काही कविता
१)
#स्त्री_शक्ती_अन्_वास्तव
स्री शक्ती अन वास्तव रेखाटते पूर्वापार असामान्य शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेल्या स्त्रीचे वास्तववादी मनोगत. मग ती स्त्री कधी असते न जन्मलेली बालिका, कधी अबला तर कधी बाईपणाच्या चौकटीतून स्त्री मुक्तीसाठी प्रयत्नरत सबला. जेव्हा या साऱ्याला मूठमाती मिळेल तोच खरा स्त्रीदिन. शब्द तेच, साकारतात स्त्रीचे मनोगत तीन वेगळ्या भावना अन भूमिकांतून.
आडरानी आडवाटेला
अतीरम्य तुझा हा गाव
मी उरले माझी आता
मज नको तुझे आडनाव•
मातीच्या अंधुक वाटा
मातीत मिसळुनी गेल्या
मी अर्घ्य उभ्या जन्माचे
तू दिवस साजरा केला•
काळीज उकलले जेव्हा
वेढले मला वळणाने
हुरहुरल्या क्षितिजानेही
सत्कार कोरडा केला•
ममतेच्या बेड्यांसाठी
व्यापार आईचा झाला
मज यात्रेची पुण्याई
मग प्रवास जरी तू केला•
मी दुर्गा शक्ती गीता
मी कुंती द्रौपदी सीता
गवसले मला मी जेव्हा
शृंगार मढ्याला केला•
माझ्याच आईच्या पोटी
मी जन्माआधीच विरले
स्त्रीत्वाचा गौरव करण्या
भिंतीवर नारे उरले !!
– नयना_निगळ्ये. अमेरिका
२)
|| महिला दिन ||
फक्त तिच्या संसाराला
सारे आयुष्य देतसे
एक दिसाचा सन्मान
तिच्या वाट्याला येतसे ||
तिने कुठे मागितली
संसारातून ही मुक्ती
तिला कशाला कोंडता
तीच आहे दैवी शक्ती ||
तिच्या वाचूनी अपुरा
आहे विश्वाचा पसारा
तिला सृजनाचा वसा
जन्म येतसे आकारा ||
रोज नवे नवे छळ
रोज नवा अत्याचार
मुक्ती मिळावी यातून
हाच सुयोग्य सन्मान ||
तिच्या माणूसपणाची
जाणीव जागी राहावी
तिच्या आत्मसन्मानास
ठेच ना पोहोचवावी ||
संसाराचे उध्दरण
शिव शक्तीचे मिलन
तिला अभय देणे हा
खराच महिलादिन ||
– रचना : ज्योत्स्ना तानवडे. पुणे
३)
स्त्री शक्ती
केवळ महिलादिनीच करतात
स्त्री शक्तीचा जयजयकार….
तिच्या गुणांचे कौशल्याचे
असतात नारे फार….
गायले जातात तिचे गोडवे
असते सर्वत्व तिचे कौतुकाचे पाढे….
तिला चंडिका,दुर्गेचे देतात स्थान
मात्र तिच्यावरच करतात अत्याचार….
भाषणात असते तिला आरक्षण
प्रत्यक्षात साधे नसते संरक्षण…
स्त्रिभुण हत्याचे रचतात कट
कोणत्याही निर्णयात तिचे नसते मत….
हुंड्यासाठी घेतात बळी
नवऱ्याचीही चालते दादागिरी….
लहान मुले ही पाहत नाही
बलात्काराने ती होरपळून जाई…
सतत अन्याय सहन करणे
एवढेच तिच्या नशिबी येई….
केवढा हा विरोधाभास
अहो केवढा आहे हा विरोधाभास…
एकीकडे म्हणतात तिला कालिका
मागून करतात तिचीच चेष्टा….
एकीकडे म्हणतात तिला सरस्वती
घरातील सर्व कामाची तिलाच सक्ती….
तिच्या शिक्षणाला महत्व नाही
चूल व मूल करण्यातच ती अडकून राही…
आजची स्त्री आधुनिक आहे
सर्व क्षेत्रात तिचे वर्चस्व आहे…
तिच्यावर राजकारण करू नका
जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबू नका…..
पुरुषी अहंकार बाजूला ठेवा
तिलाही निर्णय घेण्याचे स्वतंत्र द्या…
बघा कसे परिवर्तन घडेल
खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती घडेल….
राणी लक्ष्मीबाई होत्या
दुर्गामातेचा अवतार….
मदर तेरेसा होत्या
सहनशीलतेचे प्रतीक…..
इंदिरा गांधींमध्ये होते
धाडसी व्यतिमत्व….
सावित्रीबाई फुले मध्ये
होते सरस्वती मातेच रूप….
ह्या सारख्या थोर व्यक्तिचा
विसर पडून देऊ नका….
त्यांचा इतिहास नेहमी
डोळ्यासमोर ठेवा…..
स्त्री सक्तीचा सन्मान करा
स्त्री सक्तीचा आदर करा. ..
– रचना : रश्मी हेडे. सातारा
४)
स्त्री
जन्मास येऊनी
जन्मास घालणारी माता तू
मायेची पाखर अन्
गोड साखर तू….
वसंतातील कोकीळ अन्
श्रावणातील गालीचा तू
नभात दिसणारं
टिपूर चांदण तू…..
तेजोमय ज्योत अन्
अखंड वात तू
कर्तृत्ववान झाशीतलं
सळसळणारं रक्त तू….
निळ्याशार गगनातील
लोभस चंद्रकोर तू
प्रेमाचा वर्षाव करणारा
खळाळता झरा तू…..
सौंदर्याचं प्रतीक
मर्मबंधातली ठेव तू
नात्यांना घट्ट बांधणारं
अतूट बंधन तू…..
दु:खाचा आधारवड
मायेची गुंफण तू
गंधाळलेल्या रात्रीचं
मोहक रुप तू….
कुटुंबाचा आधार
प्रेमाचा झरा तू
स्वत: झिजून दुसऱ्यास
सुगंध देणारं चंदन तू
आशीर्वादाचं तोरण
मांगल्याचं प्रतीक तू….
निसर्गाने दिलेलं
एक अनमोल
वरदान तू….
– रचना : सौ सीमा मंगरुळे-तवटे. वडूज
५)
ती काय करते ?
आई वडिलांना दुरावुन
भावा बहिणींची माया सारून
पतीच्या घरी ती येते
तरी म्हणतात ती काय करते ?
सासू सासऱ्यांमध्ये आई वडील पहाते
नांदेला आपली बहीण ती मानते
दिरा जावांशी हसत खेळत ती रहाते
तरी म्हणतात ती काय करते ?
सुख दुःखात कायम साथ ती देते
कितीही संकट आली तरी सामोरी जाते
नवऱ्याच्या यशात आनंदी ती होते
तरी म्हणतात ती काय करते ?
सासरच्या चाली रिती ती सांभाळते
सण समारंभ उत्साहात पार पाडते
पै पाहुणे नातेवाईक ती जपते
तरी म्हणतात ती काय करते ?
दिवसभर कष्ट ती करते
घर नीटनेटके ती ठेवते
तिच्याच मुळे घराला घरपण असते
तरी म्हणतात ती काय करते ?
मुलांचे संगोपन व्यवस्थित करते
त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी झटते
शिक्षणाबरोबर संस्काराची जोड ती देते
तरी म्हणतात ती काय करते ?
यमदूत आला तरी त्यालाही सामोरी जाऊ शकते
एवढी हिम्मत तिच्या मध्ये हो असते
माझे आयुष्य माझ्या कुटुंबियांना दे
असे वर ती मागते व….
स्वखुशीने त्याच्या बरोबर देवाघरी ही जाऊ जाते
तरी म्हणतात ती काय करते ?
सांगा………..ती काय करते ?
– रचना : रश्मी हेडे.
६)
शक्ती
विश्वाच्या पसाऱ्यात साऱ्या,
कणमात्र होऊन राहिले,
व्योमातून उडताना मी विश्वच सारे व्यापिले.
निर्मिला मी जन्म माझा नवचंडिका रूपांनी
दैत्यासुराना मारण्या झाले मी साकार या त्रिभुवनी.
नव्हते मी अबला कधी,
नच दासी पुरुषाची,
तोडूनी शृंखला या आज भासले दामिनी.
मीच राधा, मीच सीता,
मीच अप्सरा इंद्रलोकी,
मी भवानी, मी जिजाऊ,
माता जगनमोहनी
वाढू दे उदरात
अंकुर माझा
पुन्हा पुन्हा या जगती,
भेदण्या अंधार सारा
पुरेशी आहे एक पणती.
रुपे ही अनंत जगती
गाऊ तयांची आरती
कोटी कोटी कंठाने गाईल,
हे विश्व माझी महती.
– रचना : वासंती पाठक. नाशिक
७)
महिलादिन
आमचे वॉर्डात महिलादिनाचा प्रोग्रॅम आम्ही आखलाय
दांडिया आणि पैठण्या वाटून महिलांचा मान राखलाय
घरासमोर आज रांगोळी स्पर्धा सजतेय
पटांगणात महिला कशी नटून थटून नाचतेय
भाषणाच्या मंडपासमोर 500 खुर्च्या लावून टाका ट्रक मधून महिला आणून रांगेने बसवून टाका
कार्यक्रमात सर्वांना द्या वेफर्स आणि केळी
भाषणाला इशाऱ्यावर वाजवा म्हणावं टाळी
त्या मनसुख भाईला सांगून साड्या टाका वाटून
अन् वार्ताहर महिलांना गाड्या द्या धाडून
प्रमुख पाहुणे आले की लवंगी सर झडू द्या
महिलांना समस्यांचा जरा इसर पडू द्या
अध्यक्ष कोण काय पुसता ?मीच खुर्चीत बसणार
मला घेऊन तर सार्याजणी मिरवत मिरवत येणार
त्या दलित लेखिकेला गाठून भाषण द्या लिहून बलात्कार नी अत्याचाराचा डाटा घ्या खरडून
समाजाला घाबरून महिला घरातच बसली पाहिजे तिची खरी जागा चुलीजवळच असली पाहिजे
– रचना : मेघना साने. ठाणे
८)
नवदुर्गा
आयुष्यातिल नवदुर्गांचे स्थान अबाधित जाण जरा
त्यांच्या वाचुन तुला न थारा स्वीकारी हे सत्य जरा
“आई” वाचुन जन्म कुणाला देवाचे ते रूप खरे
“अज्जी” च्या मांडीवर गोष्टी, त्याविण शॆशव रे अपुरे
“बहिणी” चे प्रेम त्याग जणु मुक्ताईचा भास पुरा
“मॆत्रिणि” चा सहवास जीवनी चॆतन्याचा एक झरा
“पत्नी” चा अवतार आगळा सर्व देवता सांठविल्या
“सासू” दुसरी माय जयांनि कथा हिताच्या ऎकविल्या
“सून” अवतरे सोन पाउली गृही लक्ष्मिचा वास पहा
“कन्येचा” अधिकारस्थान, अन् डॊल घराची शान अहा
“नात” सांवली सार्यांची जणु दुर्गेचे ते रूप अहा
महाकालि, अन् महालक्ष्मी वा महासरस्वती यांत पहा
– रचना : अरविंद.
९)
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्वांना खूपखूप शुभेच्छा.
महिला दिन आला.
(चाल:- प्यार दिवाना होता है, मस्ताना होता हेै।)
उठा सयांनो, चला सख्यांनो महिला दिन आला
स्तुतीसुमनांचा भवती तुमच्या वर्षाव झाला.
कुणी म्हणेल दुर्गा तुजला कुणी गं वीरश्री
कुणी म्हणेल वाघीण आणि कुणी ग शूरस्त्री
शिकार करतील बोलूनी गोड अन फसशील तू बाला
स्तुतिसुमनांचा भवती तुमच्या वर्षाव झाला
ठेव आदर्श जिजाऊचा लक्ष्मी कल्पनाचा.
ध्रुवासम चमकू दे गगनी, दिवा कर्तृत्वाचा.
करून पेरणी संस्कारांची निर्मिशी स्वर्गाला.
स्तुतिसुमनांचा तुझ्या गं भवती वर्षाव झाला
शिकून घे तू ओळखायचे पशू माणसाचा
सावध राहून नायनाट कर दुष्ट प्रवृतींचा
ब्रम्हांडामधे होऊ दे नारी तुझा बोलबाला
स्तुतिसुमनांचा तुझ्या गं भवती वर्षाव झाला.
तुझ्यातील सुप्तगुणांना वाव मिळू दे.
कलागुण आतील सारे प्रकट होऊ दे.
भेदाभेद च्या भिंती पाडून घालव संकोचाला.
स्तुतिसुमनांचा भवती तुमच्या वर्षाव झाला.
उठा सयांनो, चला सख्यांनो महिला दिन आला
स्तुतीसुमनांचा भवती तुमच्या वर्षाव झाला.
– रचना : अजय बिरारी. नाशिक
काय बोलाव तेच कळत नाही.
खूपच मार्मिक ज्वलंत अश्या कविता लिहिलेल्या आहेत.
🌹🌹
सर्व कविचे मनःपूर्वक अभिनंदन.
🌹🌹
भुजबळ साहेब
🌹🌹