किन्नर, तृतीयपंथी किंवा हिजडा हे तसे नेहमीचे ऐकण्यातले शब्द आणि ज्यांच्यासाठी ते वापरले जातात तेही पाहण्यातले. अगदी आपल्या अवती- भवतीचे. पण अवती- भवती असूनही त्यांच्यात आणि आपल्यात एक प्रचंड मोठी दरी. तेही आपल्यासारखेच असलेले पण तरीही त्यांच्यापासून चार हात दूर राहण्याची आपली प्रवृत्ती.
नागपूर येथील पत्रकार श्री अविनाश महालक्ष्मे यांचा पत्रकारितेच्या निमित्ताने तृतीयपंथी आणि एकूणच एलजीबीटी समुदायाशी जवळून संबंध आला. त्यांच्या व्यथा, त्यांच्या समस्या त्यांना समजून घेता आल्या. अनलॉकच्या दिवाळी अंकात या विषयावर लिहावे, असे अनलॉकच्या संपादिका रश्मी पदवाड- मदनकर यांनी त्यांना सुचविले. किन्नरांशी वेगवेगळ्या निमित्ताने झालेली चर्चा, निरीक्षणे यातून मग लेख सिद्ध झाला आणि तो अनलॉकमध्ये प्रसिद्ध झाला. त्याबद्दल रश्मी यांचे आभार. रंगपंचमीच्या निमित्ताने माणसांच्या या वेगळ्या रंगा विषयीचा श्री अविनाश महालक्ष्मे यांचा हा अभ्यासपूर्ण लेख निश्चितच उद्बोधक आहे…..
– संपादक
रंग तुझा वेगळा
तशी त्यांची परवड जन्माला आल्यापासूनच सुरू होते. एखादे बाळ जन्माला येते त्यावेळी त्याचा चेहरा पाहण्याआधी त्याचे लिंग पाहिले जाते. म्हणजे जन्माला आलेला जीव पुरुष आहे की स्त्री हे पाहून अनेकदा होणाऱ्या आनंदाचे प्रमाण ठरत असते. आपल्या आयुष्यात नव्या जीवाचे आगमन हा त्याच्या जन्मदात्रीसाठी किती आनंददायी अनुभव राहात असेल पण….
हा पण यासाठी की असा आनंद ज्यांच्या घरी तृतीयपंथी बाळ जन्माला येते त्यांना होत नाही. या जगात नुकतेच पहिले पाऊल ठेवलेल्या त्या चिमुकल्याने जन्माला येऊन खूप मोठे पाप केले आहे अशी भावना त्याच्या जन्मदात्यांची होती. त्या जीवाची अवहेलना त्या क्षणापासूनच सुरू होते. काहीजण त्याच्या विशिष्ट वयापर्यंत त्याचा सांभाळ करतात तर काही जन्मदाते असे बाळ तृतीय पंथींना देऊन टाकतात. अर्थात काळजाचा तुकडा असा तोडून देणे सोपे नसते. त्यासाठी मनावर भला मोठा दगड ठेवून त्या नवजात अपत्याशी नाते नाकारून त्याला एका वेगळ्याच दुनियेत ढकलले जाते.
खरे तर हा त्याचा दुसरा जन्म असतो. यापुढे समाजात टाळ्या वाजवत फिरायचे, लोकांपुढे हात पसरायचे, शुभप्रसंगी आशीर्वाद देऊन पैसे घ्यायचे, हेच त्याचे आयुष्य होऊन जाते. या दुनियेत त्याचे बालपण हरवले असते, आई-वडील, भाऊ बहीण यांच्याविषयीच्या मनातील भावनांचा अखेरचा प्रवास सुरू झालेला असतो. एक नवे आयुष्य जगायला त्याची धडपड सुरू असते. या धडपडीत कधी ते यशस्वी ठरतात तर कधी पराभूत होऊन आलेल्या नैराश्यामुळे साऱ्यांचा कायमचा निरोप घेतात. आयुष्यभर अश्वस्थाम्यासारखी अस्वस्थतेची जखम भाळी घेऊन त्यांची भटकंती सुरू असते.
तृतीयपंथी, हिजडा किंवा किन्नर म्हणजे शरीर रचना पुरुषासारखी पण लैंगिक भूमिका स्त्रीप्रमाणे असणारा व्यक्ती. स्त्रीत्वाची ओढ असणारा व्यक्ती. काही जण त्यांना छक्का म्हणतात. मात्र छक्का हे संबोधन त्यांना अजीबात आवडत नाही. त्या विषयी ते नाराजीही व्यक्त करीत असतात.
रस्त्यात कुठे किन्नर दृष्टीस पडला की आजुबाजूच्यांच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलतात. हा कुणी आपल्यातील नाही, एखाद्या परग्रहावरून आलेला असावा अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिले जाते. त्याचा आशीर्वाद मिळावा पण त्याचा स्पर्श होऊ नये याची खबरदारी भोवतालचे घेत असतात. पण किन्नरही सर्व सामान्यांसारखाच एक घटक आहे हे मानायला कोणी तयार होत नाही.
खरं तर तृतीयपंथी आज अचानक अवतरलेले नाहीत तर मानवी जीवन अस्तित्वात आले तेंव्हापासूनच किन्नरही आहेत. एखादी व्यक्ती किन्नर म्हणून का जन्माला येत असावी ? तर त्याला जीवशास्त्रीय कारण आहे. मानवी शरीरात गुणसूत्रे असतात. स्त्री व पुरुषांमधील विशिष्ट गुणसूत्रांचा संयोग झाला की मुलगा किंवा मुलगी जन्माला येत असते. पण कुठल्या कारणाने या गुणसूत्रांची संरचना बदलली तर होणारे बाळ किन्नर म्हणून जन्माला येऊ शकते. अशा बाळाला पुरुषाचे लिंग असले तरी त्याची योग्य वाढ झालेली नसते. खरे तर यावर अजूनही संशोधन सुरू आहे. मात्र अजून ठोस उत्तर सापडलेले नाही.
तृतीयपंथी म्हणून जन्माला येणारी ही मुलेही चांगल्या सर्वसामान्य मायबापाच्या पोटीच जन्माला आलेली असतात. एकाच आईच्या उदरातून जन्म घेतलेली काही मुले सर्वसाधारण राहू शकतात पण त्यातील एखादे मूल असे वेगळे राहते आणि त्याचे जगच त्यामुळे बदलून जाते. बरे असा वेगळा म्हणून जन्म होण्यात त्याचे कोणतेही योगदान नसते. माय- बापांनी जन्माला घातले आणि त्यांच्या शरीरातील जैविक बदलांमुळे त्याच्या शरीरात झालेले बदल घेऊन त्याला आयुष्य काढावे लागत असते.
अशी मुले जन्माला आल्यानंतर सारेच पालक त्यांना लगेच अन्य किन्नरांना देऊन टाकतात असे नाही. काही त्यांचा सांभाळही करतात पण मग मुलगा म्हणून जन्मलेल्या या मुलांना आपण काही तरी वेगळे असल्याचे जाणवू लागते. नाव मुलाचे ठेवले असले तरी आपल्याला मुलींसारखे राहायला, नट्टापट्टा करायला, त्यांच्यासारखे बोलायला आवडते, असे त्यांनाही जाणवते आणि घरातल्यांनाही ते दिसत असते. घरी कुणी नसले की ते मग मुलीसारखे वागण्याची हौस पूर्ण करून घेतात. डोळ्यांना काजळ लावणे, डोक्यात फूल खोवणे यासह मुली खेळतात तसे खेळ त्यांना आवडायला लागतात. मग त्यांचा पहिला विरोध घरातूनच सुरू होतो. काय मुलीसारखा वागतो, हे घरच्यांचे वाक्य, शाळेतील टोमणे त्याला आपण काहीतरी वेगळे आहोत याची जाणीव सतत करून देत असतात. आपण चुकीच्या शरीरात जन्माला आलोय असे त्यांना सतत वाटत असते. पण इलाज नसतो.
या शरीराचे ओझे घेऊन त्यांचे जगणे सुरू असते. आपल्याच इतर भावा-बहिणींना मिळणारे आई- वडिलांचे प्रेम आपल्या वाट्याला येत नाही हे त्यांना बोचत असते. पोटचा गोळा असल्याने घरातील लोकांना त्याच्याविषयी जिव्हाळा, काळजी सारे वाटत असते पण नातेवाईक, शेजारी- पाजारी त्याच्या ‘वेगळ्या’ ओळखीवरून त्याला सतत लक्ष्य करीत असतात. सार्वजनिक कार्यक्रमात घरचे सर्व मिळून जाताना हा जीव मात्र घरात रडत बसला असतो.
घराजवळची सर्व मुले एकत्र खेळत असताना हा मात्र घराच्या खिडकीतून त्यांचे बागडणे पाहात असतो. कधी त्यांच्यासोबत खेळायला गेलाच तर तेथेही तो वेगळा पडतो. अजून आयुष्याची पुरती ओळख झालेली नसतानाच येणारे हे अनुभव पाहून त्याला वैफल्य येते. खरे तर वैफल्य म्हणजे काय हे समजण्याचेही त्याचे वय नसते पण आपण इतरांसारखे नाहीत, ही जाणीव त्याला सारखी छळू लागते आणि यातूनच मग एक दिवस तो घर सोडण्याचा निर्णय घेतो. घरातील आणि समाजातील वातावरणच त्याला घर सोडण्यास बाध्य करीत असते.
खरे म्हणजे घर सोडणे इतके सोपे नसते. आपले आई- वडील भाऊ – बहीण यांना सोडून जाताना त्याला काय वाटत असेल ? शरीराने किन्नर असला तरी त्याच्याही भावना इतरांप्रमाणेच असतात. त्यामुळे कुटुंबापासून होणारी त्याची ताटातूट हृदय पिळवटून टाकणारी असते.
घर सोडल्यावर कुठे जायचे काही माहीत नसते. पुढ्यात सारा अंधार असतो. त्या कोवळ्या जीवाचे लचके तोडणाऱ्या प्रवृत्तीही समाजात जागोजागी असतात. त्यांच्या तावडीतून सुटत, पळत, भीक मागून तो आयुष्य काढत असतो. बहुतांश किन्नर आपल्या कुटुंबात राहात नाहीत. काहींना मात्र त्यांच्या कुटुंबाने स्वीकारलेले असते. जे घरून बाहेर निघतात ते आपल्यासारखे कोण आहेत याचा शोध घेत असतात. घरातून बाहेर पडलेले किन्नर एकत्र राहात असतात. असे घर जेंव्हा सापडते तेंव्हा त्याला झालेला आनंद अवर्णनीय असतो. कारण त्याच्यासारखेच इतरही तेथे असतात. त्यामुळे किमान त्या घरात तरी कोणी टोमणे मारणारे नसते की विखारी नजरा नसतात.
असे किन्नर समूहाने राहतात. या प्रत्येक समूहाचा एक गुरु असतो. बाकीचे किन्नर त्या गुरुचे चेले किंवा शिष्य असतात. ज्या दिवशी गुरुच्या घरी आले त्याच दिवशी त्यांचा आई, वडील, भाऊ, बहीण यांच्याशी संबंध तुटलेला असतो.
आता गुरु हाच त्यांचा माय-बाप, बाऊ, बहीण सारे काही असतो. बाहेर जायचे असेल तर गुरुची परवानगी घेऊनच जावे लागते. तेथे नियम गुरुचे चालतात. सर्व चेले गुरुच्या आज्ञेत वागतात. प्रत्येक गुरुच्या समूहाला घराणे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रत्येक किन्नर हा कोणत्या ना कोणत्या गुरु घराण्याचा असतो.
गुरुपदी बसण्याचा मान किन्नरांपैकीच एखाद्या ज्येष्ठाला मिळत असतो. गुरु ठरविण्यासाठी किन्नरांमधील पंचांची बैठक होत असते. या बैठकीत कोण गुरू होईल हे ठरविले जाते.
शिक्षणापासून वंचित बालपपणीच घर सुटल्यामुळे समजातील हा घटक शिक्षणापासून वंचित राहतो. जे शाळेत प्रवेश घेतात ते तेथे उपहास आणि थट्टेचा विषय बनतात. मग कधी शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ त्यांच्यावर येते. शिक्षणच नसल्यामुळे रोजगाराचे पुढचे सर्व मार्ग तेथेच बंद होतात.
काहीजण विपरित परिस्थितीतही शिक्षण घेतात. त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी जातात. त्यामुळे विविध सरकारी किंवा खासगी कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या किन्नरांचे प्रमाण नगण्य दिसते. काहींना नोकरी मिळते पण बाकीचे सहकारी म्हणून त्याला स्वीकारायला तयार नसतात. त्याला सोबत घेऊन कुणी टिफिन खात नाही किंवा मग चहाच्या टपरीवर चहाला घेऊन जात नाही. त्या कार्यालयात ते वेगळे पडतात.
हे असे जगणे असह्य झाले की मग त्यांना आपले परंपरागत आयुष्य स्वीकारणे भाग पडत असते.
हेही आयुष्य काही खूप समाधानाचे असते असे नाही. लोकांच्या टोकदार नजरा आणि टोमणे यांचा सामना हरघडी करावा लागत असतो. गुरुचे घराणे म्हणजे एक मोठे कुटुंब असते. एका घराण्यात चाळीस- पन्नास जण राहतात. इतक्या लोकांचा उदरनिर्वाह चालवायचा तर कमाईही तशीच हवी असते. सर्व मिळूनच चरितार्थासाठी भटकंती करतात.
लग्न, वास्तू, बारसे असले की काहीजण मुद्दाम त्यांना आशीवार्द देण्यासाठी बोलावतात. शापित आयुष्य जगणाऱ्या किन्नरांचे आशीर्वाद मात्र साऱ्यांना हवे असतात. ते एक शुभ लक्षण समजले जाते. त्यामुळे मग शुभप्रसंगी त्यांना निमंत्रण येते. काही ठिकाणी ते स्वत:हून जातात. टाळ्या वाजवत आशीर्वाद देतात. काहीजण त्यांना पैसे देतात मात्र काही त्यांना पिटाळूनही लावतात. यातून अनेकदा वादाचे प्रसंग उभे राहतात. शुभप्रसंगातून तेव्हढी मिळकत होत नाही तेंव्हा मग ते बाजारपेठांमध्ये टाळ्या वाजवत फिरतात. चौकात सिग्नलवर उभ्या राहिलेल्या वाहन चालकांपुढे ते हात करतात.
हे हात रिकामे राहिले तर उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर येणार असते. एखाद्या ठिकाणी कमाई होत नसेल तर किन्नर अन्य शहरांमध्ये तेथील किन्नरांच्या परवानगीने काही दिवस वास्तव्याला जात असतात. जी कमाई होते त्यातील काही भाग गुरुला दिला जातो. अनेकदा रेल्वे प्रवासात टाळ्या वाजवत किन्नर प्रवाशांकडून पैसे घेताना दिसतात. खरे म्हणजे रेल्वे कायद्यानुसार असे करणे गुन्हा अहे, पण तरीही ते असे गाड्यांमध्ये पैसे मागत फिरत असतात. कधी कारवाई झाली की गजाआड होऊन त्यांना दंड भरावा लागत असतो.
अर्थात आता नकली किन्नरही आले आहेत. किन्नरांसारखी वेशभूषा करून रेल्वेत किंवा किंवा बाजारात टाळ्या वाजवत फिरायचे व लोकांकडून पैसे वसूल करायचे असे प्रकार ते करतात. त्यांच्यामुळे आम्ही बदनाम होतो, असे मूळ किन्नर सांगतात.
का वाजवतात टाळ्या ?
टाळ्या ही किन्नरांची ओळख असते. खरे तर किन्नर वाजवतात तशी टाळी इतरांना वाजवता येत नाही. विशिष्ट पद्धतीने आणि ठेक्यात टाळ्या वाजवून किन्नर आपली ओळख देत असतात. सर्वच किन्नर आपली ओळख जगाला सांगत नाही तर काही किन्नर पुरुषांच्या वेशातही वावरत असतात. मात्र तसे असले तरी विशिष्ट पद्धतीने वाजणारी टाळी ही त्यांची ओळख असते. ती ओळख देण्यासाठी ते अशा पद्धतीने टाळ्या वाजवून स्वत:कडे लक्ष वेधून घेत असतात.
अंत्यसंस्कार
किन्नरांच्या अंत्यसंस्काराविषयीही नेहमीच वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र कोणीही किन्नर त्यावर फारसे मोकळेपणाने बोलत नाही. पण किन्नरांचे अंत्यसंस्कार कोणाला दिसू नये अशा पद्धतीने साधारणत: करण्यात येतात. यात त्याला पीठापासून तयार केलेले पुरुषाचे लिंग अंत्यसंस्कारापूर्वी लावण्यात येत असते. पुढील जन्म किन्नराचा मिळू नये यासाठी त्यांच्या परंपरेनुसार ही गुप्तता पाळण्यात येत असते. जन्माने किन्नर कोणत्याही धर्माचा असला तरी मृत्युनंतर त्याचे दफनच केले जाते.
का म्हणतात किन्नर ?
तृतीयपंथीयांना ‘किन्नर’ म्हटले जाते याबाबत एक आख्यायिका आहे. कश्यप ऋषींनी ब्रह्मदेवाचा पुत्र, दक्ष प्रजापती याच्या १७ कन्यांशी विवाह केला होता. पृथ्वीवरील सर्व प्रजाती त्यातून जन्मास आल्या असे मानले जाते. या १७ मुलींपैकी अनिष्टा या मुलीपासून यक्ष, गंधर्व किन्नर या उपदेवता जन्माला आल्या असे मानले जाते. हे किन्नर हिमालयीन पर्वतरांगात वास्तव्यास होते अशी मान्यता आहे. किं + नर अशी त्याची शब्दफोड होते. त्या नुसार त्यांची योनी आणि आकार सर्वसाधारण मानवी देहासारखी मानली जात नाही. (पुरुष असूनही नसलेला) शिवाय किन्नरांना देवतांचे भक्त व गायक समजले जाते. किन्नरांच्या या वर्णनाशी तृतीयपंथीयांचे शारीरिक व मानसिक वर्तन जुळणारे आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांना किन्नर देखील म्हणतात.
अनेक समस्या
समाजातील या घटकापुढे आज अनेक समस्या आहेत. सर्वात मोठी समस्या आहे ती प्रसाधनगृहाची. ७ वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने किन्नरांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र प्रसाधनगृहे बांधण्याचे आदेश दिले होते, मात्र अजून त्याची पूर्ण अंमबलजावणी झालेली नाही. किन्नर पुरुषांसाठीच्या प्रसाधनगृहात गेले तर त्यांना तेथून हाकलले जाते आणि महिलांच्या प्रसाधनगृहात गेले तर तेथे त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधनगृह होणे गरजेचे आहे. नागपुरात अलीकडेच असे पहिले प्रसाधनगृह झाले पण अशा प्रसाधनगृहांची संख्या देशभरच वाढण्याची गरज आहे.
एखाद्या किन्नराचा अपघात झाला, आजारी पडला की उपचाराच्यावेळीही अशीच समस्या उभी राहते. सरकारी रुग्णालयात गेल्यावर त्यांना पुरुषांच्या वॉडार्त दाखल करायचे की स्त्रियांच्या असा प्रश्न तेथील कर्मचाऱ्यांना पडतो. त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड होण्याचीही गरज आहे.
लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया
अनेक किन्नर लिंग परिर्वतनाची शस्त्रक्रिया करून घेतात. मात्र या शस्त्रक्रियेचा खर्च इतका आहे की तो साऱ्यांनाच परवडत नाही. ही शस्त्रक्रिया मनात विचार आल्याबरोबर लगेच होत नाही तर ही संपूर्ण प्रक्रिया एक ते दीड वर्षांची असते. ज्याच्यावर शस्त्रक्रिया करायची त्याच्यात हार्मोन्सची टक्केवारी किती आहे यावर ते अवलंबून असते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ते मुलींसारखे केस वाढवतात, छातीचा भाग वाढवून घेतात, त्यानंतर डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिल्यावरच त्यांची लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया होत असते. या काळात त्यांचे मानसोपचार तज्ज्ञातर्फे समुपदेशनही करणे गरजेचे असते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की एक स्त्री म्हणून किन्नर आयुष्य जगू शकतात.
स्वतंत्र मंडळ
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नालसा निर्णयानंतरही राज्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी वेगळ्या कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. तृतीयपंथीयांच्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यात अनेक पेचप्रसंग, कायदेविषयक अडचणी उभ्या राहतात. विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी हे मंडळ आधार ठरू शकते. या समाजघटकाच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी देण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने २८ ऑगस्ट २०१४ रोजी घेतला होता. केरळ, तामिळनाडू, छत्तीसगढ या राज्यांमध्ये ही मंडळे स्थापन झाली आहेत. सरकारच्या विविध योजनांचे लाभ या समूहाला मिळवून देणे, लाभार्थींची नोंदणी, त्यांना ओळखपत्र मिळवून देणे, तृतीयपंथीयांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कलाअकादमी स्थापन करणे आदी बाबी त्यामुळे मार्गी लागू शकतात. मात्र कागदोपत्री मंडळ गठीत होऊन उपयोगाचे नाही तर या मंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून त्यांच्यासाठी विविध योजना राबविणे गरजेचे आहे.
किन्नरांच्या निवासाचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या लोकांसाठी मंडळातर्फे गृह बांधणी योजना हाती घेता येऊ शकते.
अशा प्रकारे आयुष्याचा एक वेगळा रंग घेऊन किन्नर जगत असतात. बरेचदा हा रंग काळाच असतो. पण त्या रंगासहच त्यांना हसत- हसत जगावे लागते. या हसण्यामागे खूप मोठे दु:ख असते. मानवजातीचे अस्तित्व जितके प्राचीन तितकेच किन्नरांचे अस्तित्वही जुने आहे. पण अजून सामाजिक स्वीकारार्हता त्यांच्या वाट्याला आलेली नाही. माणूस चंद्रावर जाऊन आला, सूर्यमालेतील इतर ग्रहही त्याच्या टप्प्यात येत आहेत, पण किन्नर समाजाविषयी त्याच्या मनात असलेला ग्रह अजून दूर झालेला नाही. तुमच्या- माझ्यासारख्या माय-बापाच्या पोटी त्यांचाही जन्म झाला आहे. मात्र जीवशास्त्रीय बदलांनी त्यांना अस्पृश्य करून टाकले. ही अस्पृश्यता संपण्याची गरज आहे. त्यांना आपल्याला स्वीकारता येत नसेल तर स्वत:ला पुढारलेले किंवा पुरोगामी म्हणण्याचा कुठलाही नैतिक अधिकार आपल्याला असणार नाही, एव्हढे मात्र खरे.
– लेखन : अविनाश महालक्ष्मे. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800