१) गुरू वेगळा रे
गुरू वेगळा वेगळा, गुरू वेगळा रे,
जाणतसे मनातले, भाव आगळा रे,
जावे जावे त्या शरण, घट्ट धरावे चरण,
तोच सत्य नारायण, तोच सावळा रे,
सांगावे मनातले, सुख दु:ख जे साठले,
तो शिष्याला तारण्या, पाठी राहीला रे,
लिन पूर्णपणे व्हावे, अष्टभाव ते दाटावे,
ह्रदयी त्यास साठवावे, नेत्री सोहळा रे,
गुरू करी खरी कृपा, सारा मार्ग करी सोपा,
तुझ्या प्रारब्धाचा ठेका, त्याने घेतला रे,
सारे बदलेल सत्य, त्याचे नांव घ्यावे नित्य,
त्याचा माया ही अद्भुत, तोच धावला रे..!!!
– रचना : हेमंत भिडे. जळगाव
२) “गुरुपौर्णिमा”
एक आस शिकण्याची,
गुरू केले तुम्हांसी..
गुण थोडे घेईन तुमचे,
स्वप्न बाळगले उराशी ।
जमेल तेव्हढे घेत राहिले,
सोडली नाही चिकाटी,
वाट अजुनही चालते आहे,
तुमचा आशीर्वाद पाठीशी।
प्रेमही आहे, आदरही आहे,
जिव्हाळाही, अन मायाही..
यात न होणार कसूर कधीही,
घागर अजुनी रिकामी ।
– रचना : अनुराधा जोगदेव. पुणे
३) आई माझा गुरु… आई माझा गुरु
आई माझा गुरु आई माझा गुरु
धडा तिनं मला गिरवायला
केला गर्भातच सुरु
आई माझा गुरु आई माझा गुरु
ना डगमगली ती कष्टाला
बाळाचा मला करण्या महामेरू
आई माझा गुरु आई माझा गुरु
सतर्क सदा ती पहाऱ्याला
कधीही ना मी हारू
आई माझा गुरु आई माझा गुरु
एकच मला मोलाचा सल्ला
ना संगत वाईट धरू
आई माझा गुरु आई माझा गुरु
आतुर भेटण्या सदा मला
मी जवा लागे परदेशी स्थिरू
आई माझा गुरु आई माझा गुरु
एकच गाऱ्हाणं देवाला
शेवटच्या श्वासापातूर मी तिला स्मरू
– रचना : सर्जेराव पाटील
कौलवकर नाशिककर. (ऑस्ट्रेलिया)
🙏🙏🙏🙏🙏🙏
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800