१. बैलपोळा
शेतक-याचा गं मित्र
नांगर त्याने धरला
सोने मोती पिकवण्यासाठी
आसूड त्याने सोसला
काळी धरती माता
उगवेल सोने मोती
पण तिला उसवण्यासाठी
त्याचीच लागते सोबती
किती कष्टवितो काया
शेती शेत नांगरण्यासाठी
मुकपणे झेलतो तो
सारे दु: ख धन्यासाठी
कधी होतो ढवळ्या
कधी होतो पवळ्या
कृषीवलासाठी मात्र त्याने
मुसक्या आपल्या आवळल्या
कशी होऊ उतराई
तोच आमचा पाठीराखा
धान्याचे कोठार भरण्या
हातभार लावतो सखा
त्याच्या कष्टाची जाण
म्हणून पोळ्याची आठवण
आरती ती ओवाळून
पुरणपोळी ती भरवून
वर्षभर कष्ट केले
नाही नाही विसरले
हाच दिवस त्याचा
म्हणून लाड चालवले.
–– रचना : सानिका कुपटे. ठाणे
२. मातृ दिंन
अस्तित्वाचे दान
मातेचे वरदान
मायेची पांघर
सुखाची झालर
प्रेमाचे आंदण
आनंदाचे क्षण
व्रत कृतज्ञतेचे
ऋण फेडण्याचे
निमित्त पिठोरीचे
औचित्य साधण्याचे
आयुष्य सार्थक करण्याचे.
–– रचना : मीरा जोशी. नवी मुंबई.
३. “आला श्रावण श्रावण“
नेसून हिरवा शालू
आला श्रावण श्रावण
कधी उन कधी पाऊस
चहूकडे आनंदाचे क्षण
आसुसलेल्या धरतीला
घोट श्रावणसरींचा
असा हा मास
सृजनाच्या अविष्काराचा
नभी साकारले
सप्तरंगी इंद्रधनू
दवबिंदू पानावर
भासे मोतीबिंदू जणू
दरवळे सुगंध
डोलती श्रावणफुले
फांद्यांफांद्यांवर झाली
मोहक श्रावणझुले
व्रतवैकल्यांची चाहूल
झाली लगबग देवदर्शना
नटूनथटूनी पत्री घेवूनी
निघाल्या मंदिरात या ललना
— रचना : सौ. वंदना कापसे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800