१) नारी
जपे दोन्ही घरी
नाळ संस्काराची
विविध स्त्री रूपे
सदैव मानाची..
सवे घेत चाले
समाज, कुटुंब
मातृत्वाची देवी
प्रेमाने तुडुंब..
संस्कृतीचा वसा
खंबीर नेतृत्व
न हारता दावे
कष्टाने कर्तृत्व..
विकारी नजरा
छळती पीडती
उभारून पुन्हा
गगना भिडती..
विचारी, सोशिक
संयमीही नारी
चंडिका बनता
पडे सर्वा भारी..
– सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ.
२) राणी.. प्रेमळ तू नभात
राणी… आलीस तू या जगात
किती. सहन करत
स्त्रीच्याचं गर्भात
पुन्हा एकदा जन्म तुझा
तुझ्या नव्या अस्तित्वात…
उजळता सोनकेशरी पहाट
पसरते आनंदाची लाट
नऊ महिने नऊ दिवस
तुझा काळोखी प्रवास
कधी संपतो कळत नाही
घेतेस तू मोकळा श्वास
अस्तित्व तुझे.. जिंके विश्वास
संस्कारात तू घडली
काळ्या असंख्य पडद्यात
केलेस तू पार बंधन
वलयात दिसता पुसटशी
चक्राकार तू फिरली
इकडून तिकडून
नवजग स्वीकारताना…
तू फक्त न फक्त धडपडलीस
आतल्या बाहेरच्या गप्पा तुझ्या…
मनमोकळी तू रंगलीस
स्पर्शातही फिरता हात तुझा
सगळी संकटे पार करत…
तू.. तुलाच नाही कळलीस
शोध घेता अस्तित्वाचा..
तू स्वतःचं झुरलीस
सत्य जग स्वीकारत
राणी आलीस.. तू या जगात
राणी प्रेमळ.. तू नभात…. !
✍️सौ. विद्या संदिप जगताप, जेजुरी, पुणे
३) नका मारू मला
मला आई बाबा, नका मारू भावासाठी।
प्राण तळमळतो, तुमच्या भेटीसाठी।।
पोटी तुमच्या मी, येईल का मग पुन्हा।
काय माझी चूक आहे, मला सांगा माझा गुन्हा।।
जर ज्यास्त वाटली, तर करील मी चाकरी।
भांडे घाशील आईचे, तुम्हा खाऊ घालीन भाकरी।।
दादाला तुम्ही शिकवा, मला नको शाळा।
मुली विना आनंदाचा, फुलत नाही मळा।।
माझा गर्भपात करून, सुख कसे मिळणार।
लेक काय असते हे, तुम्हाला कसे कळणार।।
जर मला शिकवले तर, डॉक्टर मी पण होईल।
तुमच्या आयुष्याचे, स्वप्न पूर्ण होईल।।
तुमच्या दुःखामध्ये, सून साथ नाही देणार।
कितीही जीव लावला पण, ती लेक नाही होणार।।
भावासाठी बहिन, एक तरी हवी।
एका निमित्ताने तुम्ही, जाणार तिच्या गावी।।
निरोप तुमचा भेटता, मन आनंदून जाईल।
अशी मिठी मारील तुम्हा, मन गहिवरून येईल।।
लेकीसारखी काळजी, कोणी करत नाही।
मायेची उब तिच्या, कधी सरत नाही।।
नका गर्भपात करू, फक्त मुलासाठी।
मुलीसारखी संपत्ती, जगी नाही मोठी।।
– रामदास आण्णा
गाव : मासरूळ, जि. मातृतिर्थ बुलढाणा
४) स्त्री रूपे
स्त्री ची नऊरूपे
जणू दुर्गा मातेची
नऊ ऊर्जा नवरूपे
प्रतीके तेजस्वितेची
🌹🌹🌹
जन्मदात्री ती जननी
दु़ःखसाहिनी, सुखवाहिनी
बालरुपे देता वंशप्रजननी
सार्या कुटुंबाची जननी
🌹🌹🌹
कन्येच्या रूपात लाघवी
घराला गोकुळ भासवी
पैंजणांची छमछम तोषवी
माधुर्याची गाई गोडभैरवी
🌹🌹🌹
लाडक्या बहिणीची माया
ओवाळी प्रेमे भाऊराया
आधार तिला माहेरी या
आनंदोर्मि येती हृदयी या
🌹🌹🌹
मैत्रीची प्रेरणा हळुवार
आपुलकी निस्वार्थ अलवार
मैत्रीची बकुळपुष्पे सुगंधीहार
निरपेक्ष, निस्वार्थ मदतगार
🌹🌹🌹
स्त्री असते जेंव्हा प्रिया ती
बावरी, अनावर प्रेयसी ती
नयनी तिच्या दिसे नित प्रीती
तिज ना कधी जगाचीभीती
🌹🌹🌹
जेंव्हा ती पत्नी होते जयाची
स्वाभिमाने जपते प्रीतपतीची
राखते ती रीतभात सासरची
वंशवेल बहरवते संसाराची
🌹🌹🌹
सून म्हणून घेता ती बावरते
जबाबदारी संसाराची पडते
प्रत्येक वागण्यावर नजर असते
कर्तव्याच्या जाळ्यात अडकते
🌹🌹🌹
सासूपण मिरविताना मोहरते
सुनेच्या चुका सहजच शोधते
घराण्याच्या चालीरिती लादते
सासू होता कमीपणा न घेते
🌹🌹🌹
आजी बाई होता ती सावरते
रागरुसवे पार पुसून टाकते
नातवंडाना प्रेमवर्षावे न्हाते
वात्सल्यसिंधु सरिता होते
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
महिला दिनानिमित्त, स्वरचित कविता
– स्वप्नगंधा सतीश आंबेतकर, विरार🙏