पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून काश्मिर ओळखले जाते.
काश्मिरची राजधानी असलेल्या श्रीनगर येथील ‘ट्युलीप गार्डन’ पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. चला तर या सुंदर गार्डनची माहिती या लेखातुन घेऊ या…
श्रीनगर शहरातील ‘दल लेक’ च्या शेजारी जबरवान टेकडीच्या पर्वत रांगात आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन आहे. २००७ मध्ये या गार्डनला ‘इंदिरा गांधी ट्युलिप गार्डन’ असे नांव देण्यात आले आहे. श्रीनगर विमानतळापासून २२ किमी तर ऐतिहासिक लाल चौकाजवळून ८ किमी अंतरावर आहे. या गार्डनमधून दल सरोवराचे विहंगमय दृश्य बघता येते.
काश्मिर खोऱ्यात फुलशेती आणि पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने वनस्पती उद्यान विभागाद्वारे मुघल गार्डन्सची देखरेख केल्या जाते. शालिमार गार्डन, निशांत बाग, चष्मेशाही गार्डन या गार्डन्सला ‘मुघल गार्डन’ असे संबोधले जाते. ही सर्व उद्याने अतिशय आकर्षक आणि मनमोहक असून श्रीनगर येथील दल लेकच्या काठावर आहेत. एका बाजूला श्रीनगरचे राजभवन तर दुसऱ्या बाजुला विस्तीर्ण अशा जागेवर ‘ट्यूलिप गार्डन’ ची जागा आहे.
‘श्रीनगर’च्या अनेक उद्यानांमध्ये ही बाग प्रसिद्ध आहे. वसंत ऋतूनंतर फुलांच्या हंगामात या बागेत लाखो ट्यूलिप बल्ब फुलतात. काश्मिर पर्यटन विभागाद्वारे आशियातील सर्वात मोठा ‘ट्यूलिप फेस्टिव्हल’ दरवर्षी येथे आयोजित केला जातो. मागील २ वर्षात कोरोनामुळे फार कमी मंडळीनी ‘ट्यूलिप फेस्टिव्हल’ मधे भाग घेतला असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते, तर यंदा प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
जगात १६ व्या शतकात ट्यूलिप हे फुल युरोपात उदयास आले तेव्हापासून लोकप्रिय झाले. ट्यूलिपच्या ४ उपप्रजाती १०० प्रजाती आणि ४००० वेगवेगळे प्रकार आहेत. हे फुल कमळ प्रजातीच्या कुटूंबाशी संबंधित असून याची वाढ थंड वातावरणामध्ये चांगली होते, या फुलांना वसंत ऋतूमध्ये बहार येते. प्राचीन काळी ट्यूलिपची फुले फारच मौल्यवान मानली जात होती. ट्यूलिपचे एकच फूल केवळ ३ ते ७ दिवसांपर्यंत फुलते. या वनस्पतीचे आयुष्य सुमारे १ ते २ वर्षे आहे. ट्यूलिपच्या फुलाला एका देठावर एकच फुल उमलते म्हणून या फुलांना cut flower म्हणूनही ओळखले जाते. काही प्रजाती अशाही आहेत, कि ज्याला एकापेक्षा जास्त फुले लागतात. ट्यूलिप फुलांच्या कळ्या इतर वनस्पतींपेक्षा मोठी आणि मजबूत असतात. जगात नेदरलँड्समध्ये सर्वात जास्त या फुलांची शेती केली जाते, येथून दरवर्षी सुमारे २ ते ५ अब्ज डॉलर्स निर्यात होते.
ट्यूलिपचे अनेक प्रकार असून त्यातील दोन प्रकार आपण बघु यात…
अक्रोपोलीस ट्यूलिप :-
अक्रोपोलीस ट्यूलिप फुल हे साधारण गडत गुलाबी रंगाचे असते आणि हे फुल २१ ते २४ इंच उंच असते. अक्रोपोलीस ट्यूलिप हे फुल वसंत ऋतूच्या मधल्या काळामध्ये बहरते आणि हे फुल सूर्यप्रकाशामध्ये चांगले येते.
क्विन ऑफ नाईट ट्यूलिप :-
क्विन ऑफ नाईट हे गडद किरीमिजी रंगाचे असते. या फुलाचा रंग गडद असतो काळ्या रंगाचे फुल आहे असे वाटते, म्हणूनच या फुलाला क्विन ऑफ नाईट असे नाव पडले असावे. हे फुल २५ इंचापर्यंत वाढते आणि या फुलाचे देठ सुद्धा बळकट असल्यामुळे या फुलांचे वाऱ्यापासून संरक्षण होते.
ट्यूलिप फुलाचे रंग :-
ही फुले पांढरा, पिवळसर, लाल तपकिरी, जांभळ्या, गुलाबी आणि काळ्या रंगामध्ये आढळतात. लाल ट्यूलिप हे प्रेम दर्शविते, पांढरे ट्यूलिप हे क्षमा मागण्यासाठी वापरले जाते, तर जांभळे ट्यूलिप हे उदारता दर्शविते.
आपल्या देशातील पर्यटक ‘ट्यूलिप फेस्टिव्हल‘ सह बर्फाचा आनंद घेण्यासाठी काश्मिर खोऱ्यात जातात. ट्यूलिप उत्सव हा वार्षिक उत्सव असल्यामुळे अनेक पर्यटन कंपन्या यावेळी सहल आयोजित करतात. ट्युलिप गार्डनला भेट देण्याचा हा उत्तम काळ असून याच काळात अनेक प्रकारचे ट्यूलिप पाहायला मिळतात. येथे पोहोचण्यासाठी विमानाने श्रीनगर, ट्रेनने जम्मूनंतर २७० किमी रस्तामार्गेही पोहोचता येते. तर मग नक्की भेट देणार ना ?
– लेखन : हरिहर पांडे. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
ट्यूलीप गार्डन छान, दुर्मिळ माहिती दिली. मोहक फुलांची छायाचित्रे . अजुन एकदोन फुलांचे क्लोज अप टाकल्यास छान दिसेल. खुप छान