .
तसेच कबूतर महाशय एकदा आले की, खाण्यामध्ये इतके व्यस्त होतात की त्यांच्या अगदी जवळ ही गेलो तरी ते काही जागेवरून हलत नाही.
एक दोन कावळे बिचारे काव काव करीत करीत उडत येतात आणि पोळीचा तुकडा तोंडात भरतात की मग एखाद्या मानकरी पाहुण्याप्रमाणे लांब भिंतीवर बसून तो तुकडा संपवतात आणि लगेच गायब होतात.
तुर्रेदार आणि टोकदार चोच असलेली छोटी सी बुलबुल कधी खिडकीवर बसते. तर कधी एक दाणा घेऊन लगेच उडून जाते. एक दिवस तर ही छोटी बुलबुल दरवाजा उघडा असताना कशी काय घरात आली कोणास ठाऊक. मात्र पूर्ण घरभर फिरत राहिली. मुलांची सकाळी सकाळी शाळेत निघायची गडबड आणि बुलबुल चे असे अचानक घरात येण्यामुळे अचानकच सर्व गोंधळ गोंधळ झाला. कधी किचनमध्ये तर कधी बेडरूमला तर कधी हॉलला तर कधी मुलाच्या रूममध्ये सर्व चक्कर लावून झाल्यानंतर आपोआप बाहेर देखील निघून गेली.
आता नंबर येतो साळुंकी बाईचा. जिला हिमालयन मैना या नावाने सुद्धा ओळखले जाते. हिचा थाट वेगळाच आहे. दररोज सकाळी जोपर्यंत मी बाहेर निघत नाही तोपर्यंत ती दारासमोरच दिसणार आणि एकदा का दाणे आणि पोळी टाकायला सुरुवात केली की खाण्यामध्ये तिचे अजिबात लक्ष राहणार नाही.
उलट येणाऱ्या छोट्या चिमण्या, बुलबुल आणि खास करून कबूतरे यांच्या मागे लागणार स्वतः एक दाणा खाणार नाही आणि दुसऱ्या पक्षांनाही खाऊ द्यायचे नाही अशा स्वभावाच्या या मैना बाईला मग हळूच दूर अंतरावर थोडेसे दाणे टाकावे लागतात. तिचा जोडीदार बिचारा शांतपणे तेथे दाणे वेचत राहतो मात्र, ती तेथेही व्यवस्थित खाणार नाही आणि परत परत तिच्या आवाजात सगळ्या पक्षांना ओरडत राहते.
सुरुवातीला तिच्या आवाजाला घाबरणारी कबूतरे, चिमण्या आता तिच्या नेहमीच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून सर्व दाणे संपेपर्यंत कुठेही हलत नाही आणि ती मात्र एकही दाणा न खाता फक्त या ठिकाणाहून त्या ठिकाणी उडत राहते.
अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पक्षांना पाहून खूप आनंद होतो. वेळ कसा जातो, हे कळतच नाही. एक मात्र खरं, निसर्गाशी तादात्म्य राखायला शिकले की, आयुष्य जगणे खूप सुंदर होऊन जाते.

– लेखन : पूनम सुलाने-सिंगल
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800