१. सांगाडा प्रेमाचा
देव जाणें काय अवदसा सुचली असावी मस्तकात माझ्या,
जे भान तुझ्या कुकर्मांच सुद्धा राहिलं नाहीं
हाथ तुझा मागताना..
तल्लीन काही असा झालो मी इश्कात तुझ्या ग,
माझ्या प्रेमाचे सांगाडे आज ही दिसतात मला
क्षणोंक्षणी उठता बसताना..
२. फुल गुलाबाचे
एकटा जीव सदाशिव मी,
माझं कुठे अडतंय घोडं;
फुल गुलाबाचे राहू द्या ओ,
काट्यांवर पण लिहू थोडं.
३. किब्लेगाह
क्षणोक्षणी हे कोडे अंतरी माझ्या,
कुठवर नेईल मज प्राणवायू प्रवाह
देऊनी उत्तर, करशील मुक्त ह्याच आशेने,
मी जोडून हात तुझ्या दिशेने किब्लेगाह.
४. हरवलेला
ज्या क्षणी सोडलास तू हात माझा,
माझ्यात मी असूनही, होतो काहीसा हरवलेला..
डोळ्यांचा खिडकीतून पाऊस मुसळधार असा की,
पापण्यांच्या बिजागरी गंजवून गेला.
५. क्षणभंगुर
पापण्यांच्या खिडकीत भावनांचा पूर,
डोळ्यांच्या दृष्टीत संवेदनांचा धूर,
प्रीत आपली माझ्या करीता जन्म जन्मांतरीची..
अन् तुझ्यासाठी मात्र क्षणभंगूर ?
६. आशा
स्पर्शाने तुझ्या शहारायचो मी
व्हायची लाही लाही संपूर्ण तनाची
तू पुन्हा यावं मिठीत घ्यावं
निरंतर ही भाबडी आशा मनाची…
रचना : विराज पाटील. मुंबई
संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर सुपर